भूवैज्ञानिक रचनांबाबत नेमकी माहिती नसेल तर त्याच्या कशा दंतकथा बनतात याची उदाहरणे जागोजागी पाहायला मिळतात. मात्र, ‘भवताल’ तर्फे ‘वंडर्स ऑफ जिऑलॉजी’ या इकोटूरमुळे अशा अनेक भूरचनांचा अर्थ उलगडू लागला आहे. याचे एक ठसठशीत उदाहरण पहिला बॅचमध्ये पाहायला मिळाले.
या बॅचमध्ये पालघर जिल्ह्यातून चार शिक्षक सहभागी झाले होते- किशोर काठोले, रोहिदास वाघ, पंढरीनाथ भोईर आणि कमलाकर बिरारी. त्यांनी त्या भागातील नदीत एकमेकांना समांतर जाणारे दोन खोलगट मार्ग पाहिले होते. जणू, रथाच्या किंवा गाड्याच्या चाकांमुळे तयार झालेली चाकोरी. त्यामागचे भूवैज्ञानिक कारण माहीत नसल्याने दंतकथा निर्माण झाली- तिथून अमूक देवाचा रथ गेल्यामुळे हा मार्ग तयार झाला.
या शिक्षकांनी ‘वंडर्स ऑफ जिऑलॉजी’ या इकोटूरमध्ये अशी भूरचना पाहिली. त्याच्या निर्मितीचे कारण, नेमका अर्थसुद्धा समजला. त्यावरून असे स्पष्ट झाले की याचा संबंध आपल्या भागातील भूवैज्ञानिक इतिहासाशी आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेला काळा पाषाण (बेसॉल्ट) आढळतो. त्याचे मुख्यत: आडवे थर पसरलेले आहेत. मात्र, पृथ्वीच्या पोटात असलेला लाव्हारस या खडकांमधील कमकुवत क्षेत्रं हेरून वर सरकला. तो तिथेच घट्ट झाला. त्यामुळे खडकाच्या या उभ्या भिंतीसुद्धा निर्माण झाल्या. आपल्या खडकाची निर्मिती झाली त्याला साडेसहा कोटी वर्षे उलटून गेली. एवढ्या मोठ्या कालखंडात पाऊस, प्रवाह, वारा, ऊन हे घटक, तसेच पृथ्वीच्या पोटातील हालचाली यामुळे खडकाचे वरचे थर झिजून गेले.
परिणामी, या उभ्या भिंतींचा वरचा भाग आता पृष्ठभागावर दिसत आहेत. या भिंती बाजूच्या खडकापासून स्पष्टपणे वेगळ्या दिसतात. त्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळतात. आता या भिंतींचे भूवैज्ञानिक रहस्य उलगडल्यामुळे त्यांचा खराखुरा अर्थ या शिक्षकांना लागला. शिक्षकांच्या भूविज्ञाबाबतच्या साक्षरतेमुळे आता हा नैसर्गिक इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे.
आपण चालवत असलेल्या उपक्रमातून हे साध्य होत असेल तर त्यापेक्षा आनंद आणखी कोणता?
- अभिजित घोरपडे
--
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862
/ bhavatal@gmail.com
No comments:
Post a Comment