Sunday, 21 May 2023

पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाचीतिसरी बैठक 21 ते 23 मे 2023 दरम्यान मुंबई

 पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाचीतिसरी बैठक 21 ते 23 मे 2023 दरम्यान मुंबई


            मुंबई, दि. २०: भारताच्या जी 20 परिषदेच्या अध्यक्षतेअंतर्गत पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाची तिसरी बैठक 21 ते 23 मे 2023 दरम्यान मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट संवादाच्या आराखड्याच्या अनुषंगाने होणाऱ्या फलनिष्पत्तीवर आधारित दृष्टीकोन ठेऊन चर्चा करण्यावर असेल.  


            या तीन दिवसीय बैठकीची सुरुवात जुहू चौपाटीवर किनारपट्टी स्वच्छता मोहिमेने होईल. यानंतर ‘ओशन-20’ संवादाचे आयोजन करण्यात येईल. आपले समुद्र किनारे आणि महासागरांचे रक्षण करण्याविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि सामुदायिक सहभागाची जाणीव करून देणे किनारपट्टी स्वच्छता मोहिमेचे उद्दिष्ट आहे.


            ओशन-20 मंचाची सुरुवात इंडोनेशियाच्या जी-20 अध्यक्षते दरम्यान महासागर विषयक प्रश्नांवरील विचार आणि कृती पुढे नेण्यासाठी झाली होती. या उपक्रमाचे सातत्य कायम राखून त्यात अधिक भर घालण्याच्या हेतूने भारताच्या अध्यक्षतेखाली सक्रीय नेतृत्वाचे दर्शन घडवून पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाच्या तिसऱ्या बैठकीत नील अर्थव्यवस्थेच्या तीन स्तंभांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. या दोन्ही उपक्रमांच्या माध्यमातून शाश्वत आणि हवामानाच्या दृष्टीने संवेदनक्षम नील अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे.


            बैठकीच्या पहिल्या दिवशी होणारे सत्र ‘नील अर्थव्यवस्थे’च्या विविध पैलूंवर आधारित असेल. या दिवशीचे पहिले सत्र हे नील अर्थव्यवस्थेसाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या विषयावर असेल. त्यानंतर धोरणे, शासन आणि सहभाग या विषयांवर परिसंवाद होतील तर नील अर्थव्यवस्थेसाठी वित्त पुरवठा यंत्रणा स्थापन करणे या संदर्भात समारोपाचे सत्र होईल.


            या सत्राची रचना, पॅनल चर्चा आणि त्यानंतर श्रोत्यांशी संलग्न चर्चा अशाप्रकारे केली गेली आहे. महासागरांची जपणूक आणि त्यांची हानी थांबवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि आपल्या सागरी स्त्रोतांचे रक्षण करण्यासाठीच्या चर्चेवर या परिसंवादात भर दिला जाणार आहे.


            पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाच्या तिसऱ्या बैठकीत पुढील दोन दिवस जी 20 देशांमधील एकमत साध्य करण्याच्या दिशेने विचारमंथन करून मसुद्याच्या मंत्रिस्तरीय बैठकीच्या आराखड्यावर चर्चा केली जाईल. यानंतर अंतर्गत सत्रानंतर चौथ्या ECSWG बैठकीच्या नियोजना विषयी चर्चा होऊन समारोप होईल.


            जी 20 सदस्य राष्ट्रांमध्ये महासागरांचे शाश्वत व्यवस्थापन आणि समुद्री जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी अत्याधुनिक उपाय विकसित करण्यावर भारताच्या जी 20 परिषदेच्या अध्यक्षतेखालील पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गट भर देत आहे. एकत्रित जागतिक प्रयत्नांची आवश्यकता आणि सध्याची परिस्थिती हाताळण्यासाठी त्वरित कृतीची गरज यावर प्रत्येक बैठकीत सातत्याने भर देण्यात आला आहे.


            शाश्वत आणि संवेदनशील भविष्या करता G20 देश, निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी तिसरी ECSWG बैठक एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, प्रत्येक प्राधान्य क्षेत्रांतर्गत परिणाम साध्य करण्यासाठी आणि सर्वांसाठी शाश्वत आणि संवेदनशील भविष्य घडवण्यासाठी सर्व भागधारकांसोबत कार्य करण्यासाठी वचनबद्ध आहे.


पीआयबी/ मुंबई

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi