Thursday, 4 May 2023

भारतीय शिक्षण पद्धती उपयुक्त

 भारतीय शिक्षण पद्धती उपयुक्त


- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर


 


            मुंबई, दि. 3 : भारतीय शिक्षण पद्धती उपयुक्त आहे. जगातील ज्या चांगल्या शिक्षण पद्धती अथवा चांगले अभ्यासक्रम असतील त्यांचा अवश्य स्वीकार करा. तथापि प्राथमिक स्तरावर भारतीय शिक्षण पद्धती योग्य असल्यास ती विनाकारण बदलू नका, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. तसेच इंग्रजीच्या अट्टाहासातून बाहेर पडण्याचे आवाहनही त्यांनी केले.


            महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) नियामक मंडळाची २५१ वी सभा आज शालेय शिक्षण मंत्री तथा मंडळाचे अध्यक्ष श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झाली. यावेळी प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, शालेय शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे संचालक तथा माध्यमिक शिक्षण संचालक आणि नियामक मंडळाचे सदस्य सचिव कृष्णकुमार पाटील तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.


            मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, भारतीय संस्कृती आणि शिक्षण पद्धती पुरातन आहे. विद्यार्थ्यांना हसत - खेळत शिकवताना झालेला अभ्यास कायम लक्षात राहतो. त्यामुळे जे चांगले आहे ते स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, बालभारतीची पुस्तके आणि त्यासाठी साठवायचा पेपर खराब होणार नाही याची दक्षता घेताना राज्यातील गोडाऊन सुस्थितीत ठेवावेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करावीत. जगात ज्या चांगल्या शिक्षण पद्धती आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी जाणून घेता याव्यात याअनुषंगाने एक संग्रहालय तयार करावे, असे सांगून हे संग्रहालय संशोधनासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


            सर्व शाळा इंटरनेटशी जोडल्या जाणार आहेत. यासाठी दुर्गम भागातील ज्या शाळांमध्ये नेटवर्क नाही, त्यांची माहिती घेऊन त्या उपग्रहाद्वारे जोडण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची सूचना मंत्री श्री. केसरकर यांनी केली. येत्या शैक्षणिक वर्षापासून उपलब्ध करून देण्यात येणारी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वेळेत मिळतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश देऊन लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर आवडीची पुस्तके देखील शाळेत उपलब्ध करून द्या, असेही त्यांनी सांगितले.

Wednesday, 3 May 2023

महिला बचत गटाच्या वस्तूंच्या विक्रीसाठी आठवडी बाजाराची सुविधा करून देणार

 महिला बचत गटाच्या वस्तूंच्या विक्रीसाठी आठवडी बाजाराची सुविधा करून देणा

- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात १५५ तक्रारींचे निराकरण


 


            मुंबई, दि. 3 : महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्राधान्याने कार्यवाही करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. 


       परळ येथील मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, आमदार मनीषा कायंदे आणि अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.


          मंत्री श्री.लोढा म्हणाले, आज महिला बचत गट उत्तम प्रकारे वस्तूंची निर्मिती करत आहेत. महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे बचतगटांची मागणी लक्षात घेता स्थानिक ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच महापुरूष दादाभाई सहकारी गृहनिर्माण संस्था, परळ यांनी केलेल्या तक्रार अर्जानुसार स्थानिक प्रशासनाने विकासकाने नियमांचे उल्लंघन केले असल्यास त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. आज १४८९ तक्रारीपैकी दाखल झाल्या असून जागीच १५५ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरीत तक्रारींचे देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील असेही ते म्हणाले.


            यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.      


            सॅण्डहर्स्ट रोड येथील बी वॉर्ड येथे रविवार दिनांक 7 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहेत. हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत सकाळी १० ते दुपारी ३ वाजता या वेळेत सूरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकते.


****

सारथीच्या शैक्षणिक सवलती, सुविधांसंदर्भातलवकरच सर्वंकष समान धोरण ठरवणार

 सारथीच्या शैक्षणिक सवलती, सुविधांसंदर्भातलवकरच सर्वंकष समान धोरण ठरवणार


- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


            मुंबई, दि. 3 : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. सारथीमार्फत देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलती आणि सुविधाबाबत सर्वंकष समान धोरण ठरविण्याबाबत बार्टी, टीआरटीआय, महाज्योती आणि सारथी या संस्थांची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.


            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते.


            यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम (सा. उ.वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पाटील, आमदार भरत गोगावले, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव श्री. धोटे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) चेअरमन अजित निंबाळकर (दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी), व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे उपस्थित होते.


            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी), आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), या संस्थाकडून देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलती, नियमावली यात एकसूत्रता राहावी या दृष्टीने या संस्थेचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्यासमवेत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार आहे.


            तसेच पुढील शैक्षणिक वर्षात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उपलब्ध व्हावेत यासाठी वसतिगृहाच्या कामाला जिल्हास्तरावर अधिक गती द्यावी. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध होत नाही त्याच्यांकरिता ‘स्वाधार’ योजनेच्या धर्तीवर या विद्यार्थ्यांना प्रतिमहा ६ हजार रुपये 10 महिन्यांसाठी देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल.


             अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे थकीत प्रकरणांचा व्याज परतावा देऊन संबंधित प्रक्रिया एक आठवड्यात पूर्ण करण्यात येईल, असे सांगून मंत्री श्री. पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर क्युरेटिव्ह याचिका संदर्भातील प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचेही या बैठकीत सांगितले.

मानवनिर्मित आपत्तीपासून इमारतींसाठी संरक्षणात्मक उपाययो

 मानवनिर्मित आपत्तीपासून इमारतींसाठी संरक्षणात्मक उपाययोजना


सुचविणारा अहवाल तज्ज्ञ समितीने मुख्यमंत्र्यांना केला सादर.

            मुंबई, दि. 3 : राज्यातील अतिमहत्वाच्या इमारती, रुग्णालये, पंचतारांकीत हॉटेल, शाळा, देवस्थान यांवर मानवनिर्मित आपत्ती, दहशतवादी हल्ल्यापासून इमारतींना संरक्षणात्मक उपाययोजना सुचविणारा अहवाल तज्ज्ञ समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला.


            मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात तज्ज्ञ समितीने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, सदस्य अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महापालिकेचे मुख्य अभियंता सुनील राठोड, वास्तुविशारद संदीप ईश्वरे, एन. आर. शेंडे यावेळी उपस्थित होते.


            दहशतवादी हल्ले, मानवनिर्मित आपत्तींमुळे जीवित आणि मालमत्तेची लक्षणीय हानी होऊ शकते आणि आर्थिक विकासाला त्याचा फटका बसतो. ही जोखीम कमी करण्याच्या उपायांद्वारे आपत्ती टाळता येऊ शकते. मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात विकास नियंत्रण नियमावलीमध्ये योग्य त्या तरतुदी करण्याचे आदेश दिले होते.


            या अहवालात महत्वाच्या मोठ्या सार्वजनिक आणि अतिउंच इमारतींच्या सुरक्षिततेचे विश्लेषण करण्यात आले आहे. दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.

एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

शेती, आरोग्य क्षेत्रासाठी सौरऊर्जेवरील प्रकल्पांसाठी बँकेने सहकार्य करावे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि. 3 : राज्यात पायाभूत सुविधांचे जाळे मोठ्या प्रमाणावर असून शेतीसाठी सौरऊर्जेवरील पंप, ग्रामीण भागातील रुग्णालयांसाठी सौरऊर्जा उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पांसाठी आशियाई एशियन इन्फ्रास्टक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            मंत्रालयात एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचे महासंचालक हुन किम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. यावेळी मुख्य सचिव मनोज सौनिक, मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, ओ. पी. गुप्ता आदी उपस्थित यावेळी उपस्थित होते.


            पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी महाराष्ट्रात मोठी संधी आहे. कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, उपलब्ध आहे. राज्याच्या शाश्वत विकासावर आम्ही लक्ष केंद्रित केले असून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या कृषीपंपांच्या योजनेसाठी एशियन इन्फ्रास्टक्चर इनव्हेस्टमेंट बँकेने सहकार्य करावे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास शेतकऱ्यांना हरित ऊर्जा पुरविणारे महाराष्ट्र पहिले राज्य असेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


            ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णालयांसाठी सौर उर्जा, माहिती व तंत्रज्ञान, शेतीसाठी सौर ऊर्जा आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली. बँकेमार्फत सुरू असलेल्या एमयुटीपी प्रकल्पाच्या कामाबद्दल शिष्टमंडळाने यावेळी समाधान व्यक्त केले.


०००० 


 

कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ शिष्यवृत्ती

 कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ शिष्यवृत्ती


            कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी ७५ मुलांना तीन वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            दरवर्षी २५ मुलामुलींना शिष्यवृत्ती दिली जाईल.


            वन विभागाच्या कांदळवन सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही शिष्यवृती देण्यात येणार असून टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग (THE च्या २०० च्या आतील किंवा QS – Quacquarelli Symonds रँकिंग १५० च्या आतील) परदेशी शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाईल. यापैकी तीस टक्के जागांवर मुलींची निवड करण्यात येईल. मरिन सायन्स, मरिन इकॉलॉजी, ओशोनोग्राफी, मरिन बायोलॉजी, मरिन फिशरीज, मरिन बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोडायव्हर्सीटी या अभ्यासक्रमांसाठी १५ पदव्युत्तर पदवी आणि १० पीएच.डी. अशा दरवर्षी २५ शिष्यवृत्ती दिल्या जातील. पदव्युत्तर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे वय कमाल ३५ वर्षे आणि पीएचडीसाठी कमाल वय ४० वर्षे असावे. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे. या योजनेसाठी ३१ कोटी ५० लाख रुपये इतका खर्च येणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात कांदळवन प्रतिष्ठानच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.


---

--०-----


वैद्य विनायक खडीवाले

 वैद्य विनायक खडीवाले


शहरी संस्कृतीचा प्रभाव म्हणून स्त्री-पुरुषांच्या गुडघ्याचे विकार वाढत आहेत. शेतमजूर, कामगार, ओझेवाले, हमाल यांच्या गुडघ्याचे विकार आपण समजू शकतो; पण शहरांमध्ये जिने चढ-उतार, उभ्याचा ओटा, जमिनीवर बसून काम करण्याची बंद झालेली सवय, फाजील चहा-पाणी आणि अवेळी खाणे यामुळे गुडघ्यांच्या हाडांच्या सांध्यावर दाब पडतो. तेथील ‘वंगण’ कमी होते. गुडघ्यांच्या आतील बाजूला सूज येते, कटकट आवाज येतो, उठा-बसायला विलक्षण त्रास होतो. काहींना शौचास बसायला फार कष्ट होतात. याच विकाराला सामान्य माणूस गुडख्यात पाणी झाले असे म्हणतात.


पा

श्‍चात्य वैद्यकात पाणी काढणे या उपायाचे किंवा गुडघ्यात इंजेक्शन देणे याचे मोठे बंड माजले आहे; पण त्यामुळे गुडघ्यात पाणी पुन: पुन्हा होणारच. गुडघ्यातील हाडांची सूज कमी व्हावी, दुखणे कमी व्हावे आणि नेहमीच्या उठ-बसमध्ये चालण्यात व्यत्यय येऊ नये, याकरिता प्रथम नेमक्या दुखण्याच्या जागी चार लेपगोळ्यांचा दाट आणि गरम लेप लावावा. त्याकरिता प्रथम त्या गोळ्या पाण्यात भिजवाव्या नंतर पाट्यावर वाटून मग पळीत दाट गरम लेप लावावा. त्याशिवाय बलदायी महानारायण तेल सकाळी आंघोळीपूर्वी व रात्री झोपण्यापूर्वी गुडघ्याला व पायाला खालून वर असे जिरवावे. लाक्षादिगुग्गुळ, त्रिफळागुग्गुळ, गोक्षुरादिगुग्गुळ, सिंहनादगुग्गुळ, प्रत्येकी तीन गोळ्या, बारीक करून पाण्याबरोबर घ्याव्या. स्थौल्य जास्त असल्यास सोबत आरोग्यवर्धिनी घ्याव्यात. 


पांडुता आणि गुडघ्यावरील सूज जास्त असल्यास चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी या दोन गोळ्या इतर चार गोळ्यांबरोबर द्याव्या. गुडघ्याच्या तक्रारींबरोबर पाठ, कंबरदुखी असल्यास संधिवातारी, आणि गणेशगुग्गुळ ही जादा औषधे सकाळ इतर चार गोळ्यांबरोबर घ्याव्या. अशक्तपणा असल्यास आस्कंदचूर्ण 1 चमचा घ्यावे. मलावरोध असल्यास गंधर्वरीतकी घ्यावे. 


विशेष दक्षता 


गुडघ्याच्या हाडाच्या वाटीची आणखी झीज होणार नाही आणि झालेली झीज भरून यावी म्हणून योजना हवी. तसेच फाजिल वजन वाढू नये आणि सूज कमी व्हावी म्हणून लेखनीय औषधे आणि नेमके व्यायाम योजावे. माफक प्रमाणात तूप, उडीद, डिंक, गहू, मूग, सात्विक आहार, लसूण, पुदिना, आले असी चटणी, स्निग्ध आणि किंचित उष्ण असा संतुलित आहार घ्यावा. खारट, आंबट, तिखट आणि आंबवलेले पदार्थ, लोणचे, पापड, दही, शिळे अन्न, पाव, फरसाण, इडली, डोसे, कोल्ड्रिंक, कृत्रिम पेये वर्ज्य करावे. कटकट आवाज येत असल्यास गुडघ्यांना पूर्ण विश्रांती मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे अतिरेकी जिने चढ-उतार आणि खूप वजन उचलणे वर्ज्य करावे



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



Featured post

Lakshvedhi