Wednesday, 7 December 2022

जी-20 परिषद

 जी-20 परिषद


महाराष्ट्राचा वारसा, संस्कृती आणि प्रगती जागतिक पातळीवर पोहोचवण्याची संधी.

           मुंबई, दि. 06 :- भारताला प्रथमच जी-20 परिषदेचे अध्यक्षपद दिनांक 01 डिसेंबर, 2022 ते 30 नोव्हेंबर, 2023 या कालावधीसाठी मिळाले असून त्यानिमित्त देशातील विविध ठिकाणी या परिषदेच्या बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात एकूण 14 बैठका होणार असून, बैठकांचा पहिला टप्पा मुंबई येथे 13 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध देशातून येणाऱ्या प्रतिनिधींना महाराष्ट्राचा वारसा, संस्कृती, परंपरा, वाटचाल आणि प्रगतीची माहिती व्हावी यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून तयारी करण्यात येत आहे. एकप्रकारे महाराष्ट्राचे ब्रॅंडींग यामधून करण्यात येणार आहे.


            राज्य शासनाचे विविध विभाग आणि ज्या शहरांत बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे, तेथील महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा वारसा आणि विविध क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने सुरु असलेली आगेकूच याचे दर्शन या परिषदेसाठी येणाऱ्या विविध देशांच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचवले जाणार आहे. राज्यात होणारी पहिली बैठक 13 ते 16 डिसेंबर दरम्यान होणार असून, त्यासाठी विविध देशातील 200 हून अधिक प्रतिनिधी दाखल होणार आहेत. या परिषदेच्या मुंबई येथे होणाऱ्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मरिन ड्राईव्ह, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय यासह जी-20 परिषदेच्या मार्गावर असणारी सर्व ऐतिहासिक वारसास्थळे, स्मारके यांचे सुशोभीकरण मुंबई महानगरपालिकेच्या विविध यंत्रणांच्या माध्यमातून केले जाणार आहे. तसेच, बांद्रा-कुर्ला संकुलातील विविध उद्योग समूहांच्या इमारतींवर रोषणाई, कान्हेरी लेणी मार्गाचे सुशोभीकरण, राजीव गांधी सेतू आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.


            राज्याच्या सांस्कृतिक कलेची ओळख परिषदेसाठी आलेल्या मान्यवरांना व्हावी, यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने दि. 13 डिसेंबर रोजी गेट वे ऑफ इंडिया जवळील हॉटेल ताज येथे महाराष्ट्रातील लोककलांवर आधारित कार्यक्रम सादर होणार आहेत तर दिनांक 14 डिसेंबर रोजी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक टेरेन्स ॲन्ड लुईस यांचे सादरीकरण असलेला कार्यक्रम वांद्रे येथील हॉटेल ताज एन्ड येथे होणार आहे.


            उद्योग विभागाच्या वतीने कार्यक्रमस्थळी तसेच मान्यवरांची निवास व्यवस्था असलेल्या ठिकाणी असे एकूण 4 स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील हस्तकला कलाकुसरीच्या वस्तू या ठिकाणी प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत.


            मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरातील महत्वाच्या ऐतिहासिक स्थळे आणि स्मारकांचे सुशोभीकरण, रस्त्यांची दुरुस्ती आणि सुशोभीकरण, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण, पदपथांची रंगरंगोटी, परिषदेच्या मान्यवरांची निवासव्यवस्था आणि बैठक ठिकाण या मार्गावर फुलझाडे लावण्यात येणार आहेत. विद्‌यार्थ्यांना ही माहिती मिळावी यासाठी विविध शाळा –महाविद्यालयात जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.  


            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही परिषद सर्वसमावेशक, कृती केंद्रीत आणि निर्णायक ठरावी आणि पर्यावरणीय बदल, साथरोग, दहशतवाद या विषयांवर चर्चा घडून यावी यादिशेने प्रयत्न करणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची ठळक ओळख जागतिक पातळीवर अधोरेखित व्हावी, यासाठी ही परिषद उपयुक्त ठरणार असल्याचे म्हटले आहे. त्यादृष्टीने विविध विभागांनी तयारी सुरु केली आहे.


००००



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi