Wednesday, 9 August 2023

मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांनामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण प्रतिज्ञा

 




मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांनामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण प्रतिज्ञा

            मुंबई, दि. 9 : “आम्ही शपथ घेतो की, भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू, भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू, देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू", अशी पंचप्रण शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयातील अधिकारी- कर्मचारी यांना दिली.


            "माझी माती, माझा देश" या अभियानांतर्गत आज मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, ‘माझी माती माझा देश’ अभियानाचे नोडल अधिकारी (ग्रामीण) एकनाथ डवले आणि नोडल अधिकारी (शहरी) गोविंद राज, पोस्ट मास्तर जनरल अभिकांत सिंग तसेच मंत्रालयातील प्रशासकीय व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री.शिंदे यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श कार्य डोळ्यासमोर ठेवून आपण राज्याचा कारभार करत आहोत. लोकाभिमुख निर्णय घेण्याचे तसेच जनतेला न्याय देण्याचे काम हे शासन करत आहे. 2023- 24 च्या अर्थसंकल्पात नमूद विकासाच्या पंचसूत्रीनुसार देशातील सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आपले सरकार करत आहे. ज्या वीरांनी आपल्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या वीर हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे. त्यांच्या शौर्याला स्मरण करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.


            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले की, देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. वीर शहिदांची महती त्यांनी वर्णित केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी चालविलेला राज्यकारभार, त्यांचे प्रशासन याबाबतही श्री.मुनगंटीवार यांनी आपले विचार मांडले.


            छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत असल्याने महाराष्ट्र शासनाकडून दर महिन्याला एक विशेष टपाल तिकीट किंवा विशेष आवरणाचे विमोचन करण्यात येते. याप्रसंगी भारतीय टपाल विभागाने तयार केलेल्या शहाजीराजे भोसले यांच्या विशेष टपाल आवरणाचे विमोचन सर्व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.


            13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या "घरोघरी तिरंगा" या अभियानाची सुरुवात उपस्थित सर्व मान्यवरांना कापडी तिरंगा ध्वज देऊन यावेळी करण्यात आली.


            छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण होत असल्याने सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे स्मरण करणारी 2 ते 3 मिनिटांची उद्घोषणा वर्षभरासाठी मंत्रालयात कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.45 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. याही उपक्रमाची सुरुवात आजपासून मंत्रालयात करण्यात आली.


            यावेळी राज्य शासनाच्या लाभात असलेल्या दोन महामंडळांनी आपापला लाभांश धनादेशाद्वारे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांना सुपूर्द केला. यात वन विकास महामंडळाचे 3 कोटी 27 लाख 50 हजार रुपये आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळाचे 1 कोटी 34 लाख 15 हजार 733 रुपयांचा समावेश आहे.


            सांस्कृतिक कार्य मंत्री कार्यालयाला आय.एस.ओ. प्रमाणपत्र मिळाले असून हे प्रमाणपत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान करण्यात आले.


            सुरुवातीला "माझी माती, माझा देश" या उपक्रमाची रूपरेषा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी विषद केली.


000

बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करा-वसंत मुंडे --------

 बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करा-वसंत मुंडे                                          

------------------------------

मुंबई (प्रतिनिधी):- देशात ओबीसीला आरक्षण 1990 पासून बी.पी. मंडल आयोगामुळे लागू करण्यात आले. भाजप सरकारने आरएसएसच्या मनुवादी संस्कृतीच्या दबाव तंत्रामुळे ओबीसी आरक्षण रद्द करण्याची मोहीम आखल्याचा आरोप ओबीसी काँग्रेसचे उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला.

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात ओबीसी जनगणना करण्यात आली. त्यामध्ये ओबीसीचा डाटा देण्यासंदर्भात वेळ काढून धोरण महाराष्ट्रातील बीजेपी सरकारने स्वीकारल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात ओबीसी जनगणनेचा डाटा मुद्देनिहाय उपलब्ध नाही तसे राज्य सरकारने शपथपत्र सादर करून महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य मतदार संघातील ओबीसी आरक्षणावर गदा आली असून आरक्षणासंदर्भात वास्तव्य दर्शन माहिती संकलित केल्याशिवाय ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षणाच्या जागा राज्य निवडणूक आयोगाला देताना अडचण निर्माण खंडपीठाने स्पष्ट आदेश केल्यामुळे झाली. 13 डिसेंबर 2021 च्या जातीने जनगणना संदर्भात एसीपीसी संदर्भ देऊन ओबीसी जातीची कच्ची यादी देण्याकरता महाराष्ट्र सरकारने केंद्रीय प्राथमिक प्राधिकरणाकडे पत्रावर केलेला आहे. मनमोहन सिंग सरकारने ओबीसीच्या जनगणना संदर्भात पाच हजार कोटी रुपये खर्च करून व ओबीसीचा डाटा हे राष्ट्रीय संपत्ती असून ती सर्वशी जबाबदारी भारत सरकारची आहे.

परंतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी 12 जून 2018 ला केंद्र सरकारकडे पत्र देऊन गुपित माहिती ठेवण्याचे सूचना आरएसएस च्या विचारधाराचे बीजेपी सरकारने त्यांना दिली. बीजेपीचे धोरण भारत देशामधील संपूर्ण आरक्षण मुक्त करण्यासाठी डावपेच चालू आहेत. देशामध्ये पशुपक्षी जनगणना होते परंतु ओबीसीची जनगणना केली जात नाही असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेल्या बिहार राज्य प्रमाणे जातीनिहाय सवैक्षणातून प्रमाणिक विश्वासार्ह आणि शास्त्रशुद्ध आकडेवारी जनगणने मधून प्राप्त होईल. भारत देशामध्ये ओबीसी ची वेगवेगळ्या राज्यात लोकसंख्या 50 ते 70 टक्के आहे. त्यामुळे उद्या देशातील सर्वच निवडणुकीमध्ये ओबीसी जागा झाला तर उलथापालथ निवडणुकीमध्ये व सरकारमध्ये होऊ शकते असे दडपण भाजप आरएसएसच्या विचारधारेच्या सरकारमध्ये असल्यामुळे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात गुपित कारवाई केली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी केला.

देशांमध्ये तीन हजार पेक्षा जास्त ओबीसी मध्ये जाती असून क्रिमिनल अट रद्द करून ओबीसी अंतर्गत सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासल्यापणाच्या आधारावर वर्गीकरण करून जातीनिहाय जनगणना आर्थिक सर्वेक्षणामध्ये नियमानुसार सर्व बाबी तपासून महाराष्ट्राचे मध्ये जनगणना करण्यात संदर्भात आदेश देण्याची मागणी काँग्रेसचे वसंत मुंडे यांनी केली महाराष्ट्र शासनाकडे निवेदनाद्वारे केली.

प्रा. हरी नरके यांच्या निधनानेपुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड विचारवंत गमावला

 प्रा. हरी नरके यांच्या निधनानेपुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड विचारवंत गमावला

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि.९:- “महाराष्ट्रातील पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड असा विचारवंत आपण गमावला आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.


            “महाराष्ट्राच्या विचार - व्यासपीठावर आपल्या अभ्यासपूर्ण आणि परखड विचारांनी प्रा. हरी नरके यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. फुले - शाहू - आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्रासह सर्वदूर पोहोचावा यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा जीवनपरिचय आणि त्यांच्या विषयीचे संशोधनात्मक लेखन यांचा त्यांचा व्यासंग होता. यातून त्यांनी उत्कृष्ट अशा ग्रंथसंपदेची निर्मिती केली. वक्तृत्वाची आगळी शैली आणि अभ्यासपूर्ण मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी समता परिषदेच्या माध्यमातून रचनात्मक काम केले. त्यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळ आणि राज्यातील अभ्यास - संशोधनात्मक लेखन प्रवाहाची हानी झाली आहे,” असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


0000


वृत्त क्र. 2687

प्रा. हरी नरके यांच्या निधनानेओबीसी, परिवर्तनवादी चळवळीतील बुद्धिवादी व्यक्तिमत्व हरपले

- उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबई, दि. 9 :- "ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा असलेला, ओबीसी हक्कांसाठीच्या चळवळीत आघाडीवर राहून लढणारा कृतीशील कार्यकर्ता आपण गमावला आहे. ते सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक, परखड भाष्यकार होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक, संशोधक, व्याख्याते ही त्यांची ओळख होती. तत्कालिन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले होते. प्रा. हरी नरके यांनी अनेक शासकीय समित्यांवर तज्ज्ञ सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांच्या निधनानं दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांची बाजू हिरिरीने मांडणारे, ओबीसी चळवळीला वाहून घेतलेले बुद्धिवादी व्यक्तिमत्व हरपले आहे. त्यांचे निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, परिवर्तनवादी चळवळीची हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यानी प्रा. हरी नरके यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धां

जली वाहिली आहे.


००००


बालगृहांच्या सुरक्षेसाठी बायोमेट्रिक प्रणालीआणि सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करावे

 बालगृहांच्या सुरक्षेसाठी बायोमेट्रिक प्रणालीआणि सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करावे


- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे


 


            मुंबई, दि. ८ : बालगृहांमधील बालकांच्या सुरक्षेसाठी एका महिन्यात बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत. बालकांना देण्यात येणाऱ्या अन्न, सुरक्षा आणि स्वच्छतेबाबतचा अहवाल दर तीन महिन्यांनी सादर करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.


            राज्यातील बालगृहे, विशेष गृहे, खुले निवारा गृह, बालकांसाठी सुरक्षित ठिकाण, अनुरक्षणगृहे याबाबत आज मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार श्रीवास्तव, आयुक्त प्रशांत नारनवरे, सहसचिव शरद अहिरे, सह आयुक्त राहुल मोरे बैठकीत उपस्थित होते.


            मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, ज्या संस्थांमध्ये बालकांसंदर्भात गैरप्रकार घडले आहेत अशा संस्थांची नावे काळ्या यादीत टाकण्यात यावीत.


            बालकांसाठी अशासकीय संस्था तसेच शासकीय अनुदानावर सुरू असलेल्या संस्थांच्या अन्न, सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत कार्यप्रणाली तयार करावी, त्यांची तपासणी करून दर तीन महिन्याला अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. बालकांना चांगल्या प्रतीचे खाद्य मिळावे यासाठी मानक कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा.


            कार्यरत असलेल्या बालगृहांच्या संस्थाद्वारे मुलांना देण्यात येणाऱ्या सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख करण्यावर जास्त भर देण्यात यावा, बालसंगोपन योजनांसंदर्भात जनजागृती करण्याच्या सूचनाही मंत्री कु. तटकरे यांनी दिल्या.


            तसेच, बालगृहांतील रिक्त जागांबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.


०००


श्रद्धा मेश्राम/ससं/

नारळी पौर्णिमे दिनी "शेतकरी दिन” साजरा करण्यात येणार

 नारळी पौर्णिमे दिनी "शेतकरी दिन साजरा करण्यात येणार

— पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील


            मुंबईदि. ८ : यावर्षी ३० ऑगस्ट२०२३ रोजी म्हणजेच नारळी पोर्णिमा दिनी राज्यात 
शेतकरी दिन साजरा करण्यास येणार आहे.

            पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे स्मरणार्थ २९ ऑगस्ट हा दिवस "शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. दरवर्षी हा दिवस मराठी तिथीप्रमाणे शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांकरिता केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा म्हणून यावर्षी ३० ऑगस्ट२०२३ या नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
            शेतकरी दिन साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना कृषी आयुक्तालयाने निर्गमित करण्यात येणार आहेत. या दिवशी
वेबिनार संवाद / मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या
 www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाची उलाढाल दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे

 महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाची उलाढाल दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे

- कृषी मंत्री धनंजय मुंडे

कृषी विभागाच्या भूखंडांवर शेतकरी व ग्राहक उपयोगी उपक्रम राबवणार

 

            मुंबई, दि. 8 :- शेतकऱ्यांना लागणारी खतेकीटकनाशककृषी अवजारे तसेच शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या मालावरील प्रक्रिया उद्योग यामधील नाविन्यता शोधून महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची उलाढाल पुढील वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावेअसे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

            महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिनस्त असलेला महामंडळाच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. मंत्रालयात झालेल्या या बैठकीस कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमारकृषी आयुक्त तथा महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाणउपमहाव्यवस्थापक सुरेश सोनवणेसुजित पाटीलज्योती देवरेमहेंद्र बोरसेमहेंद्र धांडे, देवानंद दुथडेगणेश पाटील यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

            कृषीमंत्री श्री. मुंडे म्हणाले, महामंडळाची 13 विभागीय कार्यालये आणि 10 उत्पादन घटक कार्यरत आहेत. त्यामध्ये खत कारखानेपशुखाद्य कारखानेएम.आय.एलकृषी अभियांत्रिकी कारखाना यांचा समावेश आहे. या कारखान्यांमध्ये उत्पादनासाठी आवश्यक कच्चा माल घटक केंद्र सरकारद्वारे नियंत्रित प्रमाणात वितरित केले जात आहे.

            त्याचबरोबर महामंडळ आणि कृषी विभागाच्या अधिनस्त असलेल्या जागा विना वापर पडून असून काही ठिकाणी अतिक्रमण वाढत आहे. अशा जागांचा अभ्यास करून त्यावर शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यासाठी उपयोगी ठरणारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने सुरू करण्याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी दिले.

00000

स्मार्ट’ने नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करावे

 स्मार्ट’ने नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करावे

- कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

 

            मुंबई, दि. 8 : लहान, सीमांत शेतकरी तसेच कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) ने नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले

            बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट)ची आढावा बैठक कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. यावेळी कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषि आयुक्त सुनिल चव्हाणस्मार्टचे प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर, आत्माचे कृषि संचालक दशरथ तांभाळे, स्मार्टचे अतिरिक्त प्रकल्प संचालक ज्ञानेश्वर बोटे, कृषि विभागाचे उपसचिव संतोष कराड तसेच संबंधित इतर अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. मुंडे म्हणाले, पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये ‘स्मार्ट’ प्रकल्पासाठी उपलब्ध असलेल्या जागेवर शेतकऱ्यांसाठी फळ व भाजीपाला स्टॉल उपलब्ध करून  द्यावेत्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल. याचे एक मोबाईल अँप तयार करावे. हे पुणे येथे यशस्वी झाल्यानंतर मुंबईनवी मुंबई याठिकाणी राबविण्यात येईल. विदर्भ मराठवाड्यातील प्रमुख पिकांसाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवण्यासाठी स्मार्टने नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करावा. बाजार जोडणीसाठी शेतकरी समुदाय आधारित संस्थांना संघटित खरेदीदारांशी प्रक्रिया उद्योगनिर्यातदारसंघटित किरकोळ विक्रेते यांच्याशी थेट जोडणी आणि कमीत कमी मध्यस्थांची संख्या असलेल्या कार्यक्षम मूल्य साखळ्या विकसित करण्यात याव्यात. कापसाबाबत एकजिनसी व  स्वच्छ कापसाची निर्मिती करून निवडलेल्या जिनिंग मार्फत स्वतंत्र व वेगळ्या स्मार्ट कॉटन ब्रँड अंतर्गत मूल्यवृद्धी गाठी तयार करून त्याची ई-टेंडिंग प्लॅटफॉर्म मार्फत विक्री करावी. राज्यातील महिला सक्षमीकरणासाठी शेतकरी उत्पादक संस्थाना त्याची व्यवसायाभिमुख क्षमता बांधणी करण्यात यावी.

        तसेच हवामान अंदाजाप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतमालाला पुढील वर्षी अंदाजित किती बाजारभाव मिळेल याविषयीही विभागाने अभ्यास करणे आवश्यक आहे. भविष्यात शेतकऱ्यांनी कुठले पीक घ्यावे यासाठी हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे असेही मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/


Featured post

Lakshvedhi