Sunday, 14 August 2022

जाई पूजा


 जाईची पूजा....

गोव्यात श्रावणात जाईची पूजा असते. ह्या काळात खुप जाईची फुले फुलतात. नाजूक जाईची फुले फुलतात. देवस्थानात देवस्थानाबाहेर जाईचे गजरे, वेण्या दिसतात. ह्या वेण्या हे गजरे देवीला वाहिले जातात. 

श्री शांतादुर्गा, श्री महालक्ष्मी, श्री भगवती, नव दुर्गा, आर्या दुर्गा,म्हालसा, चंडिका ह्या देवी जाईच्या आभूषणाने नटून जातात. मुळातल्या सुंदर मूर्ती आणखीनच सुंदर दिसू लागतात. देवस्थाना बाहेर देवीसाठी जाईच्या फुलांचे हार, वेण्या, गजरे देवीवर वाहण्यासाठी आणले जातात. देवीचा पूर्ण गाभारा देवीच्या जाईंच्या फुलांनी सजतो. 

नाजूकशी लहानशी फूले नशीब काढतात आणि पानांवरून सुटून सरळ देवीच्या चरणांशी येतात. ह्या फुलांच्या राशीतून देवीचा मुखवटा लोभस दिसतो. ह्या फुलांचा मंद वास गाभारा भरून टाकतो. मुळातलेच देवळातले प्रसन्न वातावरण अधिकच प्रसन्न होऊन जाते. ही फुले तशी अल्पायुषी असतात ( फुलांना आयुष्य असतं नाही कोण म्हणत ) संध्याकाळी ही फुले फुलु लागतात जणू संध्याकाळी ही फुले देवीवर सुगंधाभिषेक सुरू करतात. ह्यांचा मंद सुवास जणू मंद आवाजात मंत्रोच्चार सुरू करतो. निसर्ग निसर्गाला ज्याने निर्माण केले त्याची पूजा सुरू करतो. निसर्गाला निर्माण केल्याबद्दल ती एक कृतज्ञता म्हणून आपले सर्वस्व त्या सर्वश्रेष्ठ परमेश्वरावर ओवाळून टाकतो.उत्तर रात्री ही फूले लालसर होतात जणू येणाऱ्या सूर्यनारायण देवाच्या आगमनाची वार्ता म्हणून. जाईच्या फुलांचे नशीब खुप मोठे. देवीबरोबर त्यांचीही पूजा होते. पूजा देवीची होते आणि भाविक म्हणतात जाईची पूजा झाली.आयुष्य असेच असावे अल्पायुष्य असले तरी वाहून घेणारे जाईच्या फुलांचे जाईच्या फुलांसारखेच.

केदार अनंत साखरदांडे

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi