महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद उत्पन्नाच्या निधीतून
योजना राबविण्याचा ग्राम विकास विभागाचा निर्णय
मुंबई,दि.31: महिला व बाल विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम राबविण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांमध्ये महिला व बाल कल्याण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बाल कल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नाच्या 10 टक्के निधीतून खालील योजना सक्षमपणे राबविण्याचा निर्णय घेतला असून याआधीचे शासन निर्णय, पुरक पत्रे व शुध्दीपत्रके या द्वारे अधिक्रमित करून गट अ प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या योजना तसेच गट ब च्या योजना (वस्तु व खऱेदीच्या योजना ) राबवण्याचा निर्णय ग्रामविकास विभागमार्फत घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
गट अ प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या योजनेअंतर्गत मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण,मुलींना स्वसंरक्षणासाठी व त्यांच्या शारिरिक विकासासाठी प्रशिक्षण,महिलांसाठी समुपदेशन केंद्र,इयत्ता 7 वी ते 12 वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण, तालुकास्तरावर शिकणा-या मुलींसाठी हॉस्टेल चालवणे, किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर,आरोग्य,कुटुंबनियोजन,कायेदविषयक प्रशिक्षण, अंगणवाड्यांसाठी स्वतंत्र इमारत,भाडे, बालवाडी व अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, आशा वर्कर्स आणि जिल्हा परिषदेअंतर्गत मानधन तत्वावर कार्यरत कर्मचारी यांना पुरस्कार देणे, पंचायत महिला शक्ती अभियान अंतर्गत पंचायत राज संस्थामधील लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण व महिला मेळावे व मार्गदर्शन केंद्र, बालवाडी व अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षण, विशेष प्राविण्य मिळवेलल्या मुलींचा सत्कार, महिला व बालकल्याण समिती सदस्यांचा दौरा या बाबींचा समावेश आहे.
तर गट ब च्या योजना (वस्तू खरेदीच्या योजना ) या मध्ये अंगणवाडींना विविध साहित्य पुरविणे, कुपोषित मुलामुलींसाठी व किशोरवयीन मुलींसाठी, गरोदर,स्तनदा माता यांना अतिरिक्त आहार,दुर्धर आजारी मुलांचे शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य, महिलांना विविध साहित्य पुरवणे, 5 वी ते 12 वी पर्यंतच्या शिकणा-या मुलींसाठी सायकल पुरवणे,या बाबींचा समावेश आहे.