Thursday, 12 January 2023

20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती

 20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा.

            मुंबई, दि. 12 : राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून लवकरच ही भरती सुरु करण्यात येईल. त्याशिवाय मानधनवाढीसह विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग, नवीन मोबाईल आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.


            राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक घेण्यात आली. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त रुबल अग्रवाल यांचेसह महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना-समितींचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.


            अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एकरकमी लाभ योजनेसाठी एलआयसीकडे शासनाने १०० कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. या संदर्भातील प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करुन संबंधितांना पैसे देण्यासाठी भारतीय जीवन विमा महामंडळाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.


            अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजार १८६ पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून ही भरती प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


            अंगणवाडी केंद्रासाठी सध्या अस्तित्वात असलेले वर्ग आणि भाड्याने घेतलेले वर्ग याचा आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विभागाला दिल्या. आढाव्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये हे वर्ग भरविण्याच्या संदर्भात त्यांना आदेश देण्यात येतील, असेही त्यांनी सांग़ितले. कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता लवकरच देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            पोषण आहाराचा दर वाढविण्यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच त्यात वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करतांनाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्यांवर लवकरच निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


            दिवाळीपूर्वी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने भाऊबीज दिल्याबद्दल आणि गणवेशाचे पैसे थेट खात्यावर जमा केल्याबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या बैठकीत पोषण ट्रॅकर ॲप, मानधनवाढ, रिक्त पदे आदी बाबींवर चर्चा करण्यात आली.


००००

लिपिक टंकलेखक अर्हता



 

प्रणाम

 



Wednesday, 11 January 2023

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नोव्हेंबरपासून खुला करणार

 मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उभारला एमटीएचएल पॅकेज २ मधला सर्वात लांब ओएसडी स्पॅन

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नोव्हेंबरपासून खुला करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

एमटीएचएलचे काम ९० टक्के पूर्ण

एमटीएचएल ठरणार देशातील पहिला ओपन रोड टोलिंग महामार्ग.


            मुंबई, दि. ११ : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून यावर्षी नोव्हेंबरपासून हा सागरी मार्ग खुला करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. देशातील सर्वाधिक लांबीचा हा सागरी मार्ग ओपन रोड टोलींग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या पॅकेज २ मधील पहिला सर्वात जास्त लांबीचा म्हणजेच सुमारे १८० मीटर लांबीचा आणि सुमारे २३०० टन वजनाचा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकची उभारणी करण्यात आली. यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मंत्री दादाजी भुसे, संजय राठोड, खासदार राहुल शेवाळे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्रीनिवासन, अतिरिक्त आयुक्त गोविंदराज आदी उपस्थित होते.


            मुंबई ते अलिबाग हे अंतर या सागरी महामार्गामुळे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. पर्यावरणपूरक असा हा सागरी महामार्ग असून बांधकामातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरून त्याचे काम करण्यात आले असून या महामार्गावर टोल भरण्यासाठी थांबण्याची आवश्यकता नसणार आहे. ओपन रोड टोलिंग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग ठरणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            संपूर्ण प्रकल्पांतर्गत समुद्रात उभारण्यात येणाऱ्या एकूण ७० ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक (Orthotropic Steel Deck) स्पॅन पैकी एकूण ३६ स्पॅनची उभारणी पूर्ण झाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई ट्रान्स हर्बर लिंक (MTHL) या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर असून प्रकल्पाची स्थापत्य कामे सुमारे ९० टक्के पूर्ण झाली आहेत. मुंबई ट्रान्स हर्बर लिंक (MTHL) हा मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणारा सुमारे २२ किमी लांबीच्या ६ पदरी (३+३ मार्गिका) पूल आहे. या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे १६.५ किमी असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे ५.५ किमी इतकी आहे.


समुद्री वाहतुकीस अडथळा होणार नाही यासाठी नेव्हिगेशनल स्पॅनची उभारणी


            मुख्य पुलाची रचना ही ६० मीटर लांबीच्या स्पॅनची असून मुख्यतः ते सेगमेंटल बॉक्स गर्डर व कॉक्रिट डेक आहेत. मुंबई पारबंदर प्रकल्पाचे एक प्रमुख वैशिष्ट्य असलेला हा सागरी क्षेत्रातील नॅव्हिगेशन भागातील स्टील डेक आहे. ज्याला तांत्रिकदृष्ट्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक (OSD) असे म्हणतात. समुद्रातील जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मोठ्या लांबीचे हे स्पॅन समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून सुमारे २५ मीटर उंच बांधण्यात येत आहेत. त्यामुळे हा स्पॅन नेव्हिगेशनल स्पॅन म्हणून ओळखला जातो.


            मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पॅकेज २ मधील एकूण ३२ ओएसडी स्पॅनपैकी १५ ओएसडी स्पॅन आधीच स्थापित केले गेले आहेत. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत १८० मीटरचा हा पॅकेज २ मधील सर्वात लांब ओएसडी स्पॅन स्थापित करण्यात आला.


००००

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांची परिषद संपन्न


मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांची परिषद संपन्न

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर भर देण्याचे निर्देश.

            मुंबई, दि. ११ :- राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.


            राज्यातील सर्व महानगरपालिका आणि ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची परिषद आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती, यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यावेळी उपस्थित होते.


            राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद- पंचायतीमध्ये ५५ हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त असून त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील ४० हजार विविध पदांची भरती प्रक्रिया लवकर सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. यावेळी राज्य संवर्गाचे एकूण १९८३ पदे संचालनालयामार्फत व नगरपरिषद-नगरपंचायत स्तरावरील संवर्गात गट ‘क’ आणि गट ‘ड’ मध्ये ३७२० पदांची भरती करण्यात येणार आहे, त्याची प्रक्रिया ३४ जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत करण्यात येत आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ८४९० पदांची भरती प्रक्रिया सुरु केली असून या सर्व भरती प्रक्रियांची कार्यवाही सुरु करुन मे अखेर संपूर्ण भरती पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महानगरपालिकांमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन सर्व सेवाविषयक बाबी पूर्ण करुन भरती प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.


बांधकाम परवानगीसाठी ऑनलाईन पद्धती वापरा


            डिसेंबर २०२० मध्ये एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली लागू करण्यात आली असून त्याअंतर्गत इमारत बांधकाम परवानगीसाठी ‘बीपीएमएस-ऑनलाईन’ आणि ‘बीपीएमएस टीपी- क्लायंट’ ॲपवर आधारित प्रणालीचा वापर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.


रुग्णालये, शाळांना अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्यात


            महापालिका, नगरपरिषदांच्या शाळा आणि रुग्णालयांना आयुक्त आणि मुख्याधिकाऱ्यांनी भेटी देवून स्वच्छतेवर भर द्यावा, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना एकाच ठिकाणी सर्व वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. कोविडपासून खबरदारी घेण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यासह रुग्णालयांच्या इमारती तेथील ऑक्सिजन आणि अग्निशमन सुविधांचे परीक्षण करुन घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई महानगरपालिकेकडे रुग्ण खाटा, व्हेंटिलेटर, डायलिसिस यंत्रे आदी वैद्यकीय उपकरणे उपलब्ध असून नगरपालिकांना ती विनामूल्य देण्यात येणार आहे, नगरपालिकांनी ही सामुग्री घेऊन जाण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.


            सर्व २७ शाळा डिजिटल केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी चंद्रपूर महानगरपालिकेचे कौतुक करुन खासगी आणि पालिकेच्या शाळांमध्ये स्पर्धा निर्माण झाली पाहिजे, असे कार्यक्रम आखण्याच्या सूचनाही दिल्या. शिक्षकांच्या कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशिक्षण द्यावे, शिक्षणाबरोबरच शालेय पोषण आहाराचा दर्जा वाढविण्यासाठी पालिकांनी प्रयत्न करण्याची आवश्यकताही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली. शालेय स्वच्छतागृहांची नियमित सफाई करण्यासाठी पाण्याच्या सुविधा निर्मितीकरिता निधी देण्याचीही तयारी यावेळी मुख्यमंत्र्यांनी दाखवली.


उत्पन्नवाढीवर भर द्यावा


            महानगरपालिकांच्या विशेषतः ‘ड’ वर्ग महापालिकांच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीची नेमकी कारणे शोधून त्यावर उपाययोजना सूचविण्यासाठी समिती गठित केली आहे. सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी वसूलीवर विशेष भर देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सिडकोद्वारे आकारण्यात येणारे सेवाशुल्क १ नोव्हेंबर २०२२ पासून आकारण्यात येऊ नये असे आदेश दिलेले असून केवळ महापालिकेमार्फतच हे सेवाशुल्क आकारण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


बचत गटनिर्मित वस्तूंच्या विक्रीसाठी योजना तयार करा


            नागरी भागातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी त्यांच्या वस्तूंना मॉलमध्ये स्थान मिळावे, ऑनलाईन संधी उपलब्ध करुन देण्यासाठी योजना तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.


            यावेळी मुख्यमंत्र्यांनी पीएम स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), अमृत, स्वच्छ भारत अभियान, घनकचरा व्यवस्थापन, रात्र निवारा आदी विषयांचा आढावा घेतला.


0000



जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात

 जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

चंद्रकांत पाटील यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 11 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार, दि. 12 जानेवारी 2022 रोजी सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

            पुणे येथे जी 20 परिषदेच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांची सुरु असलेली तयारी, जी 20 परिषदेमुळे विकासाला मिळणारी गती, पुण्यातील प्रकल्प, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग विभागातील नाविन्यपूर्ण उपक्रम याविषयी मंत्री श्री. पाटील यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून विस्तृत माहिती दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.



दिलखुलास

 दिलखुलास’ कार्यक्रमात कौशल्य विकास आयुक्त

डॉ. रामास्वामी एन. यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 11 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर गुरूवार दि. 12 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.


            महाराष्ट्राने उद्योग क्षेत्रात लौकिक निर्माण केला आहे. देशाच्या प्रगतीचे इंजिन असलेल्या महाराष्ट्रात सर्वाधिक स्टार्टअप निर्माण झाले आहेत. नव उद्योजकांसाठी महाराष्ट्राने नेहमीच लाल गालिचा अंथरलेला आहे. याअनुषंगाने रोजगार निर्मितीसाठीचे प्रयत्न, रोजगार मेळाव्यांचे आयोजन याविषयी सविस्तर माहिती डॉ. रामास्वामी एन. यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.


*

Featured post

Lakshvedhi