Thursday, 10 November 2022

उद्योग क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे

 उद्योग क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे आवाहन


पुणे, दि. 9 : उद्योग क्षेत्रात कामगारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि मतदार यादीत नाव नोंदवून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी उद्योग संस्थांनी प्रोत्साहित करावे, असे आवाहन भारताचे मुख्य निवडणूक राजीव कुमार यांनी केले.


मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील टेक महिंद्रा - फेज ३ येथे आयोजित कार्यक्रमात उद्योगांमधील मतदार जागृती मंचाच्या नोडल अधिकाऱ्यांशी संवाद कार्यक्रमाच्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे, निवडणुक आयोगाचे विशेष अधिकारी डॉ.रणबीर सिंग, निवडणूक उपायुक्त हिरदेश कुमार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवडणुक आयोगाच्या माध्यम व संवाद महासंचालक शेफाली शरण, टेक महिंद्राचे उपाध्यक्ष सतीश पै, उद्योग समूहाचे प्रतिनिधी, औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, पुण्यामध्ये मतदानाची टक्केवारी ५० टक्केपेक्षा कमी आहे. मतदान प्रक्रियेत सहभागी होतांना मतदानाची टक्केवारी वाढणे गरजेचे आहे. उद्योग क्षेत्राच्या प्रतिनिधींनी मतदानाविषयी जनजागृती करुन पात्र कर्मचारी, कामगारांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले. मतदार जागृती मंचाच्या प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांबाबत भारत निवडणूक आयोग सकारात्मक विचार करेल, असेही ते म्हणाले.


            निवडणूक आयुक्त श्री. पांडे म्हणाले, मतदान प्रक्रिया सुरळीतपणे, शांततेत पार पाडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग नेहमीच तत्पर असून निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात येते. लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलिस दलातील जवान (सर्व्हिस वोटर्स) तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी अत्याधुनिक अशी इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम (इटीपीबीएस) सेवा भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे असे त्यांनी सांगितले.


यावेळी विविध कंपन्यांमधून आलेल्या प्रतिनिधींच्या प्रश्नांना श्री. कुमार आणि श्री. पांडे यांनी उत्तरे दिली. नवीन मतदार नोंदणी व मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रपत्र क्र. ६, ७ आणि ८ नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. तसेच मतदार प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुलभ, जलद गतीने होण्यासाठी 'व्होटर हेल्पलाईन मोबाईल अॅप', ‘नॅशनल वोटर्स सर्व्हिस पोर्टल’ ( एनव्हीएसपी), मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसाठी 'गरुडा' मोबाईल अॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जवळच्या उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे ऑफलाईनपद्धतीने मतदार नोंदणी करता येते, असे यावेळी त्यांनी सांगितले.


यावेळी उपस्थित उद्योग समूहाचे प्रतिनिधी, औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी यांनी निवडणूक आयोगाशी संवाद साधला.

निवडणूक आयोगाने साधला तृतीयपंथी समुदायातील मतदारांशी संवाद

 निवडणूक आयोगाने साधला तृतीयपंथी समुदायातील मतदारांशी संवाद

पुणेदि. 9 : निवडणूक प्रक्रियेबाबतच्या तृतीयपंथी घटकांच्या समस्यांबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच त्यांना आपले म्हणणेसमस्या मांडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाईलअशी ग्वाही देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या देशपातळीवरील शुभारंभाच्या निमित्ताने भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या उपस्थितीत शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे त्यांनी तृतीयपंथी घटकांशी संवाद साधला. यावेळी निवडणूक उपायुक्त हृदयेश कुमारनिवडणुक आयोगाचे विशेष अधिकारी डॉ.रणबीर सिंगराज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडेतृतीयपंथी कल्याण मंडळाच्या सदस्या दिलशाद मुजावर आदी उपस्थित होते.

श्री. कुमार म्हणालेतृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी प्रकिया अतिशय सोपी केली असून तंत्रज्ञानजन्म दाखला आदी समस्यांवर मार्ग काढला जाईल. प्रत्येक राज्यात तृतीयपंथी मतदारांशी संवाद साधत आहोत. निवडणूक प्रकियेच्या अनुषंगाने तृतीयपंथींयासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याबाबत आयोग आवश्यक ती कार्यवाही करेल.

निवडणूक आयुक्त श्री. पांडे म्हणालेतृतीयपंथीयांची संख्या  सुमारे ५ लाख  आहे. तथापिकेवळ १० टक्के मतदार नोंदणी झाली आहे. त्यांनी मतदार नोंदणीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या राज्यघटनेने जातधर्मलिंग आदी कशाही आधारे भेदभाव होणार नाही याची हमी दिली आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियमातदेखील ही तरतूद असल्यामुळे तृतीयपंथीयांनाही मतदार नोंदणीनिवडणुकीत भाग घेण्यास कोणतीही समस्या येणार नाहीत्याबाबत आयोग अधिक प्रयत्न करेल. राष्ट्रीय स्तरावर आणि जिल्हा स्तरावर तृतीयपंथींयांमधून निवडणूक आयकॉन नेमण्याबाबत निवडणूक आयोग निश्चित विचार करेलअसेही ते म्हणाले.

यावेळी श्रीकांत देशपांडे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

बैठकीत मानीनी मोहितेडॉ. सान्वी जेठवाणीदिशा पिंकी शेखमाया अवस्थीमाया शेखमयुरी आवळेकर आदींनी समस्याअडीअडचणी मांडल्या तसेच विविध सूचना केल्या.

निवडणूक साक्षरता मंच आणि  राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांशी संवाद

तत्पूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील निवडणूक साक्षरता मंचाचे सदस्यराष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तसेच वुई फौंडेशनच्या स्वयंसेवकांशी संवाद साधला. साक्षरता मंचांकडून मतदार जागृतीसाठी राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांदरम्यान येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी  तांत्रिक आणि अन्य सहकार्याविषयी त्यांनी सदस्य आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केली.

मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ पुणे येथे

 मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ पुणे येथे

मतदार जनजागृतीच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे-मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार

लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी सर्वांनी मतदार नोंदणी करावी - निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे

 

पुणे दि. 9 : छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या देशपातळीवरील शुभारंभाच्या निमित्ताने भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे येथे मतदार जनजागृती सायकल फेरीचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी निवडणुक आयोगाचे विशेष अधिकारी डॉ.रणबीर सिंगनिवडणूक उपायुक्त निवडणूक उपायुक्त हिरदेश कुमारमहाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडेपुणे विभागीय आयुक्त सौरभ रावदिग्दर्शक नागराज मंजुळेराजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्या अंजली भागवत,  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुखक्रीडा आयुक्त सुहास दिवसेनिवडणूक आयोगाच्या माध्यम व संवाद महासंचालक शेफाली शरणस्वीप संचालक संतोष अजमेरा आदी उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार म्हणालेदेशाच्या प्रत्येक भागातील प्रत्येक पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी झाली पाहिजे. लोकशाही सशक्त करण्यासाठी मतदानही आवश्यक आहे. शहरी भागात मतदार नोंदणीचे प्रमाण कमी असल्याने त्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ पुण्यातून होत आहे.

देशातील दुर्गम भागवाळवंटसमुद्रकिनारादऱ्याखोऱ्यातील नागरिक मतदानात सहभाग घेतात हे आपले वैशिष्ठ्य आहे.  देशात वयाची शंभरी ओलांडलेले २ लाख ४८९ हजार मतदार  आहेत. हिमाचल प्रदेशच्या शामशरण नेगी यांनी मृत्यूपूर्वी ३ दिवस आधी टपाली मतदान केले. मतदानाविषयी ही जागरूकता आणण्यासाठी सर्वांनी मतदार जागृतीच्या कार्यात सहभागी व्हावेनिवडणुकीत मतदानाचा हक्कही बजावावा आणि निवडणूक आयोगाचे दूत म्हणून कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. आजची जनजागृती फेरी सर्वसमावेशक असल्याचे नमूद करून या फेरीत खेळाडूकलाकारयुवकज्येष्ठ नागरिकतृतीयपंथी मतदारही सहभागी होत आहेत असेही ते म्हणाले.

लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी सर्वांनी मतदार नोंदणी करावी -निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे

निवडणुक आयुक्त श्री.पांडे म्हणाले,  या वेळेचा मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम युवा मतदार केंद्रीत ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत १७ वर्षाचा युवकही नोंदणी करू शकणार आहे. १८ वर्ष पूर्ण होताच त्याचा समावेश मतदार यादीत केला जाईल. लोकशाही सशक्त करण्यासाठी सर्वांनी मतदार नोंदणी करावी आणि सायकलच्या चाकाच्या गतीप्रमाणे मतदार जनजागृतीचा संदेश प्रत्येक भागात पोहोचवावाअसे आवाहन त्यांनी केले.

श्री.मंजुळे यांनी सायकल फेरीला शुभेच्छा देताना युवा मतदारांना मतदार नोंदणीचे आवाहन केले. प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे असे ते म्हणाले.

यावेळी दिलेल्या संदेशात मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणालेशहरी भागातील १७ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांनी मतदार म्हणून नोंदणी करुन मतदान प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी करुन घेणे तसेच मतदार यादीचे शुद्धीकरण करणे या दुहेरी उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक गावात १० नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करुन मतदार यादीचे वाचननवीन मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. प्रत्येक महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणालेजिल्ह्यातील महाविद्यालय व विद्यालयामध्ये जनजागृती मोहीम आयोजित करुन १७ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांची   नोंदणी करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

            युवा मतदार सार्थक पडाळेतृतीयपंथी समुदायातील मतदार सानवी जेठवानीअमित मोहितेज्येष्ठ नागरिक आनंद पडाळेदिव्यांग मतदार शिवाजी भेगडे यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकल फेरीचा शुभारंभ केला.

सायकल फेरीच्या शुभारंभ प्रसंगी बॅडमिंटन खेळाडू निखिल कानिटकरआंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू अभिजित कुंटेबॉक्सिंग ऑलिंपियन मनोज पिंगळेशिवछत्रपती पुरस्कार विजेते सुमेश झेपेएव्हरेस्ट शिखर वीर आशिष मानेआनंद माळी,  हॉकी खेळाडू अजित लाखाअर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकरसायकलिंग ऑलिंपियन मिलिंद झोडगे उपस्थित होते.

सायकल फेरीत विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीआंतरराष्ट्रीय खेळाडूयुवा मतदारज्येष्ठ नागरीकतृतीयपंथी समुदायाचे प्रतिनिधीअधिकारी-कर्मचाऱ्यांसह सुमारे ४०० नागरिकांनी सहभाग घेतला.

            राधा चौक- पुणे विद्यापीठ चौक- राजभवन-केंद्रीय विद्यालय समोरून- कस्तुरबा वसाहत- ब्रेमेन चौक- परिहार चौक- डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक- मेरी पॉईंट हॉस्पिटल- ताम्हाणे चौक- ज्युपिटर हॉस्पिटल- बाणेर बालेवाडी फाटामार्गे शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे येथे सायकल फेरीचा समारोप झाला.

मतदार जागृतीसाठी नागरिकांशी संवाद

सायकल फेरीदरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांनी कस्तुरबा गांधी वसाहत येथे नागरिकांशी संवाद साधला. युवक आणि वयोवृद्धांनीही मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी पुण्याची ओळख असलेल्या ढोल पथकाचे आणि पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.

000

 

Wednesday, 9 November 2022

आंगणेवाडीतील प्रमुख रस्त्यांच्या सुसज्जीकरणासाठी

 आंगणेवाडीतील प्रमुख रस्त्यांच्या सुसज्जीकरणासाठी १० कोटींचा निधी

पालकमंत्री रविंद्र चव्हाण

भराडीदेवी मंदिर परिसराचा लवकरच कायापालट होणार

 

            मुंबई, दि. 9 :- कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील  भराडीदेवी मंदिर परिसरातील संपूर्ण रस्त्यांचा तातडीने विकास करण्यात येणार आहे. आंगणेवाडीतील रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला.

            या सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करुन सुस्थितीत करण्याच्या कामासाठी रुपये १० कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे आंगणेवाडी परिसरातील नागरी सुविधा व विकास कामांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या परिसराचा कायापालट होणार आहे.

            आंगणेवाडी मधील सोयी-सुविधांसाठी पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेच्या ताब्यातील दोन इतर जिल्हा मार्ग व एक ग्रामीण मार्ग दर्जोन्नती करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचे आता डांबरीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये काळसे कट्टा रस्तामालवण-बेळणा रस्तागोळवण-पोईब रस्ताओझर-कांदळगाव मागवणे मसुरे-बांदिवडे-आडवली-भटवाडी रस्ताराठीवडे-हिवाळे-ओवळीये-कसाल-ओसरगाव रस्ताचौके-धामापूर रस्ता व कुमामे-नांदोस-तिरवडे-सावरवाड रस्ता या सर्व रस्त्यांचा यामध्ये समावेश असून या रस्त्यांच्या सुसज्जीकरणासाठी १० कोटी ६० लाखांचा निधी पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी मंजूर केला आहे.

            आंगणेवाडी हे मालवण तालुक्यातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असून तेथील भराडीदेवी हे सुप्रसिद्ध आहे. दरवर्षी भराडीदेवीच्या यात्रेकरिता मुंबईसह महाराष्ट्रातून दरवर्षी सूमारे ५ लाख भाविक दर्शनासाठी येतात. त्याचप्रमाणे मालवण तालुक्यातील तारकर्ली व देवबाग येथील समुद्र किनारे व प्रसिद्ध सिंधुदूर्ग किल्ला येथे भेट देण्याकरिता ऑक्टोबर व मे महिन्यांच्या दरम्यान पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंजूर केलेले हे रस्ते आंगणेवाडीला जाणारे प्रमुख रस्ते असल्याने या रस्त्यांवरुन वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. म्हणूनच हे रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती करण्याचा निर्णय पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी घेतला आहे.  तसेचबिळवस आंगणेवाडी रस्ता हा ४.३०० कि.मी. लांबीच्या या रस्त्याचे काम सुद्धा आता लवकरच सुरु होणार आहे. तसेचचौके आमडोस माळगांव मांगवणे आंगणेवाडी रस्ता हा एकूण २२.२०० कि.मी. लांबीच्या रस्त्याची सिंधुदूर्ग जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यामध्ये दर्जोन्नती करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे लवकरच येथील सर्व रस्ते सुसज्ज व दर्जेदार होणार आहेत. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कोल्हापूर-चंदगड-तिल्लारी दोडामार्ग रस्त्यावरील मोठ्या धोकादायक पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला असून या कामासाठी सुमारे २ कोटीच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे.

            आंगणेवाडीतील भराडीदेवीची यात्रा दरवर्षी साधारणत: फेब्रुवारी मार्चमध्ये होत असते. या यात्रेच्या पूर्वी या प्रमुख रस्त्यांची कामे व येथील मंदिर परिसर सुसज्ज करण्याच्या दृष्टीने विभागाला आदेश देण्यात आले आहेत. आंगणेवाडीतील विकासकामे, महत्त्वपूर्ण सोयीसुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही.  पुढील वर्षी आंगणेवाडी यात्रेच्या पूर्वीच सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करणार असल्याची माहिती पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी दिली.

थेट सरपंचपदांसह 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान.

 थेट सरपंचपदांसह 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान.

            मुंबई, दि. 9 (रानिआ) : राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. 


            श्री. मदान यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. तसेच नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.


            विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या : अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदूर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.



ब्रिटनमधील वेस्टमिडलँड आणि महाराष्ट्रात सामंजस्य करार

 ब्रिटनमधील वेस्टमिडलँड आणि महाराष्ट्रात सामंजस्य करार करणार

इलेक्ट्रिक वाहनपर्यटन प्रकल्पांच्या निर्मितीसाठी परस्परांना सहकार्य

 

            मुंबई, दि. 9 :- ब्रिटनमधील वेस्टमिडलँड आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये गुंतवणूकविषयक सामंजस्य करार करण्यात येणार आहे. वेस्टमिडलँडचे महापौर अँडी स्ट्रीट यांनी शिष्टमंडळासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी परस्पर सहकार्याने दोन राज्यातील संबंध अधिक दृढ  करण्याचा निर्णय घेतला. मुंबई-बर्मिंगहम विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            महाराष्ट्रात पुढील काही वर्षात हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गशिवडी-न्हावाशेवा सी लिंक असे अनेक मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प उभे राहत असून त्याद्वारे गुंतवणुकीच्या अनेक मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे राज्यात भविष्यात निर्माण होणाऱ्या संधीचा फायदा घेण्यासाठी वेस्टमिडलँडमधील कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. याबाबत सकारात्मकता दर्शवत एकमेकांशी गुंतवणूक विषयक सामंजस्य करार करून हे संबंध अधिक वृद्धिंगत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

            लंडनपासून जवळच वेस्टमिडलँड हे राज्य वसलेले आहे. जॅग्वारकॅडबरी आणि जेसीबीसारख्या प्रतिष्ठीत कंपन्या या भागातील आहेत. गेल्या काही वर्षात राज्यातील अनेक मराठी तरुणांनी स्टार्टअपद्वारे या राज्यात आपल्या कंपन्या सुरू केल्या असून त्यांना स्थानिक प्रशासनाकडून उत्तम सहकार्य मिळत आहे. त्यामुळे दोन देशांप्रमाणे दोन राज्यामध्ये गुंतवणूक विषयक संबंध अधिक वाढावेत, अशी मागणी या बैठकीत वेस्टमिडलँडचे महापौर अँडी स्ट्रीट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

            वेस्टमिडलँड राज्य हे इलेक्ट्रिक वाहने क्षेत्रातले मोठे हब असून त्यादृष्टीने राज्यात नवीन गुंतवणूक येण्यासाठी मोठी संधी आहे. त्यासोबतच मुंबई ते बर्मिंगहम थेट विमानसेवा सुरू झाल्यास या दोन राज्यात पर्यटन वाढीसाठी त्याचा मोठा फायदा होऊ शकतो ही बाबही अँडी स्ट्रीट यांनी निदर्शनास आणून दिलीत्यावर  ही सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी राज्य शासन केंद्र सरकारकडे नक्की पाठपुरावा करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला दिली.

            वेस्टमिडलँड येथे बोरिक कॅसलएजबर्स्टन क्रिकेट ग्राउंडएमस्टरडम येथील सुप्रसिद्ध केनॉल अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. या जागा भारतीय पर्यटकांना पहाता येतील त्यामुळे पर्यटनात मोठ्या संधी उपलब्ध असल्याने त्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यासोबतच पायाभूत सुविधा क्षेत्रात अनेक कंपन्या कार्यरत असून त्यांना देखील या दोन राज्यामध्ये काम करण्याची संधी मिळू शकेल. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन निर्मितीपर्यटन आणि पायाभूत सुविधांचा विकास या तीन क्षेत्रात महाराष्ट्र आणि वेस्टमिडलँड यांनी एकत्रितरित्या काम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

            या बैठकीला इयन ब्रुकफिल्डएलन गेमेलमुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणीनील रामीबेथ येट्सअभिजित आफलेआशुतोष चंद्रा हे देखील उपस्थित होते.

००००


 

रेल्वेसाठी लागणार्‍या उत्पादनांमध्ये खाजगी उद्योगांचा सहभाग वाढवु

 रेल्वेसाठी लागणार्‍या उत्पादनांमध्ये खाजगी उद्योगांचा सहभाग वाढवु - रावसाहेब दानवे

------- महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या मागणीला यश------------

नवी दिल्ली ः रेल्वे विभागासाठी लागणार्‍या विविध उत्पादनांपैकी खाजगी उद्योगांसाठी अधिक उत्पादने खुली करू अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची ललित गांधी यांना दिली.

‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने नुकतीच नवी दिल्ली मधील रेल भवन येथे रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन रेल्वे विभागासाठी लागणारी अधिकाधिक उत्पादने खाजगी उद्योगांसाठी खुली करून देण्यासाठी केलेल्या मागणीचा पाठपुरावा व अन्य मागण्यांसाठी बैठक आयोजित केली होती त्याप्रसंगी ते बोलत होते.


रेल्वेसाठी लागणारे विविध सुटे भाग, उपकरणे उत्पादन करण्याची परवानगी खाजगी उद्योगांना दिल्यास मोठ्या प्रमाणावर उद्योग वाढण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी उपयोगी ठरेल अशी भुमिका ललित गांधी यांनी मांडली.


यावेळी रेल्वे माल वाहतुक, प्रवासी वाहतुकीसंबंधी विविध मागण्याही सादर करण्यात करण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने नाशिक पुणे नवीन रेल्वे मार्गाचे काम तात्काळ सुरू करणे, कोल्हापूर-वैभववाडी या कोकण रेल्वेस जोडणार्‍या मार्गाचे काम तात्काळ सुरू करणे, नाशिक- पुणे इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करणे, कोरोना नंतर सेवा बंद केलेल्या सर्व गाड्या पुर्ववत सुरू करणे, कोरोना काळानंतर विविध एक्सप्रेस चे बंद केलेले सर्व थांबे पुर्ववत सुरू करणे या मागण्यांचा प्रामुख्याने समावेश होता.

तसेच कोकण रेल्वे मार्गावरील कुडाळ येथे पार्सल सेवा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.

यासर्व मागण्यांसाठी आवश्यक तो अहवाल तात्काळ तयार करण्याचे निर्देश रेल्वे राज्यमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.

तसेच 17 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत लखनौ येथे संपन्न होणार्‍या रेल्वे च्या डिझाईन व संशोधन केंद्रातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय प्रदर्शनास सहभागी होण्यासाठी 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स' च्या शिष्टमंडळाला विशेष निमंत्रण दिले.


Featured post

Lakshvedhi