Wednesday, 4 September 2024

राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेच्या दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या सत्रात "कृत्रिम बौद्धिमत्ता आणि डेटा संरक्षणा"वर भर

 राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेच्या दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या सत्रात

"कृत्रिम बौद्धिमत्ता आणि डेटा संरक्षणा"वर भर

 

मुंबई, दि. 3 : ई-गव्हर्नन्सची २७ वी राष्ट्रीय  परिषद ३ सप्टेंबर २०२४ रोजी जिओ कन्वहेक्शन सेंटर, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या परिषदेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात "डेटा गव्हर्नन्स प्रायव्हसी अँड सिक्युरिटी इन डिजिटल एज" या विषयावर चर्चासत्र झाली. यामध्ये युआयडीएआयचे सीईओ अमित अगरवाल, ग्लोबलचे सीईओ परेश शाह, 3 आय इन्फोटेकचे  ऋषी अगरवाल, नॅसकॉमचे अच्युत घोष, इझीगोव्हचे व्यवस्थापकीय संचालक अमित शुक्ला सहभागी झाले होते.

दुसऱ्या सत्रात प्रशासनामधील कृत्रिम बद्धिमत्ता या विषयावर चर्चा झाली. यावेळी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रशासनात  वापर या विषयावर माहिती देण्यात आली. यात आयआयटी गुडगावच्या अंजली कौशिक, आय.एम.एम. इंदोरचे प्रशांत सलवान (दूरदृष्य प्रणालीद्वारे), जियोचे डॉ. शैलेश कुमार, ग्रँट थोरंटन भारतचे प्रसाद उन्नीकृष्णन यांनी मार्गदर्शन केले.

या परिषदेच्या तिसऱ्या सत्रात सॅपचे लवनिश चन्ना, एन.आय.सी.च्या सपना कपूर, प्रेमसचे व्यवस्थापकीय संचालक देवरूप धर, ग्रँट थोरंटन भारतचे रामेंद्र वर्मा यांनी सहभाग घेतला.

000

अल्पवयीन मुली आणि महिलांसंदर्भातील गुन्हेगारांच्या फाशीच्या शिक्षेचा दयेचा अर्ज नाकारावा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विनंती

 अल्पवयीन मुली आणि महिलांसंदर्भातील

गुन्हेगारांच्या फाशीच्या शिक्षेचा दयेचा अर्ज नाकारावा

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विनंती

 

मुंबई, दि.4 : महिला आणि अल्पवयीन मुलींसंदर्भातील गुन्ह्यांबाबत ज्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, असे गुन्हेगार अनेकदा दयेचा अर्ज करतात. त्यांचा दयेचा अर्ज नाकारण्यात यावा, अशी विनंती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदनाद्वारे केली.

            राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांची विधान परिषदेचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी मुंबईतील राजभवन येथे भेट घेतली. यावेळी उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांना महिलांवरील अत्याचार आणि उपाययोजना संदर्भात निवेदन सादर केले आहे.

अल्पवयीन मुली आणि महिलांसोबत गंभीर गुन्ह्यांतील गुन्हेगारांना अनेकदा फाशीची शिक्षा सुनावली जाते. त्यानंतर गुन्हेगार दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे देत असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आरोपींकडून आलेले दयेचे अर्ज अनेकदा प्रलंबित राहतात आणि त्यामुळे फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही त्याची अंमलबजावणी करता येत नाही. यासाठी अशा गुन्हेगारांचा दयेचा अर्ज नाकारला जावा, अशी विनंती उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केली.

तसेच निकाल लागेपर्यंत होणारा विलंब कमी करण्यासाठी भारतातील महिला संघटनांनी एक मागणी केली आहे. गृह विभाग, विधी व न्याय विभाग या दोन्हीच्या समन्वयाने खटले तातडीने निकालात लागावेत, यासाठी कमिशनर ऑफ विमेन राइट्स म्हणजे महिलांच्या संदर्भातले आयुक्त हे विधी व न्याय विभागाचे नेमावे, अशी विनंतीही डॉ. गो-हे यांनी यावेळी केली आहे.

महिला बालविकास, आदिवासी विभाग, शिक्षण विभाग आणि सामाजिक न्याय विभागाद्वारे वसतीगृहे सुरू आहेत. येथे नियमन करणारे अधिकारी वर्ग आणि त्याच्याशी संबंधित अधिकारी वर्ग, राज्य प्रशासनातील अधिकाऱ्यांना दंड संहितेबद्दलची माहिती आणि अंमलबजावणी संदर्भात माहिती मिळावी, यासाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात यावे. असेही या निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अल्पवयीन महिला आणि मुली यांच्यावर होणाऱ्या बलात्कार आणि खून करून नंतर दयेचे अर्ज करणाऱ्या गुन्हेगाऱ्यांच्या मानसिकतेबद्दलची नापसंती व्यक्त केली. उपसभापती यांनी केलेल्या मागण्यासंदर्भात सकारात्मक विचार करून निर्णय घेणार असल्याचेही राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी यावेळी श्रीमती गोऱ्हे यांनी सांगितले.

००००


 

महिला सक्षमीकरणाचा महाराष्ट्र नवा आदर्श - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू • राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना लाभाचे वाटप • उदगीर येथे हजारो महिलांच्या उपस्थितीत सक्षमीकरण आनंद मेळावा संपन्न

 महिला सक्षमीकरणाचा महाराष्ट्र नवा आदर्श

- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

• राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना लाभाचे वाटप

• उदगीर येथे हजारो महिलांच्या उपस्थितीत सक्षमीकरण आनंद मेळावा संपन्न

 

उदगीर, (लातूर) दि. 4 सप्टेंबर : राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेक महनीय महिलांनी महाराष्ट्रात सामाजिक प्रगतीचा पाया घातला आहे. शासनाने आता महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी दमदार पावले उचलून त्यांच्या स्वावलंबन,  निर्णय शक्तीत वाढ केली आहे. महाराष्ट्राने महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श देशापुढे ठेवला आहे, अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह सुरु असलेल्या आर्थिक विकासाच्या निर्णयाचे कौतुक केले.

उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि शासन आपल्या दारी योजना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाचे कौतुक करत महिला सक्षमीकरणाला राज्य शासन चालना देत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होते. तर विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्राम विकास आणि पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आणि महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती आदिती तटकरे यांचीही उपस्थिती होती.

उदगीर येथील विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित महिलांशी संवाद साधायला मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या की, महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनांसह महिलांच्या अन्य योजनांची माहिती घेतली. याशिवाय राज्यात लखपती दिदी योजनेला मिळत असलेल्या प्रतिसादाचाही आढावा घेतला. या योजनांचे दृष्य परिणाम दिसत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

प्रत्येक कुटुंबात उदरनिर्वाह चालविण्यासाठी महिलांची मुख्य भूमिका असते. त्यामुळे महिलांनी आता राजकीय क्षेत्रातही पुढे येत देशाचे नेतृत्व करावे, असे आवाहनही त्यांनी केले. पुरुषांनी आता महिलांच्या क्षमतेला ओळखून त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी पाठबळ द्यावे. तसेच आमच्या संस्कृतीत महिलांचा सन्मान करणे पुरुषार्थ मानला जातो. प्रत्येक कुटुंबामध्ये हा सन्मान दिसून आला पाहिजे. महिलांनी सर्व आघाड्यांवर अग्रेसर राहताना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असेही त्या म्हणाल्या.

'मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण' योजना सुरुच राहील - मुख्यमंत्री

राष्ट्रपतींच्या जीवनातील संघर्ष हा सर्वसामान्य महिलांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी केलेल्या संघर्षामुळेच आज त्या देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान झाल्या आहेत. या ठिकाणी उपस्थित महिलांना राष्ट्रपती महोदयांच्या यशाचे कौतुक असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम राहणार असल्याचे स्पष्ट करत राज्य शासनाने केंद्र शासनाच्या लखपती दिदी योजनेसह मुख्यमंत्री लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रम योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत योजना, अन्नपूर्णा योजना, शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी योजना यासह महिलांच्या सशक्तीकरणावर भर असलेल्या योजनांमुळे शासन सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती पुढेही चालूच राहणार आहे. माझी एकही बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि माता भगिनींचा आशिर्वाद कायम राहिल्यास दीड हजाराची रक्क्कम वाढविली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश आर्थिक महासत्ता बनण्याकडे अग्रेसर असून, अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. महाराष्ट्र देशाच्या प्रगतीत कायम आघाडीचे राज्य राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिली.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे सामान्य कुटुंबातील एक संघर्षशील महिला आपल्यापुढे राष्ट्रपती म्हणून विराजमान आहेत. तर मागास वर्गीयाचे प्रतिनिधीत्व नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्यामुळे संविधान बदलाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

संविधान बदलू शकणार नाही – रामदास आठवले

राज्य, देशाच्या विकासासाठी आणि संविधान मजबूत करण्यासाठी सर्वजण प्रयत्नरत असून, कोणीही देशाचे संविधान बदलू शकत नसल्याचा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. तसेच राज्याची विकासाची गाडी पुढे नेताना महिलांना आर्थिक ताकद देत त्यांनाही विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

घटनारक्षण प्रथम कर्तव्य – देवेंद्र फडणवीस

जगातील सर्वात उत्तम संविधान हे भारताचे असून, ते कोणीही बदलू शकणार नाही, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, केंद्र व राज्य शासन संविधानानुसारच काम करत आहे. केंद्र शासनाच्या नेतृत्वात राज्य शासनाने केंद्र शासनाकडून चैत्यभूमीची जागा परत घेतली आहे. तसेच लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घर लिलावात विकत घेतले आहे. शिवाय जपानमधील कोयासन विद्यापिठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पानुसार २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवायचे आहे. या विकास प्रक्रियेत महिलांचाही तेवढाच महत्त्वपूर्ण सहभाग राहणार असल्यामुळे केंद्र व राज्य शासन पुरस्कृत महिला सक्षमीकरणाच्या विविध योजनांचा त्यांनी उल्लेख केला. या योजना बंद पडणार नाहीत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

सक्षमीकरणात महाराष्ट्र प्रथम - आदिती तटकरे

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात 1 कोटी 60 लाखांपेक्षा जास्त महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. लवकरच अडीच कोटीवर महिलांना लाभ मिळेल, असे महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती आदिती तटकरे यांनी सांगितले.

अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या या योजनेतून राज्यातील महिलांच्या विकासात मोठा बदल घडून येणार असून, महिलांच्या विकासात कोणतीही कसर राहणार नाही. महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देण्याचे काम राज्य शासनाने केले आहे. राज्यात बालकांच्या नावापुढे आईचे नाव लावणारे हे देशातील पहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा व मेडिकल द्या - संजय बनसोडे

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे म्हणाले, बुद्धाच्या शांततेच्या विचार मार्गावरूनच जगाला पुढे जावे लागणार आहे. उदगीरातील धार्मिक, ऐतिहासिक स्थळातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जातो. 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतून पुरोगामी महाराष्ट्रात नवा प्रकाशमार्ग निर्माण केला आहे.

यावेळी त्यांनी उदगीर शहराच्या विकासकामांची उपस्थितांना माहिती दिली. उदगीरमध्ये जिल्ह्याची क्षमता असून, उदगीरची जिल्हा निर्मिती करावी तसेच येथे वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी द्यावी, अशी मागणी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी केली.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या हस्ते उदगीर येथे ‘शासन आपल्या दारी’ या पुस्तकाचे विमोचन झाले आणि त्याची पहिली प्रत राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना भेट देण्यात आली. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू आणि राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या हस्ते महिलांना लाभवाटप करण्यात आले.

००००


अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देणार

 अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

लातूर, दि. ०४ : लातूर जिल्ह्यात २ सप्टेंबर रोजी ३२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. यावेळी त्यांनी उदगीर तालुक्यातील हेर आणि लोहारा शिवारातील पीक नुकसानीची पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली.

शेतकऱ्यांना मदत करताना नियम, निकष न पाहता एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल. राज्य शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून यावेळी झालेल्या नुकसानीच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना लवकरात नुसकान भरपाई देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्यासह माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर यावेळी उपस्थित होते.

२ सप्टेंबर रोजी उदगीर, जळकोट तालुक्यातील सर्व महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना तातडीने नुकसान भरपाईबाबत आश्वस्त केले.

मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यानंतर लगेचच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लातूर जिल्ह्यातही अतिवृष्टीने सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आज प्रत्यक्ष पाहणीमध्ये दिसून आले. सोयाबीन पिकामध्ये अजूनही पाणी साचलेले दिसत आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल.

अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात येईल. पंचनाम्याचे अहवाल येताच नुकसानभरपाईबाबत पुढील कार्यवाही तातडीने केली जाईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

००००


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण

  

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 

विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण


 


लातूर, दि. ४ : उदगीर (जि.लातूर)येथील तळवेस परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, सर्वश्री आमदार विक्रम काळे, रमेश कराड, अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे उपस्थित होते.


             राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण, फीत कापून विहाराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी विहारातील गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बुद्ध वंदना झाली. वंदनेनंतर उपस्थित बौद्ध भिक्कूंना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चिवर दान केले. बौद्ध भिक्कू यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गौतम बुद्धांची मूर्ती भेट दिली. क्रीडा मंत्री श्री. बनसोडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.


विहाराची वैशिष्ट्ये


उदगीर येथील विहार कर्नाटक येथील कलबुर्गीच्या बुद्ध विहाराची प्रतिकृती आहे. एक हेक्टर १५ आर एवढ्या जागेवर या विहाराची उभारणी करण्यात आली आहे. विहारात १२०० अनुयायांची बैठक व्यवस्था असलेले ध्यान केंद्र तयार करण्यात आले आहे. विहार परिसरात प्रवेश करण्यासाठी एक मुख्य प्रवेशद्वार तयार करण्यात आले असून या प्रवेशद्वाराची रचना बिहारमधील सांची स्तूपाप्रमाणे करण्यात आली आहे.  

कलाकारी जीवनाची

 *जीवन कृपया इस तस्वीर को झूम करके देखें। ऐसा लगता है, मानों कोई* *व्यक्ति* *बैठकर पुस्तक पढ़ रहा है या प्रार्थना कर रहा है।* *परन्तु वास्तव में ये अलग अलग पत्थर मात्र हैं और इनका कोई* *आपसी सम्बन्ध नहीं है, लेकिन दूर से एक रेखा में देखने से ऐसा आभास होता है* कि *जैसे कोई बैठा हो !* 

 *जीवन भी इसी तरह का है। जो जैसा दिखता है, वो वैसा होता नहीं है और* जो *जैसा है, वह वैसा दिखता नहीं है। कभी उसके* *व्यक्तित्व के कारण और कभी हमारे दृष्टिकोण के कारण...* 

 *आपका मंगल हो* 🌹🙏


Tuesday, 3 September 2024

ई-गव्हर्नन्स हा शासनाचा आत्मा, ई-गव्हर्नन्समुळे कामे अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होण्यास मदत

 ई-गव्हर्नन्स हा शासनाचा आत्मा,

ई-गव्हर्नन्समुळे कामे अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होण्यास मदत

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.3 : ई-गव्हर्नन्स हा शासनाचा आत्मा असून ई-गव्हर्नन्समुळे कामे अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होण्यास मदत होत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर येथे आयोजित 27 व्या राष्ट्रीय गव्हर्नर परिषदेत ते बोलत होते.यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, माहिती तंत्रज्ञानचे प्रधान सचिव पराग जैन यांच्यासह केंद्रीय सचिव व्ही.श्रीनिवास, सचिव एस. कृष्णन, अतिरिक्त सचिव पुनीत यादव उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबई फक्त आर्थिक, मनोरंजन, सांस्कृतिक राजधानी नसून आता एक टेक्निकल राजधानी व्हायला हवी अशी आशा व्यक्त केली.   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई भारताची फायनान्स टेक्नोलॉजीकल (fintech) राजधानी व्हावी असे म्हटले याची आठवण देखील  उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

राज्य शासनाने 'आपले सरकार' हे पोर्टल २०१४ रोजी सुरू केले. सेवांच्या अधिकाराखाली अनेक सेवा या डिजिटल पोर्टलवर आणल्या. समाजातील कोणताही घटक सेवांपासून वंचित राहू नये असे याचे उद्दिष्ट आहे. आपले सरकार या पोर्टलचा वापर राज्यातील लोक मोठ्या प्रमाणावर करतात. आपले सरकार या पोर्टलकडून नागरिकांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामुळे नागरिक संतुष्ट असल्याचे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, सध्याच्या युगात डेटा अतिशय मौल्यवान आहे. त्याचबरोबर या डेटाचे जतन, संरक्षण करण्यासाठी नवीन साधने  आणणे गरजेचे आहे. ई गव्हर्नन्समुळे शासन अधिक कार्यक्षम झाले आहे. तसेच नागरिकांचे आयुष्य सहज आणि सुलभ झाले. डिजिटल युगामुळे ई - गव्हर्नन्सला अधिक वेग मिळत आहे. कामाचा दर्जा वाढला आहे. नागरिकांची कामे सहज सुलभ होण्याबरोबरच वेळेचीही बचत झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध राज्यांच्या प्रतिनिधींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

0000

Featured post

Lakshvedhi