मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यावर भर
- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
मुंबई, दि. 7 : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी राज्य शासन केंद्र शासनाशी समन्वय साधून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत असून कंत्राटदार बदलणे, भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावणे अशा विविध स्तरावर काम करीत आहे. या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्यावर भर दिला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री अशोक चव्हाण यांनी विधान परिषदेत दिली.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. चव्हाण बोलत होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या ८४ किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येत असून यातील पनवेल ते वडखळ या ३८ किलोमीटरच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित विविध भागातील ८४ किलोमीटरपैकी ६३ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.
इंदापूर ते झराप या एकूण ३६६ किलोमीटर लांबीतील ३५५.२८० किमी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून काम तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. रस्त्याचे काम करीत असताना बाधित होणाऱ्या जलवाहिन्यांचे स्थानांतरण करण्यात येते तसेच पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी या कामाचे देयक महाराष्ट्र जीवन प्राधिकणाकडून प्रमाणित केल्यानंतरच अदा केले जाते, असेही श्री.चव्हाण यांनी यावेळी सांगितले. या चर्चेत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे आदींनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment