*श्री कळंबादेवी/कालिका देवी मंदिर*अक्षी, ता. अलिबाग जिल्हा रायगड.
संकलन - सुधीर लिमये पेण
अलिबागकडून नागावकडे जाताना अक्षी हे लहानसे गाव लागते. स्वछ समुद्रकिनारा, सुंदर वाड्या आणि तेराव्या शतकातील ऐतिहासिक शिलालेख ही या गावाची काही वैशिष्ट्ये! या गावात दोन फार जुनी आणि महत्वाची मंदिरेही आहेत. त्यातील एक।म्हणजे श्री सोमेश्वर महादेव मंदिर व दुसरे श्री कालिका देवीचे मंदिर!
अक्षी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ कालिका देवीचे सुंदर मंदिर आहे. अलीकडेच या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता ज्यामुळे या मंदिराचे रूप पूर्णपणे पालटून गेले आहे. मंदिराच्या आत प्रशस्त सभामंडप आहे व समोरच देवीच्या दोन मूर्ती आहेत. मंदिरासमोर दोन आधुनिक बनावटीच्या दीपमाळा आहेत ज्यांना लाल व पिवळ्या रंगाने रंगवलेले आहे. हे मंदिर दिसत जरी नवीन बनावटीचे असले तरी या मंदिराचा इतिहास कमीत कमी ९०० वर्षे पूर्वीचा आहे.
अक्षी गावात शिलाहार कालीन एक व यादव कालीन एक असे दोन दगडी शिलालेख आहेत. त्यातील सोमेश्वर मंदिराजवळचा शिलालेख (गद्धेगळ) शके १२१३ म्हणजे सन १२९१ मधील आहे. यादव राजा रामचंद्रदेव याचा अधिकारी श्रीजाईदेव याचा मुलगा ईश्वरदेव क्षत्रिय याने या कालिका देवीच्या मंदिरातील ब्राह्मणास दान दिल्याचा मजकूर कोरून ठेवलेला आहे. या मंदिराच्या अलीकडे ग्रामपंचायतीच्या ऑफिससमोर शिलाहार राजा दुसरा केशीदेव याचा शके ११३१ म्हणजे सन १२०९ मधला दुसरा एक शिलालेख आहे.
या शिलालेखातही या मंदिराबाबत नोंद आहे. शंकर गोपाळ तुळपुळे यांनी १९६३ मध्ये पुणे विद्यापीठात प्रकाशित केलेल्या *प्राचीन कोरीव लेख* या पुस्तकात या शिलालेखाचे वाचन पुढील प्रमाणे केले आहे. केशीदेव याचा महाप्रधान भइर्जु आणि प्रधान अधीर यांनी शक संवत ९३४ परिधावी संवत्सर, अधिक मास, द्वितीय पक्ष, शुक्रवारी या दिवशी देवीच्या बोडणासाठी नऊ कवली धान्य नेमून दिले. मो. ग. दीक्षित यांनी या शिलेखाचे वाचन करताना "नऊ कवली" असे वाचन न करता "भइर्जुतलातव्हानं उकरली" असे वाचतात. त्यामुळे या लेखाचा अर्थ बदलतो. या वचनाप्रमाणे देवीच्या सन्मानार्थ ---- उकरले (खोदले). दानविषयक भाग नष्ट झाल्याने नक्की काय खोदले याचा उलगडा होत नाही. पण त्यांनी धार्मिक कार्यासाठी पुष्करणी अथवा विहीर खोदली असावी. या मंदिराच्या बाजूला एक विहिरही आहे व सोमेश्वर मंदिरासमोर एक लहानशी पुष्करणी ही आहे. त्यामुळे या वाचनाला पुरावा मिळतो. शिवाय डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांनीही "शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख" या पुस्तकात दीक्षितांचे वाचन अधिक योग्य वाटते असे नमूद केले आहे. अर्थ कोणताही खरा असला तरी देवीचा उल्लेख दोन्ही वाचनांमध्ये आहे त्यामुळे या देवीची स्थापना १२ किंवा १३ व्या शतकात नक्कीच झाली असावी.
या मंदिराशेजारी असलेल्या छोट्या मंदिरात काही वर्षांपूर्वी खोदकाम करत असताना सापडलेल्या गजांतलक्ष्मीची स्थापना करण्यात आली आहे. हे अतिशय दुर्मिळ शिल्प क्वचितच पहायला मिळते. अलिबागमध्ये वरसोलीतील बेलेश्वर व आवासमधील वक्रतुंड मंदिरासमोर हे गजांतलक्ष्मीचे शिल्प पाहता येते.
संदर्भ:
१.प्राचीन कोरीव लेख - शं. गो. तुळपुळे (१९६३)
२. बॉम्बे प्रेसिडेन्सीचे कुलाबा गॅझेट (१८८३)
३. शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख - डॉ. वासुदेव विष्णू मिराशी (१९७४)
४. वारसा अतिताचा - पंकज समेळ (२०२१)
©️माहिती संकलन आणि फोटो: सुश्रुत निकाळजे
No comments:
Post a Comment