Tuesday, 7 February 2023

बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू;

 बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू;


बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शुभारंभ.

            मुंबई, दि. 7 : बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवाचा बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते बेलापूर येथे आज शुभारंभ झाला.या उपक्रमाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसह पर्यटकांच्या सुविधा मार्गी लागणार असल्याचे बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.


            मंत्री श्री. भुसे यांनी नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बोटीतून बेलापूर ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत प्रवास केला. त्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.


            यावेळी आमदार मंदा म्हात्रे, बंदरे विकास विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित सैनी, नयनतारा कंपनीचे रोहित सिन्हा यांच्यासह विभागाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.


            मंत्री श्री. भुसे म्हणाले की, या वॉटर टॅक्सीच्या माध्यमातून प्रवासी सुरक्षित प्रवास करू शकतील. ही सुविधा कमीत कमी दरात असून वेळेचीही बचत होणार आहे. पूर्वी बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया या प्रवासासाठी दीड तास लागत होता. तो आता कमी होऊन 55 मिनिटांपर्यंत आला आहे. या उपक्रमासाठी बंदरे विकास विभागाच्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न मोलाचे ठरले. यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने मान्यता दिली आहे. तसेच केंद्र सरकारने केलेली मदतही महत्त्वाची ठरली आहे. पुढील कालावधीत गेटवे ऑफ इंडिया जवळील रेडिओ क्लबजवळ नवीन जेट्टी निर्माण करण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रवासी बोटीसाठी सुविधा निर्माण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विभागाच्या पाठिशी असून अशा प्रकल्पांच्या माध्यमातून रस्त्यावरच्या वाहतूक समस्येतून मुक्तता मिळणार असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले. भविष्यात प्रवाशांना आणखी व्यवस्था उभारण्याकरिता ठाणे जवळील 'रॉक क्रिक' चा काही भाग तोडल्यास पालघर, वसई, ठाणे, बेलापूर अशी प्रवासी जल वाहतूक उपलब्ध होईल. अशा वेगवेगळ्या योजनांना विभागाच्या वतीने गती देण्यात येत आहे, मंत्री श्री भुसे यांनी सांगितले.


थोडक्यात वॉटर टॅक्सी विषयी


            बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया हे रस्तामार्गे अंतर ४० कि.मी असून त्या करिता अंदाजे १ तास ४५ मिनिटे इतका अवधी लागतो. परंतु बेलापूर ते गेटवे हे जलमार्ग अंतर २४ कि.मी असून त्याकरिता फक्त एक तासाचा अवधी लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे.


            जेट्टीचे काम हे केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत करण्यात आले असून या कामासाठी 8.37 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या खर्चासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत 50:50 या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच वाहनतळ व इतर सुविधांसाठी ठाणे जिल्हा नियोजन समितीकडून 4.35 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला होता. या ठिकाणी 75 चार चाकी आणि 85 दुचाकी वाहनाकरिता वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.


            मेसर्स नयनतारा शिपिंग प्रा. लि यांचेकडून नयन XI या बोटीद्वारे ही वॉटर टॅक्सी सेवा सुरु आहे. देशातील पहिली २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सोमवार ते शुक्रवार दरम्यान बेलापूर - गेटवे ऑफ इंडिया या जलमार्गावर धावणार आहे. सकाळी ८.३० वाजता बेलापूर -गेटवे ऑफ इंडिया आणि संध्याकाळी ६.३० वाजता गेट वे ऑफ इंडिया -बेलापूर अशा दोन फेऱ्या होणार आहेत. जलवाहतुकीचा प्रवास सर्वसामान्य लोकांकरिता सुलभ, सोईचे व लवकर होण्यासाठी या कंपनीमार्फत सद्यास्थितीत सामान्य बैठकीसाठी रु २५०/- व बिझनेस क्लास करिता रु. ३५०/- इतके तिकीट दर आकारण्यात येणार आहे. या वॉटर टॅक्सीचे ऑनलाईन बुकीग My Boat Ride या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.


            1 जानेवारी 2022 पासून नव्याने सुरु झालेल्या जलमार्गावरील फेरी आणि रो-रो बोटीद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच पाळीव प्राणी, वाहन, माल इत्यादीवर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून आकारल्या जाणाऱ्या प्रवासी करात पुढील 3 वर्षासाठी म्हणजेच 1 जानेवारी 2022 पासून 31 डिसेंबर 2024 पर्यंत सूट देण्यात आली आहे.


00000

आरे’ वसाहतीचा कायापालट करण्यासंदर्भात कार्यवाही करावी

 आरे’ वसाहतीचा कायापालट करण्यासंदर्भात कार्यवाही करावी


- पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील.

            मुंबई, दि. 7 : ‘आरे’ दुग्धवसाहतीतील पडीक जमिनी वापरात आणून त्याद्वारे शासनाला उत्पन्न मिळेल यासंदर्भात उपाययोजना कराव्यात. आरे वसाहतीचा कायापालट करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.


            गोरेगाव येथील आरे दुग्धवसाहतीसंदर्भात आज मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मंत्री विखे-पाटील बोलत होते. बैठकीला विभागाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता, आयुक्त श्रीकांत शिपूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. विखे-पाटील यांनी आरे येथील राज्य शासनाच्या विविध विभागांना हस्तांतरीत जमिनी आणि तेथे सुरू असलेले प्रकल्प याबाबत आढावा घेतला. ज्या जमिनी पडीक आहेत, त्या संपादित करून शासनास उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. जे तबेले धारक आहेत, त्यांच्याकडून थकबाकी वसूल करावी तसेच डागडुजी व स्वच्छता राहील या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. पर्यटन स्थळे, नौका विहार, पिकनिक गार्डन, व्यापारी गाळे, पॅराग्रास ठेका, संरक्षण भिंत, रस्ते या ठिकाणांचे संवर्धन व जतन करून ते पुन्हा सुरू करण्यात यावे. आरे वसाहतीतील जमिनींवर जनतेच्या उपयोगी प्रकल्प सुरू करून त्याचा कायापालट करण्यासाठी उपाययोजना आखून अहवाल तयार करावा, असेही मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.


०००

खेलो इंडिया’ युथ गेम्स २०२२-२३

 खेलो इंडिया’ युथ गेम्स २०२२-२३


महाराष्ट्राचे नवव्या दिवशी ८३ पदकांसह अग्रस्थान कायम


            मुंबई, दि. ७ : गुजरात मधील राष्ट्रीय क्रीडास्पर्धांपाठोपाठ मध्यप्रदेश येथे आयोजित पाचव्या ‘खेलो इंडिया’ युवा स्पर्धेत राज्याच्या संघातील युवा खेळाडू नेत्रदीपक कामगिरी करत आहेत. जागतिक स्तरावरील स्पर्धा गाजवण्याची क्षमता असलेले युवा खेळाडू सध्या ‘खेलो इंडिया’ मध्ये पदकांचे मानकरी ठरत आहेत. याच दर्जेदार कामगिरीमुळे महाराष्ट्राचे खेळाडू निश्चितपणे आगामी काळामध्ये ऑलम्पिक सारखी स्पर्धा गाजवतील, ही प्रचंड क्षमता या युवा खेळाडूंमध्ये आहे, अशा शब्दात महाराष्ट्राचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी संघावर कौतुकाचा वर्षाव केला.


            तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान मिळवण्यासाठी महाराष्ट्र संघ ‘खेलो इंडिया’ मध्ये आगेकूच करत आहे. महाराष्ट्र संघाने ॲथलेटिक्स, जिम्नॅस्टिक आणि योगासन खेळ प्रकारांत पदकांचे अर्धशतक साजरे केले. याशिवाय महाराष्ट्र संघाला या तिन्ही खेळ प्रकारात चॅम्पियनशिपचा बहुमान देत गौरवण्यात आले. त्यामुळेच महाराष्ट्र संघाला ८३ पदकांसह नवव्या दिवसाअखेर पदक तालिकेतील आपले अव्वल स्थान राखून ठेवता आले. आंतरराष्ट्रीय खेळाडू संयुक्त काळेने गोल्डन चौकार मारून पुन्हा एकदा महाराष्ट्र संघाला पदक तालिकेत अव्वल स्थानाचा बहुमान मिळवून दिला. त्याचबरोबर महिला युवा धावपटूंनी भोपाळच्या ट्रॅकवर सोनेरी यशाचा पल्ला गाठत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. रिलेमध्ये डबल गोल्डन धमाका उडवत महाराष्ट्राचा संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. यादरम्यान जिम्नॅस्टिक मधील संयुक्ता काळे, ॲथलेटिक्स मध्ये रिया पाटील आणि तिच्या सहकारी खेळाडूंची कामगिरी, योगासनात नवयुवा योगपटू यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला यजमान मध्यप्रदेश आणि हरियाणा संघाला धोबीपछाड देत पुन्हा अग्रस्थानी धडक मारता आली.


एकट्या महाराष्ट्र जिम्नॅस्टिक संघाचा पदकांचा दुहेरी आकडा;


चार संघांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राची सात सुवर्णपदके"


            संयुक्ता काळे, आर्यन , सार्थक, सारा यांच्या नेत्रदीपक कामगिरीमुळे महाराष्ट्र संघाला खेलो इंडिया युथ गेम्समधील जिम्नॅस्टिक खेळात वर्चस्व गाजवता आले. एकट्या महाराष्ट्र संघाने या इव्हेंटमध्ये पदकांचा दुहेरी आकडा गाठला. महाराष्ट्राने या खेळ प्रकारात सर्वाधिक १९ पदके जिंकली. यादरम्यान पदक तालिकेत दोन ते पाचव्या स्थानावर असलेल्या चार संघांच्या एकूण सुवर्णांच्या तुलनेन एकट्या महाराष्ट्राने सात सुवर्ण पटकावले आहेत. उत्तर प्रदेश ३, मध्य प्रदेश २, जम्मू-कश्मीर व गुजरात यांचे प्रत्येक १ सुवर्णपदक आहे. यात अव्वल स्थानी असलेल्या महाराष्ट्राच्या नावे सर्वाधिक ७ सुवर्णपदके आहेत.

सर्वाधिक १६ पदके योगासनात


            योगासन खेळ प्रकारात महाराष्ट्र संघाला आपले वर्चस्व अबाधित ठेवता आले. पदार्पणातील या योगासन खेळ प्रकारात महाराष्ट्र संघाने सर्वाधिक १६ पदकांची कमाई केली. यामध्ये ५ सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ कांस्यपदकांचा समावेश आहे. त्या पाठोपाठ पूजा दानोळे आणि संज्ञा पाटील यांच्या सुवर्ण यशाने लक्षवेधी ठरलेल्या सायकलिंग क्रीडा प्रकारात सात पदकांची कमाई करता आली.


खो-खो, बॅडमिंटन, बॉक्सिंग मध्ये पदकाचा बहुमान


            महाराष्ट्र संघाने पाचव्या सत्रातील ‘खेलो इंडिया’ युथ गेम्स मध्ये खो खो, बॅडमिंटन आणि बॉक्सिंग मध्ये सोनेरी यशाची मोहीम कायम ठेवत पदकाचा बहुमान पटकावला. नरेंद्रच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुरुष खो-खो संघाने सोनेरी यशाचा पल्ला गाठला. तसेच खो-खो मध्ये महाराष्ट्राचा महिला संघ रौप्य पदकाचा मानकरी ठरला. ठाण्याच्या १४ वर्षीय नाईशा कौरने बॅडमिंटनच्या महिला एकेरीत महाराष्ट्राला रौप्य पदक जिंकून दिले. देविका घोरपडे, उमर शेख आणि कुणाल घोरपडे यांनी अचूक ठोसे मारून महाराष्ट्र संघाला गोल्डन हॅट्रिक साजरी करून दिली.


संयुक्तामुळे जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचा दबदबा


            आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या युवा खेळाडू संयुक्ता काळेने गोल्डन चौकार मारून महाराष्ट्र संघाला खेलो इंडिया मध्ये पदक तालिकेत मोठी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला आता आपले वर्चस्व गाजवता येत आहे. तिच्यामुळे संघातील युवा खेळाडूंना सोनेरी यश संपादन करण्याची प्रेरणा मिळाली. यामुळे महाराष्ट्र संघाने जिम्नॅस्टिक्समध्ये १५ पेक्षा अधिक पदके जिंकण्याचा बहुमान पटकावला आहे.


महाराष्ट्र संघाच्या धावपटूंची कामगिरी कौतुकास्पद


            महाराष्ट्राच्या युवा धावपटूंनी प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या बळावर खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये पदकाचा पल्ला गाठला आहे. घवघवीत सोनेरी यश संपादन करणारी महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पद ठरलेली आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला चॅम्पियनशिपच्या बहुमनाने गौरवण्यात आले आहे.


0000

तत्व

.








 

भवताल"साठी अॅडमिनसांभाळणारी व्यक्ती हवी !

 भवताल"साठी अॅडमिनसांभाळणारी व्यक्ती हवी !


'भवताल'च्या कोथरूड (पुणे) येथील ऑफिसचे कामकाज (अॅडमिनिस्ट्रेशन व इतर बाबी) सक्षमपणे सांभाळू शकेल अशा व्यक्तीच्या शोधात आम्ही आहोत. आपण स्वत: किंवा आपल्या संपर्कात अशा व्यक्ती असल्यास आणि पूर्ण वेळ काम करण्याची इच्छा असल्यास पुढे दिलेल्या लिंकद्वारे लवकरात लवकर संपर्क साधावा.


माहिती व अर्ज करण्यासाठी लिंक:

https://bit.ly/3wRS8q6


संपर्कासाठी ई-मेल:

bhavatal@gmail.com


#भवताल #Bhavatal

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त अर्जांवर तत्काळ कार्यवाही करण्याच्या मुख्य सचिवांच्या सूचना.

 जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त अर्जांवर

तत्काळ कार्यवाही करण्याच्या मुख्य सचिवांच्या सूचना.

            मुंबई, दि. 6 : स्थानिक पातळीवर नागरिकांच्या अर्जांवर तत्पर कार्यवाही होण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरावर सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त अर्ज तातडीने निकाली काढण्याच्या सूचना मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी आज येथे दिल्या.


            विभाग आणि जिल्हास्तरावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या कामकाजासंदर्भातील ऑनलाईन आढावा बैठक मुख्य सचिव श्री.श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात झाली, त्यावेळी त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्री कार्यालयातील अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्यासोबतच दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी बैठकीस उपस्थित होते.


            नागरिकांना मंत्रालयापर्यंत न येता स्थानिक पातळीवरच सुलभरित्या आपले म्हणणे,अडचणी मांडता याव्यात, यासाठी विभागीय आणि जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याठिकाणी गतिमान कार्यपद्धतीचा वापर करुन प्राधान्याने नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे मुख्य सचिवांनी निर्देशित केले. सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी या कक्षाकडे प्राप्त अर्जांवर तत्पर कार्यवाही करण्यासाठी यंत्रणांवर, क्षेत्रीय कार्यालयांवर नियंत्रण ठेवावे. लोकांचा शासन,प्रशासनावरचा विश्वास अधिक दृढ करण्याच्या व्यापक जाणीवेतून प्राप्त प्रत्येक अर्ज,निवेदन तातडीने निकाली काढण्यात यावे. ई ऑफीसच्या माध्यमातून हे काम अधिक गतिमानतेने करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी सेतू केंद्राच्या माध्यमातून पूरक व्यवस्था,आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता ठेवावी. प्राप्त अर्जांचे लगेच वर्गीकरण करुन जिल्हास्तरावरील अर्जांवर कार्यवाही सुरु करुन राज्यस्तरावरील अर्ज मंत्रालयात वर्ग करण्यात यावेत. अर्धन्यायिक प्रकरणांशी निगडीत अर्जांबाबत योग्य ती पाहणी करुन अर्जदारास योग्य ते मार्गदर्शन करावे. शासकीय कर्मचा-यांची सेवा विषयक प्रकरणे या कक्षाच्या अखत्यारित येत नसल्याने, विहीत पद्धतीने संबंधित यंत्रणेकडे अर्ज करण्याबाबत अर्जदाराला अवगत करावे.


            मुख्यमंत्री महोदयांना जिल्हा दौ-यात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने तातडीने वर्गीकृत करुन राज्यस्तरावरील विषय मंत्रालयाकडे हस्तांतरित करावेत तसेच जिल्हा, विभागीय विषयावरील अर्ज तातडीने निकाली काढण्यात यावे.  


            स्थानिक पातळीवरच आपल्या समस्या सोडवल्या जातात, हा विश्वास नागरिकांना या कक्षामुळे मिळाल्याने मंत्रालयात मोठ्या संख्येने राज्यभरातून येणाऱ्या अर्जांची संख्या नियंत्रणात राहील, त्याचसोबत अतिमहत्वाच्या विषयांवरील अर्ज तातडीने निकाली काढणे शक्य होईल, या दृष्टीने जिल्ह्यात, विभागात प्राप्त प्रकरणे विनाविलंब निकाली काढल्या जात असल्याची खबरदारी विभागीय आयुक्तांनी, जिल्हाधिकारी यांनी घ्यावी. तसेच स्थानिक पातळीवर करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची गुणवत्ता आणि कालमर्यादा याचा संबंधित विभागाच्या सचिवांनी, पालक सचिवांनी वेळोवेळी आढावा घ्यावा, अशा सूचना श्री. श्रीवास्तव यांनी यावेळी दिल्या.


            लोकाभिमुख प्रशासकीय कार्यप्रणालीसाठी मुख्यमंत्री महोदयांनी सूचित केल्याप्रमाणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी नियमितपणे अभ्यागतांसाठी ठराविक वेळ ठेवावी, त्याबाबत आपल्या दालनाच्या बाहेर वेळ निर्देशित करावी, त्याचप्रमाणे सर्व क्षेत्रीय कार्यालय प्रमुखांनी देखील आपल्याकडे येणाऱ्या अभ्यागतांना आर्वजून भेटावे. नागरिकांना विनासायास सुलभरित्या सेवा, योजनांचा लाभ उपलब्ध होईल यादृष्टीने ऑनलाईन सेवा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य देत यंत्रणा कार्यान्वित करावी, अशा सूचनाही मुख्य सचिवांनी यावेळी दिल्या.


००००

या वर्षापासून शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा करणार

 या वर्षापासून शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा करणार


- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर.

            मुंबई, दि. 6 :- भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. आजी आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधार स्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या वर्षापासून 10 सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यानिमित्त शाळेत आजी आजोबांसमवेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.


            शालेय शिक्षण तसेच मराठी भाषा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध निर्णयांची माहिती देण्यासाठी मंत्री श्री. केसरकर यांनी आज मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधला.


            शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबतच्या निर्णयाची माहिती देताना श्री.केसरकर म्हणाले, 22 डिसेंबर 2022 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. यानुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गातील शिक्षण सेवकांना 16 हजार रूपये, माध्यमिक वर्गात 18 हजार रूपये तर उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांना 20 हजार रूपये सुधारित मानधन देण्यात येईल. हे मानधन 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात येत आहे.


            शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये देखील वाढ करण्यात आली असून पूर्णवेळ ग्रंथपालांना 14 हजार रूपये, पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायकांना 12 हजार रूपये, कनिष्ठ लिपिकास 10 हजार रूपये तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी (केवळ अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती) यांना आठ हजार रूपये मानधन मिळेल.


            मराठी भाषा विभागाच्या वतीने मराठी भाषा भवन उभारले जाणार असून मराठी भाषेशी संबंधित सर्व कार्यालये या इमारतीत एकत्र असणार आहेत. त्याचप्रमाणे छोटी संमेलने आयोजित करता येतील असे सभागृह, सुसज्ज ग्रंथालय, मुंबई बाहेरून येणाऱ्या साहित्यिकांसाठी राहण्याची सोय आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे श्री.केसरकर यांनी सांगितले.


            नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगून इतर भाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला दहावी इयत्तेत अडचण निर्माण होऊ नये यासाठी पर्यावरण विषयाप्रमाणे श्रेणी देता येईल का याचा अभ्यास करण्यात येत असल्याचे मंत्री श्री.केसरकर यावेळी म्हणाले.


           माता रमाई आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त मुंबईत तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील वणंद या त्यांच्या जन्मगावी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे श्री.केसरकर यांनी सांगितले. यानिमित्त चेंबूर येथील 250 विद्यार्थीनी क्षमतेच्या वसतिगृहास माता रमाईंचे नाव देण्यात येणार असून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येणार असल्याची तसेच शाळांमधून वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


00000

Featured post

Lakshvedhi