ठाणे खाडी परिसराला रामसर क्षेत्र म्हणून मान्यतेसाठी
केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार
- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
मुंबई, दि. 9 : ठाणे खाडी परिसरात जैवविविधता असल्याने या परिसरास आंतरराष्ट्रीय रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून मान्यता मिळण्यासाठी केंद्रीय पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. यामुळे या परिसरातील जैवविविधता जपणे सुलभ होईल, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेटलँड प्राधिकरणाची चौथी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. या बैठकीत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. या बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, वनविभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी आदी उपस्थित होते.
ठाणे खाडीच्या 65 चौरस किलोमीटरच्या परिसरात 17 चौरस किलोमीटर अभयारण्य असून उर्वरित जागेत परिसंस्था (इकोसिस्टीम) असल्याने या क्षेत्रात इतर नवीन बंधने येणार नाहीत. त्यामुळे या परिसरातील जैवविविधता जपणे सुलभ होणार आहे. देशात एकूण ४६ रामसर क्षेत्र आहेत. राज्यात यापूर्वी लोणार सरोवर आणि नांदूर मध्यमेश्वर या दोन क्षेत्रांना रामसर म्हणून मान्यता मिळाली असून ठाणे खाडी क्षेत्राला मान्यता मिळाल्यास राज्यातील हे तिसरे रामसर क्षेत्र असेल.
00
No comments:
Post a Comment