"संस्कृतीची कीर्ती सांभाळली पाहिजे"
वारी -लबाड लांडगा द्वांग करताय, लगीन करायचं सोंग करतय
"अति तिथे अवज्ञा" हा जगाचा नियमच आहे मित्रहो..
वारीत चालणारा प्रत्येकजण वारकरी नसतो. त्याला पोट असलं तरीही ते माणसाचं पोट असतं, बकासुराचं नसतं, हे आपण लक्षात कधी घेणार?
वर्षानुवर्षं मीच काय, माझ्यासारखे शेकडो लोक पाहत असतील - विविध पदार्थ किंवा वस्तू वाटणाऱ्या लोकांच्या अंगावर ही वारीत चालणारी माणसं चक्क धावून जातात. त्यांच्या हातून पदार्थ अक्षरशः ओरबाडून घेतात. वाटणाऱ्या माणसाला प्रचंड धक्काबुक्की करतात. कधी चिमटे काढतात, कधी त्याच्याशी अर्वाच्य भाषेत भांडतात सुध्दा...!
आज माझ्या शेजारी एक बाई बिस्किटांचे पुडे वाटण्यासाठी उभ्या होत्या. त्या अगदी शांतपणे देवाचं नाव घेत घेत पुडे वाटण्याच्या प्रयत्नात होत्या. पण पंधरावीस जणांनी त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांची पिशवी चक्क हिसकावून घेऊन तिथून पोबारा केला. झडप घालणारे सगळे वारकरी पोशाखातलेच होते. त्यात स्त्रियाही होत्या. कपाळाला वारकरी गंध होतं, गळ्यात तुळशीची माळ होती, हातात पताका आणि टाळ होते. म्हणजे वरवर पाहता तरी वारकरी संप्रदायातीलच वाटले. पण त्यांनी त्या बाईंना धक्काबुक्की केली, त्यांच्यावरच आवाज चढवला आणि त्यांना धाडकन खाली पाडलं..!
बरं, हे सगळं टोळकं ( कारण, ह्या प्रकारानंतर त्यांना वारकरी कोण म्हणेल?) ज्या वारीत सामील झालं होतं, त्या संतश्रेष्ठींना त्यांच्या काळात एक साधा खापराचा तुकडा सुध्दा लोकांनी मिळू दिला नव्हता, हा इतिहास आहे. पण केवळ त्या संतांच्या श्रेष्ठत्वामुळे आज लोक ह्यांना वारकरी समजून रेनकोट वाटतायत, हेल्थ कीट वाटतायत, खाद्यपदार्थ तर अमर्याद उपलब्ध आहेत, मोफत दवाखाना आहे, मोफत रुग्णवाहिका आहे, पिण्याचं शुद्ध पाणी मोफत उपलब्ध आहे...! पण ह्या सगळ्या गोष्टी योग्य त्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत का? याचा पत्ताच नाही.
कोणा एका अज्ञात परम बुद्धिमान दात्यानं आज लक्ष्मी रस्त्यावर चिकू वाटप केलं. लोकांनी घेताना मोठ्या हातानं घेतले, पण खाल्ले नाहीत. अनेकांनी चालता चालता तसेच पायाखाली टाकून दिले. त्या कुस्करलेल्या चिकूवरुन एका आजींचा पाय घसरला आणि त्या जोरात पडल्या. पलिकडून एक तरुण मोठ्या उत्साहात स्मार्टफोनवरुन गर्दीचे व्हिडिओ काढत होता, त्याचं पाठीमागं लक्षच नव्हतं. अनपेक्षितपणे त्याचा पाय अडखळला आणि तो उंचापुरा, सुदृढ तरुण त्या आजींवर धाडकन पडला. हा सगळा अनर्थ एका बापड्या चिकूमुळे घडला असला तरी, त्या चिकूची शेकडो भावंडं लोकांमध्ये वाटून टाकून, भरघोस पुण्य पदरात पाडून घेतल्याच्या आनंदात तो विवक्षित दाता निवांत होता..!
वारकरी म्हणून वावरणारे कितीतरी लोक खरे वारकरी नाहीतच, हे सहज लक्षात येतं. पिशव्या,पोती,बोचकी असं जे मिळेल ते गच्च भरुन घेण्याकडे कल असणारे हजारो लोक आहेत. यांच्यामुळे भागवत धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा अपमान होत नाही का? अन्नाची प्रचंड नासाडी अन् अपमान करणाऱ्यांकडून वारकरी संप्रदायाचा अपमान होत नाही का? आपण वारकरी आहोत, पोटार्थी नाही, याची जाणीव यांना कुणी का करुन देत नाहीत? हाच प्रश्न फार महत्वाचा आहे. ही माणसं निश्चित अडाणी आहेत. कदाचित वारकरी संप्रदायाची शुचिता त्यांना माहितीही नसेल. पण वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणाऱ्यांचं काय?
वारकरी संप्रदायात नियम पाळण्याला आणि वडीलधाऱ्यांचा मान राखण्याला फार महत्त्व आहे. तुळशीची माळ गळ्यात घातली की,जगण्या-वागण्याची नीती पाळलीच पाहिजे. जे आपलं नाही किंवा ज्यावर आपला काहीही अधिकार नाही, त्याचा हव्यास धरणं वारकरी संप्रदायात पूर्ण निषिद्ध आहे. ज्यातलं आपल्याला काहीही माहिती नाही, आणि ज्याचे संभाव्य परिणाम काय होतील, याची कल्पना करण्याइतपत बुद्धी नाही,अशा माणसानं तर मौनातच राहायला हवं.
वेळ काय आहे, प्रसंग काय आहे आणि आपण कसं वागतो आहोत, याचं साधं भान असू नये, याचं वाईट वाटलं. मी हौशी वारकरी नाही तर, मी वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे, याचं भान त्या विद्यार्थ्यानं सांभाळणं अगदी स्वाभाविक अपेक्षित होतं. "आत्ताचा क्षण संपूर्ण संप्रदायाच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा क्षण असतो. माझ्यासारख्याच अनेकांना प्रस्थानप्रसंगी आत जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. कितीतरी वारकरी माझ्या वयाच्या तिपटीने मोठे असूनही त्यांनाही पास मिळालेला नाही. हजारो लोक लांबून लांबून पायी चालत आलेले असूनही त्यांनाही प्रस्थानप्रसंगाचा पास नाही. आम्ही तर आळंदीतच राहतो आणि माऊलींचं दर्शन रोजच घेतो. पण आजचा प्रसंग वेगळा आहे. कसलाही अधिकार नसताना मी नियम मोडणं योग्य ठरणार नाही." असा विचार यांना का करता आला नाही ? हा फार महत्वाचा प्रश्न आहे.
पण काहीही कारण नसताना नियम मोडल्यानं सोहळ्याला गालबोट लागलं. वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ते लागलं. मग मीडियानं त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांना प्रश्न का विचारले नाहीत? हे विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांच्या ऐकण्यात नाहीत का? ज्यांना परवानगीच नव्हती असे विद्यार्थी अनधिकृतपणे घुसत होते तेव्हा त्यांचे संस्थाचालक काय करत होते ? असे प्रश्न राहुल कुलकर्णींनी विचारले नाहीत. "इतक्या वर्षांत असं कधी झालं नाही, मग आताच असं कसं झालं ? आणि यात पोलिसांची चूक आहे" असंच ते म्हणत राहिले. वारंवार म्हणत राहिले. ब्रेकिंग न्यूज सुरु राहिली, सोशल मीडियावर पडसाद उमटत राहिले. परिणाम व्हायचा तोच झाला. लोकांनी राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना सोशल मीडियावर प्रचंड शिवीगाळ केली. पुन्हा एकदा लोक त्यांच्या जातीवर गेले. महाराष्ट्रातल्या अत्यंत शुभ प्रसंगी आपण चुकीची गोष्ट ब्रेकिंग न्यूज म्हणून लावल्यानं लोक देवेंद्र फडणवीसांच्या थेट जातीवर गेले, याचं मिडीयाला सोयरसुतक नाही...!
वीस बावीस वर्षांचा मुलगा स्वतःच नियम मोडून, पुन्हा "महाराष्ट्रात असं पुढच्या काळातही घडू शकतं" असं म्हणतो, त्याच्या या मताशी मिडिया सहमत कसा होतो? सगळी जाणती माणसं याला थांबवण्याऐवजी दुजोरा कसा काय देतात? त्याचा संबंध ब्राह्मण जातीशी लावून लोक मोकळे कसे होतात? आणि हे सगळं प्रकरण पेटवून देण्यात आपल्या टीआरपी विषयक हावरटपणाचा वाटा सगळ्यात मोठा आहे, हे मिडीयाला अजूनही समजत नाहीय?
आपल्या स्वार्थापेक्षा आपल्या संप्रदायाची, आपल्या सांस्कृतिक परंपरांची आणि आपल्या सामाजिक शांततेची प्रतिष्ठा फार मोठी आहे, याची जाणीव प्रत्येकालाच असली पाहिजे. त्या परंपरेला आपण झळाळी प्राप्त करुन देऊ शकत नसू तरी एकवेळ चालेल. पण तिचा अपमान होईल असं वागण्याचा अधिकार आपल्याला कुणीही दिलेला नाही, हेही समजून घेण्याची गरज आहे. वडीलधाऱ्यांनी आणि अनुभवी जाणत्यांनी तरुणांना नीट समजावण्याची गरज आहे. प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. ज्याला त्याला आपलं उत्तरदायित्व नीट ओळखता आलंच पाहिजे.
वारी सगळ्यांचीच आहे. ती जशी देणाऱ्यांची आहे, तशीच ती घेणाऱ्यांचीही आहे. तिथं प्रत्येकाला स्वीकृती आहे. पण वारीचीही एक आचारसंहिता आहे, तिचा विचार प्रत्येकानंच केला पाहिजे. वारी निर्विघ्न पार पाडण्याचं उत्तरदायित्व प्रत्येकाचं आहे.
संप्रदाय सगळ्यांचाच आहे. पण त्याचेही नियम आहेत, त्याचीही बंधनं आहेत. सामाजिक नैतिकतेची आणि शिस्तीची बंधनं तर निश्चित आहेत. "नाठाळाचे माथी हाणू काठी" असं साक्षात् तुकोबारायांचं वचन आहे. त्याचा विसर संप्रदायाच्या विद्यार्थ्यांनाच पडावा, हेच आश्चर्य आहे. "मी कुणी विशेष आहे" असं कधी ज्ञानोबाराय - तुकोबाराय सुद्धा म्हणाले नाहीत, तिथं माझी काय पात्रता? असा विचार हे विद्यार्थी करु शकले नाहीत, हे या घटनेतून उघड झालं आहे.
प्रत्येकाला सुबुद्धी देण्यासाठी परमेश्वर आहेच. पण, एकूणच सुधारण्याची आणि बदलण्याची नितांत आवश्यकता आहे. आपल्या सगळ्यांनाच...!
मयुरेश डंके
No comments:
Post a Comment