Friday, 9 December 2022

शिक्षक भरती करताना माजी सैनिक आणि वीरपत्नींचा प्राधान्य

 पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांना मंत्रालयात अभिवादन.

शिक्षक भरती करताना माजी सैनिक आणि वीरपत्नींचा प्राधान्य

                                -शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

            मुंबई, दि. 8 : देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी सैनिकांचे योगदान महत्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या वीरपत्नी देखील दु:ख सहन करुन सामाजिक कार्यात अग्रस्थानी राहतात. शिक्षक, शारीरिक प्रशिक्षण शिक्षक तसेच शिक्षण सेवक पदांची भरती करताना माजी सैनिक आणि वीरपत्नींचा प्राधान्याने विचार करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. राज्यातील सैनिकी शाळांना अधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचेही ते म्हणाले.


             भारताचे पहिले सीडीएस (कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस) बिपीन रावत यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांना मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री.केसरकर यांनी अभिवादन करून आदरांजली वाहिली.


             तीन्ही सैन्यदलाचे पहिले प्रमुख असलेल्या बिपीन रावत यांच्या कार्याला उजाळा देऊन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचा भारताला अभिमान असल्याचे सांगितले. मुंबई शहर आणि शासनाच्यावतीने त्यांना आदरांजली अर्पण केली तसेच, शहीद सैनिकांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. निवृत्ती यादव या महाराष्ट्रातील पुत्राने उत्तराखंड मधील बिपीन रावत यांचे सैणा हे गाव दत्तक घेऊन तेथे पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, याबद्दल त्यांचे श्री.केसरकर यांनी कौतुक केले. या कार्याच्या एक वर्षपूर्तीनिमित्त ‘किरणपूंज’ या अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.


            यावेळी सर जेजे महानगर रक्तपेढी, मुंबईच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आला. त्यास मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी प्रतिसाद देऊन रक्तदान केले.


            यावेळी रावत यांचे बंधु देवेंद्र सिंह रावत, सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, सैनिक फेडरेशनचे मुंबई अध्यक्ष फ्लेचर पटेल, डॉ.हरिवंशराय बच्चन प्रबोधन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजन निवृत्ती यादव, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भारत वानखेडे तसेच माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबिय आदी यावेळी उपस्थित होते.


0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi