नागपूर मेट्रो रेल प्रकल्पास गती मिळणार
नागपूर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-१ ला गती देण्यासाठी सुधारित ९ हजार २७९ कोटींच्या सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
प्रकल्पाचा मूळ मंजूर खर्च ८ हजार ६८० कोटी इतका असून त्यात ५९९ कोटी ६ लाख रुपये इतकी वाढ झाली आहे.
नागपूर मेट्रो रेल टप्पा १-प्रकल्पामध्ये ऑटोमोटीव्ह चौक ते मिहान मार्गिका क्र.१ व प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर ही मार्गिका क्र.२ अशा एकूण ३८.२१५ कि.मी. लांबीच्या दोन मार्गिकांचा व ३८ स्थानकांचा समावेश आहे. या प्रकल्पास सन २०१४ मध्ये मंजूरी देण्यात आली होती. प्रकल्पाचा मूळ नियोजित बांधकाम कालावधी एप्रिल, २०१३ ते एप्रिल, २०१८ असा ५ वर्षांचा होता. प्रत्यक्षात जून, २०१५ मध्ये कामास सुरुवात झाली. या प्रकल्पाच्या एकूण ३८.२१५ कि.मी. लांबीपैकी २६ कि.मी. वर मेट्रो सुरू आहे. प्रकल्पाची उर्वरीत १२ कि.मी. मार्गिका लवकरच कार्यान्वित होणार आहे.
प्रकल्पाच्या बांधकामास झालेला विलंब, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या क्षेत्रात तसेच किंमतीत झालेली वाढ, दोन अतिरिक्त मेट्रो स्थानकांची उभारणी, मंजूर बाह्य कर्ज अनुदानीत कॉन्ट्रॅक्ट पॅकेजेसच्या किंमतीमध्ये झालेली वाढ इत्यादी कारणांमुळे प्रकल्प खर्चात वाढ झाली आहे.
-----०-----
No comments:
Post a Comment