Thursday, 8 December 2022

अभिवादन बाबासाहेब,तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही....

 अभिवादन

बाबासाहेब,तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही....


उणेपूरे मिळालेले ६५ वर्षांचे आयुष्य

त्यात ३० वर्षे शिक्षणात 

आणि १९४६ नंतरचा काळ दिल्लीत व्यस्त राहीलेला

अवघी २५ वर्षे मिळाली बाबासाहेबाना चळवळ आणि लेखनाला...

त्यात तब्येतीची अजिबात साथ नाही. 

इतक्या थोड्या काळात हा माणूस 

 नियतकालिके चालवतो, 

२३ ग्रंथ लिहितो,

शेकडो लेख लिहून 

भाषणे करत राहतो


मनुस्मृती दहन, चवदार तळे,काळाराम मंदिर आंदोलन,

 शिक्षणसंस्था स्थापना, राजकीय पक्ष स्थापन करून निवडणुका, 

गोलमेज परिषद आणि हजारो मैलांचा प्रवास...

वाचन लेखनावरची पकड सुटू न देता...


हे सारे सारे कसे जमवले असेल याचा हिशोब लागत नाही...


आजच्या नेत्यांसारखे विमान,हेलिकॉप्टर हाताशी नाही

मिडिया,इलेक्ट्रॉनिक मिडियामधून पोहोचणे नाही,

अनुयायांना संदेश द्यायला Whatsapp नाही की बोलायला फोन नाही...


खडबडीत रस्ते आणि रेल्वेतून

  गावकुसाबाहेरच्या

 त्या नॉट रिचेबल वस्त्यावस्त्यावर  


कसे वेगाने पोहोचले असतील बाबासाहेब ?


कसे पोहोचत असतील त्यांचे संदेश आंदोलनाचे, खेडी सोडण्याचे आणि पोरांना शिकवण्याचे...

पुन्हा ज्यांच्याशी संवाद करायचा,

 ती सारी माणसे काही टेक्नोसॅव्ही नसणारी...

फाटकी,निरक्षर,अन्यायाने पिचलेली, भेदरलेली


त्यांना समजेल अशा भाषेत हा पदवी घेतलेला कायदेपंडित कोणत्या सुगम भाषेत बोलला असेल...? 

की ज्या शब्दांनी गावच्या पाटलासमोर नजर वर न करणारी माणसे थेट व्यवस्थेची गचांडी पकडू शकली.....


न बघितलेल्या या माणसावर कशी श्रद्धा निर्माण झाली असेल त्या खेड्यापाड्यातील माणसांची....?


नुसत्या टाइम मॅनेजमेंट साठी तुमचा अभ्यास करायला हवा बाबासाहेब,

आणि माणसांपर्यंत पोहोण्यासाठी वापरलेल्या तुमच्या पद्धती समजून घ्यायला

 हव्यात 

कारण आज सगळी साधने हाताशी असूनही आम्ही गावकुसाबाहेरच्या माणसांपासून अनरिचेबल आहोत......कोसो दूर....


 *हेरंब कुलकर्णी* 


( हेरंबकुलकर्णी यांच्या ' अस्वस्थ क्षणांच्या नोंदी' या पुढील आठवड्यात प्रसिद्ध होत असलेल्या कवितासंग्रहातून...प्रकाशक : अस्वस्थ प्रकाशन 9921288521)

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi