*जलसंजीवनी - एक दिव्य औषध.*
पाणी हे एक दिव्य अद्भुत औषध आहे.
बेशुद्धाला शुद्धीवर आणण्यासाठी पाणी.
अंतिम समयी पाणी.
तहान लागली की पाणी.
काही सुचत नसले की पाणी.
हात पाय धुवायला पाणी.
आंघोळीसाठी सप्त नद्यांचे पाणी.
बाहेरून आलेल्याचे स्वागत करायला पाणी.
अन्न शिजवायला पाणी
प्रोक्षण करण्यासाठी पाणी
कपडे धुवायला पाणी.
भांडी घासायला पाणी.
शरीर अवयव स्वच्छ करायला पाणीच.
मल मूत्र विसर्जनानंतर पाणी.
औषधं, गोळ्या घ्यायला पाणी.
शाप देण्यासाठी
अभिमंत्रण करण्यासाठी किंवा आशीर्वाद देण्यासाठी फक्त पाणीच वापरले जाते.
प्रकुपित झालेला अग्नि, अग्नीचा दाह कमी करायला पाणी !
शरीर आणि मन यांच्या अंतर्बाह्य शांततेसाठी पाणीच.
थकलेल्या जीवाला पाणी.
घाबरलेल्या जीवाला पाणी.
दमलेल्या जीवाला पाणी
जिथे पाणी हवे तिथे पाणीच !
दुसरं काहीही चालत नाही.
माणसं चंद्रावर, मंगळावर चालली आहेत. का कशासाठी?
पाणीच शोधायला.
कारण पाणी हेच जीवन आहे. पाण्याशिवाय जीवन अपूर्ण आहे.
देवाच्या अभिषेकाचे पाणी तीर्थ म्हणून आपण प्राशन करतो.
आचमन करताना तीन पळ्या पाणीच.
आणि जेवण संपल्यावर एक पळीभर पाणीच लागते,
अमृतोऽपस्तरणमसी, किंवा अमृतापिधानमसि म्हणायला !
नैवेद्य अर्पण करायला पाणीच.
ताटाभोवती फिरवायला पाणीच.
अर्घ्य द्यायला पाणीच.
आश्वासन द्यायला पाणी.
वचन द्यायला पाणीच.
देव, ऋषी, पितर यांना पाणीच दिले जाते.
सुवेर सूतक इ. अशौचातून बाहेर पडताना पाणी.
काशी, पंढरपूरातून आलो की गंगापूजन असतेच !
दुसरं काऽऽऽही चालत नाही.
एवढं महत्त्व का आहे पाण्याला ?
आपल्या भारतीय परंपरेत या पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे.
*अकालमृत्यु हरणम्*
*सर्व व्याधी विनाशनम्*
*श्रीविष्णुपादोदकं तीर्थे*
*जठरे धारयाम्यहम्*
*स्वाहा...*
पाण्याचे रूपांतर तीर्थात आणि तीर्थाचे रूपांतर औषधामधे करण्याचे सामर्थ्य पाण्यात आहे.
दोन ओळींचा मंत्र म्हणून, पळीभर पाणी संस्कारीत करून प्यायले तर अकाली येणारा मृत्यु टळतो, एवढेच नव्हे तर सर्व व्याधींचे निवारणही हे तीर्थ करते, माझ्या मनात तसा भाव निर्माण केला जातो. हेच तर मंत्राचे सामर्थ्य आहे.
सकारात्मक विचारांनाच मंत्र म्हणतात, असं म्हटलं तरी चुक ठरणार नाही. मंत्र म्हणत, पाण्याकडे पाहून, पाण्याला उद्देशून, जर आपण पाण्याशी संवाद साधला तर ती स्पंदने पाण्यात उतरतात आणि हातातील पाणी, पाणी केवळ एच टू ओ (H2O) न रहाता, तीर्थ बनते आणि पोटात गेल्यावर ते औषध बनून काम करते.
पाण्याशी बोलल्याने, पाण्याशी संवाद साधल्याने ते त्या त्या गुणाचे बनते. पाण्याशी सकारात्मक बोलले तर परिणाम सकारात्मक. आणि नकारात्मक बोललात तर ???
मनात वाईट विचार ठेवून प्यायलेले पाणी चांगले विचार कसे निर्माण करू शकेल ?
जसा परिणाम पाण्यावर तसाच अन्नावरदेखील !
म्हणून तर उपनिषदामधे म्हटलंय *अन्नं न निंद्यात्*
अन्नपाण्याची कधीही निंदा करू नका.
एक कृती करून पहा आणि परिणाम कळवा.
हातावर पळीभर ( अर्धा चमचा ) पाणी घेऊन आपल्याला, आपल्या प्रकृतीमधे जे सकारात्मक बदल व्हायला हवेत ते पाण्याशी बोला. अगदी मोठ्याने किंवा मनातल्या मनात. केवळ भाव निर्माण केलात तरी चालतो.
_( पावसाचे, टाकीत साठवलेले, नळाचे, तळ्याचे, विहिरीचे, बोअरचे, नदीतले, झर्याचे, उकळलेले, उकळून गार झालेले, मडक्यातले, कोणतेही.. साधे, बिसलरी, पाणी वापरले तरी चालेल.)_
पण
अगदी श्रद्धेने !
विश्वासाने !!
किंतु - परंतु मनात न ठेवता कृती करा !!!
पण या प्रयोगाला एक पथ्य आहे. घरातील वास्तुदेवता सदैव "तथास्तु" म्हणत असते.
कायम सकारात्मक विचारातच रहाणे कठीण असले तरीही, जाणीवपूर्वक
घरात कधीही नकारात्मक विचार प्रकट तरी करू नका.
म्हणजे कसं ?
समजा कुणी विचारलं,
"काय कसं आहे ? "
तर मोठ्याने सांगा.
" मस्त आहे ! छान चाललंय !! बरं वाटतंय!!! "
त्यातही उगाच नकारार्थी सूर आणू नका...नाही हो, काही खरं नाही.... चाल्लंय ते बरं म्हणायचं.... आहे ते भोगायचं....असं अजिबात उच्चारू नका.
कुणाला फोन लावला तर उगाच नकारात्मक प्रश्न विचारू नका,
" दुखणं कमी झालंय ना, नाहीतर डाॅक्टर बदल. औषध बदल...
" खूपच वाईट झालं ना, असं व्हायला नको होतं,
" दिवस वाईट आलेत, सांभाळून रहा..... वगैरे वगैरे....अजिबात बोलू नका.
या नकारात्मक शब्दाऐवजी असं म्हणा.
" घाबरू नकोस. सगळं ठीक होईल."
" जे होतंय ते चांगल्यासाठीच "
" अच्छे दिन आनेवाले है, अच्छे दिन आ रहे है....."
परिस्थितीनुसार, प्रारब्धानुसार, आपल्या कर्मानुसार, जे भोगायचे ते स्वतःलाच भोगावे लागते. मग कुरकुर कशाला? सतत रडगाणे गाऊ नका. ती सर्व स्पंदने पुनः ( बूमरॅगसारखी) आपल्यापाशी परत येत असतात.
दिवसभरात केव्हाही जे पाणी आपण पितोय तेव्हा प्रत्येक वेळी पाणी पिताना, असा सकारात्मक विचार मनात आणून, पाणी प्राशन करावे.
अमुकच वेळी मंत्र म्हणायचा, असे नाही. सुवेर सूतक, शौच अशौच या अवस्थेमधे देखील असे पाणी स्वतःचे स्वतः तयार करून प्यावे.
*मनी वसे ते स्वप्नी दिसे*
विशेषत्वाने रात्री झोपताना, दीर्घ श्वसन करत दिवसभरातील सर्व ताण काढून टाकून, *फक्त अर्धा चमचा* पाणी सकारात्मक विचारांनी भारून तीर्थ बनवून घ्यावे आणि नामस्मरण करीत झोपावे.
शेवटी सर्व चालले आहे ते, आनंद निर्माण करण्यासाठी....
समाधान मिळवण्यासाठी ना !!
तथास्तु!!!
वैद्य सुविनय दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
No comments:
Post a Comment