राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडूनच्या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी
अर्ज स्वीकारण्यास 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड)’ करीता 18 डिसेंबर 2021 रोजी प्रवेशपात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. देशातील व राज्यातील कोविड-19 ची सद्यस्थिती लक्षात घेता मुलांसाठी व मुलींसाठी अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम मुदतीत कमांडंट, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांनी बदल केला असून त्यास 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी मुलांसाठी 30 ऑक्टोबर तर मुलींसाठी 15 नोव्हेंबर 2021 अशी मुदत देण्यात आली होती.
हा बदल लक्षात घेऊन या परीक्षेकरीता मुलांनी व मुलींनी आपले अर्ज आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे, 17, डॉ.आंबेडकर मार्ग, लाल देऊळाजवळ, पुणे - 400001 या पत्त्यावर 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत पोहोचतील याची काळजी घेऊन पोस्टाने किंवा समक्ष जमा करावेत. त्यानंतर आलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वीकारले जाणार नाहीत, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी कळविले आहे.
०००००
सकस आणि भेसळमुक्त दिवाळी साठी
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या शुभेच्छा
मुंबई, दि. 1; अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या दिवाळीत सर्वांना सकस आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सजगपणे कार्यरत असल्याचे त्यांनी आपल्या शुभसंदेशात म्हंटले आहे.
डॉ. शिंगणे आपल्या संदेशात पुढे म्हणतात, सणासुदीच्या काळात दूध व दुग्धजन्य पदार्थ, तेल, तुप यासारखे पदार्थ निर्भेळ असावेत यासाठी प्रशासनामार्फत काळजी घेतली जाते आहे. ग्राहकांनी देखील मिठाई आणि इतर खाद्य पदार्थ विकत घेत असतांना त्यावरील उत्पादन दिनांक आणि संपण्याचा (एक्स्पायरी) दिनांक बघुनच खरेदी करावी. या दिवाळीत आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेत दिवाळी आनंदाने साजरी करावी.
सर्व जनतेला दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा देत असताना यंदाच्या दिवाळीत कोरोनाचे सावट दूर व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. हात धुणे, मास्क लावणे याचा विसर पडू नये आणि प्रत्येकाने जबाबदारीने सण साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
००००
केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरीता
‘मार्जिन मनी’ उपलब्ध होण्यासाठी पात्र लाभार्थींना अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. 1 : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया या योजनेंतर्गत राज्याच्या अनुसूचित जातीच्या सवलती घेण्यासाठी पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरीता नवउद्योजक लाभार्थींनी ‘मार्जिन मनी’ भरण्याची क्षमता नसल्यामुळे या उद्योजक लाभार्थींना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी यांच्या हिश्यामधील 25 टक्के मधील जास्तीत जास्त 15 टक्के ‘मार्जिन मनी’ उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी इच्छुक नव उद्योजकांना या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज सादर करावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांनी केले आहे.
अर्ज करण्यासाठी कार्यालयाचा पत्ता सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर. सी. मार्ग, चेंबुर (पूर्व), मुंबई ४०० ०७१, दूरध्वनी ०२२ - २५२२२०२३ ईमेल आयडी acswomumbaisub@gmail.com या पत्यावर अर्ज करावा असे सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांनी कळविले आहे.
००००
No comments:
Post a Comment