Thursday, 3 August 2023

कोल्हापूरला वायुदलाच्या अभ्यासक्रमासाठीशासन सकारात्मक

 कोल्हापूरला वायुदलाच्या अभ्यासक्रमासाठीशासन सकारात्मक


- मंत्री संजय बनसोडे


मुंबई, दि. 3 : कोल्हापूर येथे राष्ट्रीय छात्रसेनेचे (एनसीसी) मुख्यालय आहे. या ठिकाणी सैन्यदल व नौदलाचा अभ्यासक्रम शिकविला जातो. तेथे विद्यार्थ्यांसाठी वायुदल (एअर फोर्स) अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी आहे. हा अभ्यासक्रम सुरू करण्यास शासन सकारात्मक आहे. एनसीसीच्या वायुदल शाखा जागा मिळण्यासाठी भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.


             याबाबत सदस्य सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.


             मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, कोल्हापूर येथे वायुदल शाखेच्या जागेसाठी नवी दिल्ली येथे केंद्र शासनाच्या संबंधित विभागाकडे जाऊन पाठपुरावा करण्यात येईल, व लवकरात लवकर हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याचप्रमाणे कोल्हापूर येथे फ्लाइंग क्लबसाठी प्रयत्न करण्यात येतील. प्रत्येक महाविद्यालयात राष्ट्रीय छात्रसेनेंतर्गत एअर विंग अभ्यासक्रम शिकविण्यासाठी सूचना देण्यात येतील. वाशीम येथे राष्ट्रीय छात्रसेनेची बटालियन निर्माण करण्यासाठी व पथक वाढविण्यासाठी माहिती घेऊन सभागृहाच्या पटलावर ठेऊ, असेही त्यांनी सांगितले.


           यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, अरुण लाड, किरण सरनाईक यांनी सहभाग घेतला.


0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi