Friday, 10 December 2021

 -बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी

लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली

                                        - कृषी मंत्री दादाजी भुसे

           मुंबई, दि. 9 : शेतकऱ्यांना वेळेत आणि वाजवी किमतीत बियाणे आणि किटकनाशके मिळावीत. उत्पादक कंपन्यानी तयार केलेली उत्पादने उत्तम दर्जाची असावीत. बी-बियाणे आणि किटकनाशकांची विक्री होताना त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये, यासाठी उत्पादक कंपन्या आणि त्यांच्यामार्फत तयार होणारी उत्पादने यांचे ट्रॅकिंग होणारी यंत्रणा लवकरच कार्यांवित करण्यात येत असून यासाठी ई-मॉनिटरिंग प्रणाली विकसित करण्यात येत असल्याची माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

           सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या बैठकीस कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी सहसचिव गणेश पाटील, कृषी आयुक्त धीरज कुमार, संचालक दिलीप झेंडे तसेच महाआयटीचे अधिकारी उपस्थित होते.

           यावेळी श्री.भुसे म्हणाले की, राज्यातील प्रत्येक औषधी दुकानात स्टॉकची माहिती ठेवली जाते, त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या बी-बियाणे आणि कीटकनाशके यांचे ट्रॅकिंग करण्यात येणार आहे. याकरिता महाआयटी कडून ई-इन्व्हेंटरी, ई-इन्स्पेक्टर आणि ई-लॅब असे तीन वेगवेगळे अँप्लिकेशन तयार करण्यात येणार असून ही तिन्ही अँप्लिकेशन एकमेकांशी संलग्न असतील. या ई-लॅब प्रणालीमुळे उत्पादक कंपन्यात तयार झालेले उत्पादन शेतकऱ्यांच्या पर्यंत व्यवस्थित पोहोच होत असल्याची खातरजमा होणार आहे. कृषी विक्री केंद्रातून किती शेतकऱ्यांना कोणते बियाणे, कीटकनाशके दिली गेली यांचे अहवाल तयार होणार असून यामुळे काळाबाजारास आळा बसणार असल्याचे मत मंत्री श्री.भुसे यांनी व्यक्त केले.

           राज्यात महाआयटीने तयार केलेले ई-परवाना हे अप्लिकेशन सध्या पूर्ण राज्यभर वापरण्यात येत असून याचा चांगला फायदा होत असल्याचे मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.


0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi