Tuesday, 7 September 2021

 [02/09, 10:45] Mangaon Kadam: अपरिचित रायगडाचा घेरा ( भाग चौथा ) .....


मौजे रायगडवाडी....


प्रत्यक्ष शिवप्रभूंचं वास्तव्य ज्या दुर्गदुर्गेश्वरावर होतं , त्या गडाचा पायथा होण्याचं भाग्य या वाडीला लाभलंय......रायगडासंदर्भातील अर्धेआधिक खलबतं , राजकारण ज्या गावाने पाहिलंय ती हीच वाडी.......अठरा कारखान्यांपैकी काही कारखाने असलेली रायगडाची वाडी....


कोळी आवाड , हिरकणीवाडी,  परडी , टकमकवाडी , नेवाळी , खडकी आणि शिंदे आवाड अशा सात वाड्यांची मिळून रायगडवाडी आहे.......छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही सरदारांचं वास्तव्य देखील याच वाडीत होते......चितदरवाजापासून खाली वाडीकडे उतरल्यानंतर डाव्या बाजूला आज जिथं निलगिरी आणि सुरूची झाडे दिसतात....तीच पूर्वीची राजबाग होती...महाराजांनी ती खास बनवून घेतली होती.....याच राजबागेला लागून पूर्वी काही घरं होती.......वाडीमध्येही बाजारपेठ असल्याचा उल्लेख सापडतो......रायगडावर व्यापारी पेठ वसवणारा नागशेट्टी ( नागराज शेठ ) याचे निवासस्थान सुध्दा वाडीत होते , त्या भागाला ग्रामस्थ " नाग्याबाग " म्हणून ओळखली जाते.....नाग्याबागमध्ये एक पडीक जोते आणि विहीर दिसते.......अत्यंत सुबक चिरेबंदी विहीरीचं पाणी ग्रामस्थ अलीकडच्या काही वर्षांपर्यत वापरत होते......


रस्त्याच्या उजव्या बाजूला " फड" होता , याच फडात गडावर आलेल्या आगंतुकांसाठी विश्रामगृहासारखी सोय होती......इथं पडकी आणि अर्धी बुजलेली घुमटी पण पाहायला मिळते......यालाच " गोसाव्याचा मठ " असे म्हणतात.....छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू मौनीबाबांचे शिष्य तुरतगिरी यांच्यासाठी महाराजांनी मठाची स्थापना केली होती...


रायगडवाडीत आजमितीस साटम , सावंत , खोपकर , जाधव , वाडीकर , राईलकर , कडू , तांबे , हिरवे , लांबरे अशी विविध जातीधर्माची कुटुंब राहतात.... तसं म्हटलं तर बारा बलुतेदारच नांदतात.....मराठा , सोनार , चर्मकार , परीट , बौद्ध, धनगर अशी मिश्र वस्ती आढळते......


वाडीचं ग्रामदैवत झोलाई ......छत्रनिजामपूरमार्गे आल्यानंतर छत्रपती शिवराय झोलाईचं दर्शन घेऊनच गडचढाई करत असत....... अतिशय जागृत देवस्थान आहे ते......याशिवाय श्रीसोमजाई , श्रीवरदायिनी , हनुमान आणि श्री हरेश्वराचं पडीक शिवमंदिर आहे.....जावळीच्या युद्धातून पळून आलेल्या चंद्रराव मोरेंनी रायगडावर जाण्यापूर्वी याच हरेश्वराच्या मंदिरात कौल घेतला , परंतु तो कौल विरोधात गेल्याचेही नोंदीमध्ये उल्लेख  आढळतो....हरेश्वर मंदिरासमोर डांबरी रस्त्यालगत मराठा कालखंडातील काही समाधीशिळा सुध्दा दिसतात......थोडंसं अंतर पुढे चालून गेल्यानंतर " गोदावरीची समाधी " दिसते.....समाधी बोलण्यापेक्षा कुणातरी महत्वाच्या स्त्रीचं ते वृंदावन आहे....शंभर  वर्षांपासून भलेभले इतिहासकार संशोधन करून गेले , पण आजतागायत कुणीही त्या " वृंदावनाचं " रहस्य आणि कथा उलगडू शकले नाहीत......प्रत्यक्ष रायगडावर देखील  इतकं सुबक बांधकाम केलेलं वृंदावन नाही,  मग इथेच कसं ?.....रायगडवाडीत घडलेल्या त्या प्रसंगाचा काळच साक्षीदार ......आपण बापुडे काय बोलावे ?.......


अशीच एक कथा इथल्या " रायनाक" बद्दल सुध्दा......मे 1818 मध्ये पोटल्याच्या डोंगरावरून तोफा डागणार्या ब्रिटिशांना मदत केलेल्या रायनाकाला " फितुर " ठरवलं गेलं , पुन्हा त्याच निर्दयी इंग्रजांनी कडेलोटाचं बक्षिस दिलं आणि जिथं रायनाकाचा देह पडला तिथं स्मारक बनवलं गेलं......शिवरायांचे गडकोट , मेटे सांभाळणारी रायनाकाची जमात निष्ठावंत आणि विश्वासू असूनही फितुरीचा शिक्का माथी मारला गेला......


वाडीमध्ये " ब्राह्मणवाडा " कुंभारबाव अजूनही त्याच नावाने ओळखल्या जातात...हवालदाराचं घर , कारखानीसाच्या घराची जोती अजूनही खाणाखुणा सांभाळून आहेत.....वाडीपासून बाहेर पडल्यानंतर गडाच्या किंचितशा चढणीवर काही थडगी दिसतात....चाळीस वर्षे रायगड किल्ला जंजिरेकर सिद्दीकडे होता.....सिद्दी अंबर , खैर्यतखान यांच्याकडून पेशव्यांनी गड जिंकला....रायगड आणि रायगडवाडी ताब्यात असताना , सिद्दीच्या सैनिकांची ती थडगी असावीत असा एक तर्क करता येतो.....


काळ आणि गांधारीच्या मधोमध वसलेल्या , टकमक टोकाचा उत्तुंग कडा शतकानुशतके पाहत असलेली ही वाडी म्हणजे स्वराज्याची दौलतच .......


शब्दांकन - रामजी कदम 

माणगाव रायगड

[02/09, 10:45] Mangaon Kadam: अपरिचित रायगडाचा घेरा ( भाग तिसरा ) 


छत्रपती शिवरायांच्या खासगी अंगरक्षक बाजी कदमांचं " कोंझर "......


राजधानी रायगडाचा पहिला टप्पा कोंझरपासून सुरू होतो....कोंझर हे शिवकालीन महत्वाचं लष्करी ठाणं......पाचाडमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष नेहमीच असल्याने सैन्याचा तळ इथेच पडत असे......


छत्रपती शिवरायांनी गोवेलेकर सावंतांना स्वराज्यकार्यात आणले आणि याच कोंझरची चौकी त्यांच्याकडे सोपवली......आजच्या कोंझर गावात शिरताना भल्या मोठ्या आंब्याच्या झाडाजवळ ही चौकी असल्याचे उल्लेख सापडतात......गावात भवानीमातेचं मंदिर आणि ग्रामदैवत वाघजाई देवीचं देऊळही आहे.....


सरदार बाजी सूर्याजी कदम हे याच कोंझर गावचे .....छत्रपती शिवाजी महाराजांच्या  अंतिम निर्वाणाच्या वेळी राजवाड्यातील दालनात जी मोजकीच तीन चार मुत्सद्दी मंडळी होती त्यात बाजी कदम उपस्थित  असल्याची नोंद आढळते......यावरून छत्रपती शिवरायांचे अतिशय विश्वासू अंगरक्षक म्हणून बाजी कदमांचं कर्तृत्व कळतं......महाराजांच्या महापरिनिर्वाणानंतर 1689 मध्ये रायगडाला वेढा पडला असताना , छत्रपती राजाराम महाराजांना वाघ दरवाज्यातून खाली उतरवून , थेट जिंजीपर्यत ज्यांनी साथसोबत केली ते हेच बाजी सूर्याजी कदम.......परमुलुखातून शत्रूला हुलकावणी देत देत , वेशांतर करून जीवावर उदार होत आमच्या गादीच्या वारसाला सुखरूपस्थळी पोहोचवणारे शूर बाजींचे स्मरण आजही इथले कदम वंशज करतात........पण नाही चिरा , नाही स्मारक ..... 


कोंझरमध्ये कदम , देवगिरीकर , पवार , भद्रिके , जाधव, घोलप , महाडीक अशा उपनामांची कुटुंबं राहतात......ब्रिटिश काळातही इथल्या स्वातंत्र्यसैनिकांनी गावाचं नाव केलं होतं....सुरबा नाना टिपणीसांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहात कोंझरमधल्या अनेकांनी सहभाग घेतला होता......पारतंत्र्यातील हिंदुस्थानातून ब्रिटिशांना " चलेजाव " चा इशारा दिला गेला ....देशभक्तीचे बाळकडू उपजतच असलेल्या कोंझरवासीयांनी यात उडी घेतली......तुकाराम परशुराम कदम , सिताराम शंभू महाडीक,  बाळू हबाजी घोलप , रघुनाथ परशुराम पवार आणि यांचं नेतृत्व करणारे विष्णुपंत केरू खातू यांनी सक्रिय सहभाग घेतला.....महाडजवळच्या खिंडीत सत्याग्रहींची धरपकड सुरू झाली .....तत्कालीन इंग्रज सरकारने यांना तुरूंगात डांबले .....महाराजांच्या मावळ्यांनी देशासाठी हालअपेष्टा सोसल्या.....आणि आज महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या यादीत कोंझर गावचे हे पाच पांडव समाविष्ट झालेले दिसून येतात.......


कोंझर गावात आजही काही जुनी पडीक जोती दिसतात......काळाच्या ओघात गावपण हरवलं असलं तरी या शिवकालीन खेड्यात गेल्यानंतर ठायी ठायी इतिहास बोलू लागतो......गांधारी नदीच्या काठावर वसलेल्या या कोंझरमध्ये सरदार बाजी सूर्याजी कदमांचं स्मारक होणं उचित ठरेल.....थोरल्या महाराजांची सावली बनून राहिलेल्या बाजींचा इतिहास अजूनही दुर्लक्षित राहिलाय.....


गाव विकासाच्या वाटेवर असून , शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेलं आहे.....राजमाता जिजाऊ विद्यालय कोंझर ह्या ज्ञानमंदिरातून अनेक विद्यार्थी घडले.......वसंत तुकाराम कदम , विठ्ठल रामचंद्र कदम , संभे गुरूजी , नागे गुरूजी यांच्यासारख्या दूरदृष्टी लाभलेल्यांनी शिक्षणाचा पाया रचला .....तर द्वारकानाथ घोलप , शंकर भद्रिके यांच्यासारख्या ज्ञानयोग्यांनी कळस चढवण्याचं काम केलंय...... कोंझरमधील सुशिक्षित , सुसंस्कृत पिढी हे त्याच कार्याचं फलित दिसून येतंय......


माजी सभापती संजय चिखले , माजी सरपंच निलेश देवगिरकर यांच्यासारख्या राजकीय जाण असलेल्या नेत्यांमुळे विकासगंगा गावात पोहोचलेली दिसते......


छत्रपती शिवरायांचा निष्ठावंत मावळा बाजी सूर्याजी कदमांच्या स्मृती जागवत असलेले हे कोंझर म्हणजे शिवकालीन इतिहासाचे कोंदणच जणू.......


शब्दांकन - रामजी कदम 

माणगाव- रायगड

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi