Saturday, 17 June 2023

ज्ञानात वृद्धी होण्यासाठी वाचन महत्वाचे

 ज्ञा





नात वृद्धी होण्यासाठी वाचन महत्वाचे


बँक व्यवस्थापक आतिष म्हात्रे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


अलिबाग, (प्रतिनिधी) : जीवनात पुढे जाऊन चांगले करिअर घडवायचे असल्यास आणि ज्ञानात वृद्धी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीने हाती मिळेल त्या पुस्तकाचे वाचन करावे. असे मत अलिबागच्या एन.के.जी.एस.बी. या बँकेचे शाखा व्यवस्थापक आतिष म्हात्रे यांनी आज येथे केले.


रायगड जिल्हा फोटोग्राफर्स अँन्ड व्हीडिओग्राफर असोसिएशनशी संलग्न अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन व अश्विनी टीचर्स क्लासेस अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आदर्श पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या स्व. अनंत पाटील सभागृहात अलिबाग तालुक्यातील दहावी व बारावी परिक्षेत चांगले यश संपादन केलेल्या गुणवंतांच्या गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचाही यावेळी असोसिएशनच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.


चांगले करिअर घडविण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी शक्यतो परदेशी जाऊन चांगले शिक्षण घ्यावे असे सुचवितांनाच आपली संगत चांगल्या माणसांबरोबर असल्यास जीवनात आपण चांगले यश संपादन करु शकतो असेही म्हात्रे म्हणाले. अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा सुप्रसिद्ध वकील मानसी म्हात्रे यांनी गुणवंतांचा सत्कार करताना दहावी आणि बारावी म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा टप्पा असून, या टप्प्यावरच त्यांच्यात सामाजिक संस्कार रुजविण्याचे काम असोसिएशनने केल्याने त्यांनी पदाधिकाऱ्यांचे कौतूक केले. अलिबाग नगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते सुप्रसिद्ध वकिल प्रविण ठाकूर यांनी गुणवंतांचे अभिनंदन करीत या गुणवंतांचा सन्मान केल्याबद्दल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे कौतूक केले. अश्विनी क्लासेसच्या अश्विनी मेहता यांनी पालकांना सुचना करताना पालकांनी आपले निर्णय मुलांवर लादू नका असे सांगत, त्यांना त्यांचे करिअर करण्यासाठी त्यांनाच निर्णय घेऊ द्या असे आवाहन केले.  


अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर मालोदे यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचे हे १५ वे वर्षे असून, ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतूक व्हावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्य़ाचे सांगितले. या कार्यक्रमाबरोबरच अन्य सामाजिक उपक्रमही असोसिएशनतर्फे राबविले जात असल्याचे मालोदे यांनी सांगितले. याप्रसंगी आदर्श पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील, सचिन राऊळ, रायगड फोटोग्राफर्स असोसिएशनचे खजिनदार जितेंद्र मेहता, गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य, अलिबागकर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीतम सुतार यांनी केले, तर अमोल नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले .....................................समाप्त......................................

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi