Friday, 4 August 2023

सोलापूर जिल्ह्यातील पात्र चारा छावण्यांचीप्रलंबित देयके अदा करण्यासाठी लवकरच कार्यवाही

 सोलापूर जिल्ह्यातील पात्र चारा छावण्यांचीप्रलंबित देयके अदा करण्यासाठी लवकरच कार्यवाही


- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


            मुंबई, दि. 3 : सोलापूर जिल्ह्यात सन 2019-20 मध्ये चारा छावण्या उघडण्यात आल्या होत्या. यातील एप्रिल ते ऑक्टोबर 2019 या कालावधीतील प्रलंबित देयके अदा करण्यासाठी सुधारित प्रस्ताव मुख्य सचिव यांना प्राप्त झाला आहे. अहवाल शासनास सादर झाल्यानंतर पात्र चारा छावणींची देयके अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.


            सदस्य जयंत पाटील यांनी याअनुषंगाने लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचविण्यासाठी चारा छावणी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येतो. सन 2019-20 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील 10 तालुक्यांत एकूण 299 चारा छावण्या उघडण्यात आल्या होत्या. त्याकरिता सन 2019-20 व सन 2020-21 मध्ये एकूण 245.23 कोटी इतके अनुदान जिल्हाधिकारी, सोलापूर यांना वितरित करण्यात आले होते. त्यापैकी 206.55 कोटी इतके अनुदान चारा छावणी चालकांना वितरीत करण्यात येऊन, उर्वरित 38.68 कोटी इतका निधी जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी समर्पित केला होता. सांगोला तालुक्याकरिता 146 चारा छावण्यांसाठी 131.77 कोटी इतका निधी वितरित केला होता. त्यापैकी 109.20 कोटी इतका निधी प्रत्यक्षात चारा छावणी चालकांना वितरित झाला व उर्वरित 22.56 कोटी इतका निधी समर्पित करण्यात आला. तसेच मंगळवेढा तालुक्याकरिता 61 चारा छावण्यांना 47.81 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला होता. त्यापैकी 33.17 कोटी इतका निधी प्रत्यक्षात चारा छावणी चालकांना वितरित करण्यात येऊन उर्वरित 14.64 कोटी इतका निधी समर्पित करण्यात आला.


            एप्रिल ते ऑक्टोबर 2019 या कालावधीतील प्रलंबित देयके अदा करण्यासाठी विभागीय आयुक्त, पुणे यांनी शासनाकडे अनुदान मागणीचा प्रस्ताव सादर केला होता. तथापि त्यात त्रुटी असल्याने सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडील बैठकीमध्ये देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सुधारित प्रस्ताव 28 जुलै 2023 रोजीच्या पत्रानुसार शासनास प्राप्त झाला आहे. पात्र चारा छावणींची देयके अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे मंत्री श्री.विखे पाटील यांनी सांगितले. या अनुषंगाने संबंधित विधान परिषद सदस्यांच्या मागणीनुसार त्यांच्यासमवेत बैठक आयोजित केली जाईल, असेही ते म्हणाले.


            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.


00000




Thursday, 3 August 2023

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड

 विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड



मुंबई, दि. ३ : महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या निवडीची घोषणा विधानसभेत केली.


            त्यानंतर सर्व विधानसभा सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उपस्थित मंत्री आणि विधानसभा सदस्यांनी श्री.वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले.


विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी विरोधी पक्षनेते श्री.वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला.


विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहाची परंपरा उत्कृष्टपणे चालवतील - विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर


सभागृहाला विरोधी पक्षनेते पदाची मोठी परंपरा लाभलेली आहे. या पदावर विराजमान व्यक्तीची जबाबदारी अधिक आहे. विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार हे सभागृहाची परंपरा उत्कृष्टपणे चालवतील, असा विश्वास विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी व्यक्त केला.


            विरोधी पक्षनेत्याचे कर्तव्य फक्त समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे नाही तर, वेळप्रसंगी काही घडताना जे लोक गप्प राहतात त्यांना ते लक्षात आणून देणे, हे आहे. श्री. वडेट्टीवार ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील. यापूर्वीही सभागृहातील विविध खात्यांच्या मंत्री पदांची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून राजकीय, सामाजिक कार्याचा शुभारंभ त्यांनी केला. वन कामगार, शेतकरी, विद्यार्थी, वनशेती आंदोलने त्यांनी केलेली आहेत. लोकहिताच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणारे नेते, अशी त्यांची प्रतिमा आहे, असे सांगून कर्तृत्ववान नेत्याला या सभागृहाच्या विरोधीपक्षनेता नियुक्तीबद्दल मी शुभेच्छा देतो, असेही ॲड. नार्वेकर म्हणाले.


लोकशाही सक्षम राहण्यासाठी विरोधी पक्षनेता महत्त्वाचा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


विरोधी पक्ष हा लोकशाहीचा आत्मा आहे. लोकशाही सक्षम राहण्यासाठी विरोधी पक्षनेता हे पद महत्त्वाचे आहे. विजय वडेट्टीवार ही जबाबदारी सक्षमतेने सांभाळतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री. वडेट्टीवार यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.


महाराष्ट्राला विधायक काम करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांची परंपरा आहे. राजकारणातील गैरसमज दूर करणे, राजकारण लोकाभिमुख करणे हे आपल्या सर्वांचे काम आहे. मतमतांतर, विचारांचे आदानप्रदान झालेच पाहिजे. विकासकामांसाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एखादी गोष्ट पटली नाही तर जरुर टीका करावी, मात्र चांगल्या गोष्टीचे कौतुकही त्यांनी करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केली.


आदिवासी, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या आंदोलनात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी श्री. वडेट्टीवार यांनी त्यात सक्रीय सहभाग घेतला व त्याचे नेतृत्व केले. याशिवाय, गडचिरोली जिल्हा व्हावा म्हणून त्यांनी सातत्याने आंदोलने केली. ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे सूत्र त्यांनी आजवर कायम पाळले आहे. राज्यातील शेतकरी, दुर्बल घटक, महिला यांना अधिकाधिक सक्षम करायचे आहे. विरोधाला विरोध किंवा राजकीय अभिनिवेष बाजूला ठेऊन महाराष्ट्र देशात अव्वल क्रमांकावर नेण्यासाठी विरोधीपक्षनेता म्हणून ते सहकार्य करतील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केली.


जनतेच्या हितासाठी व्यापक कार्य करतील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


सभागृच्या विरोधी पक्षनेतेपदी सक्षम विरोधी पक्षनेत्यांची मांदियाळी पाहायला मिळते. जनसामान्यांच्या हितासाठी शासनाच्या माध्यमातून विरोधी पक्षनेत्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय करून घेतले आहेत. विजय वडट्टीवार यांची जमिनीशी जोडलेला नेता म्हणून ओळख आहे. जनतेच्या हितासाठी ते व्यापक कार्य करतील, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.


उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांनी जिथे शासनाचे चुकले, तिथे त्यांना धारेवर धरले. अनेक वेळा संपूर्ण सभागृह एकत्र असले पाहिजे, त्यावेळी एकदिलाने त्यांनी अनेक प्रस्ताव मांडले आहेत, ही परंपरा आहे. विरोधी पक्ष नेतेपदाचा मान सन्मान वाढविण्याकरिता विजय वडेट्टीवार हे काम करतील. ते संवेदनशील नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा सभागृहाला होईल, असा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या.


विरोधी पक्षनेते जनतेच्या भावना तडफेने मांडतील - उपमुख्यमंत्री अजित पवार


          राज्यातील जनेतेचे प्रश्न सोडविण्यासह त्यांच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्याचे कार्य शासन करतच आहे. मात्र, जनतेच्या भावना सभागृहाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम विरोधी पक्षनेता म्हणून विजय वडेट्टीवार हे जबाबदारीने व तडफेने पूर्ण करतील, अशा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला


            श्री. पवार म्हणाले की, आक्रमक स्वभाव, सामाजिक प्रश्नांची जाण आणि वैचारिक बैठक असणारे विजय वडेट्टीवार आपल्या कर्तव्यात कमी पडणार नाहीत. ते तडफेने आपली जबाबदारी पार पाडतील. शासनाच्या जनहिताच्या निर्णयांना त्यांच्याकडून पाठिंबा देखील मिळेल. विरोधी पक्षनेत्याच्या पदाला मोठी परंपरा आहे. या पदावर काम केलेल्या व्यक्तींनी पुढे राज्यात आणि केंद्रातही मोठमोठ्या पदांवर काम केले आहे. त्यामुळे श्री. वडेट्टीवार यांचे अभिनंदन करतानाच त्यांना शुभेच्छाही देतो. यापूर्वीही त्यांनी ही जबाबदारी काही काळासाठी सांभाळली होती. पुढील काळातही ते चांगले काम करतील आणि जनतेचा विश्वास संपादन करतील, अशी अपेक्षाही श्री. पवार यांनी व्यक्त केली


सर्वसामान्यांसाठी नेहमीच आवाज उठविणार- विजय वडेट्टीवार


आपण मोठ्या संघर्षातून या पदापर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण मला आहे. केवळ राजकारणाच्या भावनेतून कोणत्याही प्रश्नाकडे न पाहता त्यातून सामान्य माणसाला न्याय मिळेल, यासाठी कायम कार्यरत राहू. त्यांच्या प्रश्नांसाठी कायम आवाज उठवू, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अभिनंदनपर प्रस्तावाला उत्तर दिले.


            यावेळी ते म्हणाले की, जीवनाच्या सुरुवातीच्या काळात संघर्ष पाहिला. त्यानंतर जी वाटचाल झाली, त्यातून सामान्य माणसांचे प्रश्न धसास लावले. कधी सत्ताधारी म्हणून, तर कधी विरोधी पक्षाच्या बाकांवर बसून सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याचे काम केले. या पदावर असताना ती जबाबदारी अधिक निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निश्चितपणे प्रयत्न करु, असे यावेळी त्यांनी सांगितले.


मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या अभिनंदन प्रस्तावावर विधानसभा सदस्य सर्वश्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, भास्कर जाधव, कालिदास कोळंबकर, नाना पटोले आदींची भाषणे झाली. सर्वांनी या निवडीबद्दल श्री. वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले.

सहकार विभागातील रिक्तपदांची लवकरच भरतीप्रक्रिया

 सहकार विभागातील रिक्तपदांची लवकरच भरतीप्रक्रिया


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि. 3 : राज्यातील सर्वच विभागातील रिक्त पदांची भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा सातत्याने आढावा घेण्यात येत आहे. सहकार विभागातील रिक्त पदे लवकर भरण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.


            नाशिक जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक यांना लाच घेताना अटक केल्याबाबतचा प्रश्न सदस्य लहू कानडे यांनी उपस्थित केला होता.


            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, या प्रकरणांमध्ये जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याच्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित आहे. सहकार विभागाचे काम अधिक गतीने आणि


            सुसूत्रतेत चालण्यासाठी ठरलेल्या मुदतीत सर्व पदे भरण्यात येतील. संपूर्ण पारदर्शीपणे भरती केली जात आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


००००



नंदुरबार जिल्ह्यातील रावळापाणीच्यापर्यटन विकासासाठी निधी देणार

 नंदुरबार जिल्ह्यातील रावळापाणीच्यापर्यटन विकासासाठी निधी देणार


- मंत्री डॉ. विजयकुमार गावित


       मुंबई, दि. ३ : नंदुरबार जिल्ह्यातील रावळापाणी या गावाला ऐतिहासिक महत्व आहे. या गावाचा पर्यटनदृष्ट्या विकास व मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानसभेत सांगितले.


सदस्य राजेश पाडवी यांनी रावळापाणी या आदिवासी पाड्याच्या पर्यटन विकासासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.


मंत्री डॉ. गावित म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यातील रावळापाणी या पाड्यात बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेअंतर्गत रस्ते बांधण्यात येणार आहेत. या पाड्यात पर्यटन विभागाच्या 30 मार्च 2017 रोजीच्या निर्णयान्वये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ऐतिहासिक, सामाजिक धार्मिक पर्यटन स्थळांच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मुख्य इमारत, आवार भिंत, बाग-बगीचा, प्रवेशद्वार अंतर्गत सुशोभीकरण पाणीपुरवठा व स्वच्छता या बाबींचा अंतर्भाव असून मुख्य इमारतीचे काम प्रगतिपथावर आहे.


          यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सहभाग घेतला.

कोल्हापूरला वायुदलाच्या अभ्यासक्रमासाठीशासन सकारात्मक

 कोल्हापूरला वायुदलाच्या अभ्यासक्रमासाठीशासन सकारात्मक


- मंत्री संजय बनसोडे


मुंबई, दि. 3 : कोल्हापूर येथे राष्ट्रीय छात्रसेनेचे (एनसीसी) मुख्यालय आहे. या ठिकाणी सैन्यदल व नौदलाचा अभ्यासक्रम शिकविला जातो. तेथे विद्यार्थ्यांसाठी वायुदल (एअर फोर्स) अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी आहे. हा अभ्यासक्रम सुरू करण्यास शासन सकारात्मक आहे. एनसीसीच्या वायुदल शाखा जागा मिळण्यासाठी भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.


             याबाबत सदस्य सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.


             मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, कोल्हापूर येथे वायुदल शाखेच्या जागेसाठी नवी दिल्ली येथे केंद्र शासनाच्या संबंधित विभागाकडे जाऊन पाठपुरावा करण्यात येईल, व लवकरात लवकर हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याचप्रमाणे कोल्हापूर येथे फ्लाइंग क्लबसाठी प्रयत्न करण्यात येतील. प्रत्येक महाविद्यालयात राष्ट्रीय छात्रसेनेंतर्गत एअर विंग अभ्यासक्रम शिकविण्यासाठी सूचना देण्यात येतील. वाशीम येथे राष्ट्रीय छात्रसेनेची बटालियन निर्माण करण्यासाठी व पथक वाढविण्यासाठी माहिती घेऊन सभागृहाच्या पटलावर ठेऊ, असेही त्यांनी सांगितले.


           यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, अरुण लाड, किरण सरनाईक यांनी सहभाग घेतला.


0000

अहिल्यादेवी होळकरतीर्थक्षेत्र विकास योजना विचाराधीन

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरतीर्थक्षेत्र विकास योजना विचाराधीन

मंत्री गिरीश महाजन

मुंबईदि. 3 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मंदीरांप्रती मोठी आस्था होती. त्यांचे यामधील काम मोठे आहे. त्यांनी मंदीरांचे संवर्धन करून पायाभूत सोयीसुविधा उभारल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने वेगळी योजना करून ’ वर्ग तीर्थक्षेत्राला 5 कोटी रूपयापर्यंत, ‘’ वर्गाला 2 कोटी रूपयापर्यंत मदत करण्यासाठी शासन गांभीर्याने विचार करीत आहेअशी महिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 

           निमखेडता. खेड जि. पुणे येथील खंडोबा देवस्थान रस्ता व नदीजवळ काँक्रिटची संरक्षण भिंतबाबतचा प्रश्न सदस्य प्रवीण दटके यांनी सदस्य सुरेश धस यांच्यावतीने उपस्थित केला.

             मंत्री श्री. महाजन म्हणाले कीनिमखेड ता. खेड जि. पुणे येथील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान हे ’ वर्ग तीर्थक्षेत्र आहे. ’ वर्ग तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात येतो. त्यानुसार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून या तीर्थक्षेत्रातील रस्ता व काँक्रिटच्या संरक्षण भिंतीसाठी मागणी केलेल्या निधीची महिनाभरात तरतूद करण्यात येईल. पाली येथे अष्टविनायक गणपतीपैकी एक मंदिर असून भाविकांची मोठी गर्दी येथे होत असते. पाली येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी मागणीनुसार नियमात व निकषात बसेल त्यानुसार निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. यासाठी 7 दिवसांमध्ये बैठकही घेण्यात येईल.    

               नाशिक – मुंबई रस्त्यावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या 'बारव'च्या संवर्धनाबाबत माहिती घेऊन निर्णय घेण्यात येईल. कोथळी ता. मुक्ताईनगरजि. जळगाव येथे संत मुक्ताबाई यांचे मंदिर आहे. तीर्थक्षेत्र विकास कामासाठी कोथळी येथे निधीची तरतूद केलेली आहे. येथील कामे तातडीने सुरू करण्यात येतील.

            उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सूचना देताना म्हणाल्या कीलोकप्रतिनिधी मंदिरात दर्शनाला जातात. अशा वेळी लोकप्रतिनिधींना तेथील अपूर्ण कामेसमस्याविकास कामांची गरज लक्षात येते. याबाबत पुरातत्व विभागाच्या सूचनांना बाधा न येता एक निवेदन संबंधित मंत्री महोदयांना देण्यात यावेजेणेकरून तेथील विकासकामे करता येतील.

           यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सचिन अहीरजयंत पाटीलएकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.

कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी सखोल चौक

 कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करणार


  - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई, दि. 3 : कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी तपास सुरू असून रशेष शाह आणि एआरसी एडेलवेस कंपन्यांची सुध्दा चौकशी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.


विधानसभा सदस्य अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून नितीन देसाई यांच्या मृत्यूची अपघाती मृत्यू एवढीच चौकशी न करता ही चौकशी अधिक व्यापक करण्याची मागणी केली होती.


उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नितीन देसाई हे खऱ्या अर्थाने मराठी माणसाला अभिमान वाटावे, असे व्यक्तिमत्व होते. अनेक राजकीय पक्षांना सुद्धा मोठ्या आयोजनात ते मदत करायचे. या हरहुन्नरी कलाकाराचे आपल्यातून निघून जाणे हे वेदनादायी आहे.


आता या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येत आहेच. शिवाय त्यांना कुणी फसविण्याचा प्रयत्न केला का किंवा त्यांचा स्टुडिओ ताब्यात घेण्याचा कुणी प्रयत्न करीत होते का, याचाही तपास करण्यात येईल. हा स्टुडिओ जतन करण्याबाबत कायदेशीर मत घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.


0000

Featured post

Lakshvedhi