Friday, 23 December 2022

मुंबई उपनगरातील पश्चिम द्रुतगती महामार्गावरीलवाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बैठक घेणार

 मुंबई उपनगरातील पश्चिम द्रुतगती महामार्गावरीलवाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बैठक घेणार

- मंत्री उदय सामंत.

            नागपूर दि 23 : इस्माईल युसुफ महाविद्यालय ते पंप हाऊस, बिंबिसार नगर ते आरे चेक नाका जंक्शन, ओबेराय मॉल रस्ता जंक्शन ते आरे चेक नाका जंक्शन या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नागपूर अधिवेशन संपल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधी, विविध यंत्रणा यांची बैठक आयोजित करून मार्ग काढला जाईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.


            मुंबई उपनगरातील पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने सदस्य रवींद्र वायकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मंत्री श्री. सामंत बोलत होते.


            मंत्री श्री. सामंत म्हणाले की, इस्माईल महाविद्यालय ते पंप हाऊसपर्यंतच्या सेवा रस्त्याच्या कामाकरिता मे.करगवाल कन्स्ट्रक्शन यांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी कार्यादेश दिले असून त्यानुसार काम सुरू करण्यात आले आहे.


            या सर्विस रोडचे काम चांगल्या पद्धतीने पूर्ण होण्यासाठी शासनाच्या वतीने कारवाई केली जाईल, तसेच बायपासचे काम चांगल्या प्रकारे होईल या दृष्टीने प्रयत्न करणार. मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या जमिनीसंदर्भात महापालिकेला सूचना दिल्या जातील. तसेच अनधिकृत बांधकामाच्या बाबत वस्तुस्थिती तपासून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री श्री सामंत यांनी सांगितले.


            पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ओबेरॉय जंक्शन ते आरे चेक नाका यादरम्यान सर्वोदय नगर येथील सेवा रस्त्यावर बेकायदेशीर उभ्या असणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या गाड्यावर मुंबई पोलीस वाहतूक विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे. या मार्गावर वाहतूक विभागामार्फत गस्त करण्यात येत असून वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहनावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi