Tuesday, 10 May 2022

 


  🌞 *सकाळ* म्हणजे नविन दिवस,

नविन सुरुवात

काल जे घडले ते विसरून

पुन्हा नव्या ने आयुष्य सुरु करा.

     *आयुष्य* सुंदर आहे

त्याला आणखी सुंदर बनवायचा

प्रयत्न करा. 


 *💓🌴🌻!शुभ सकाळ!🌻🌴💓*: *आज उद्या करता करता*

*आयुष्य संपून जातं,*

*मनासारखं जगायचं तेवढं*

*मात्र राहून जात...*


  *🌹 सुप्रभात🌹*

तंत्र शिक्षण



 सेवा क्षेत्रात नवीन रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी

- उदय सामंत

कौशल्य वृद्धीसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि नॅसकॉम यांच्यात सामंजस्य करार.

            मुंबई, दि. 9 : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलामुळे नवनवीन रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या सेवा क्षेत्रात व्यावसायिक कौशल्ये देखील तितकेच महत्वाची आहेत. उदयोन्मुख माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. कुशल प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळावे यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि नॅसकॉम (नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनिज) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

            मंत्री श्री. सामंत यांच्या शासकीय निवासस्थानी उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि नॅसकॉम यांच्यात कौशल्य वृद्धीसाठी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ, नॅसकॉमचे संचालक डॉ. चेतन सामंत, विजय चौघुले, सचिन म्हस्के, श्रीदेवी सिरा उपस्थित होते.

            मंत्री श्री.सामंत म्हणाले, भारतासारख्या विकसनशील देशात सेवा क्षेत्र जलदगतीने वृद्धिंगत होत आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात सेवा क्षेत्राचा वाटा लक्षणीय आहे. माहिती तंत्रज्ञानावर आधारित ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो या सारख्या कंपन्या, भीम, पेटीएम या सारखे ॲप, ‘आधार’ बेस्ड ई के वाय सी च्या आधारे डिजिटल बँकिंग सारख्या सुविधा, रेल्वे, बस वाहतूक यांची ॲप आधारित सेवा, ग्राहकांची रुची, खरेदीचा पॅटर्न, खरेदीचे ठिकाण इत्यादी बाबींचे पृथक्करण करून मार्केटिंग करण्याचा सल्ला देणाऱ्या कंपन्या, स्मार्ट वातानुकूलित यंत्रे, स्मार्ट तंत्रज्ञानावर आधारित वाहने, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता इंटरनेट ऑफ थिंग्स अशा माहिती तंत्रज्ञानाच्या युगात योग्य प्रशिक्षण मिळाल्यास रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील.

            सेवा क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि आज असलेली डिजिटल तंत्रज्ञानस्नेही तरुण पिढीची उपलब्धता लक्षात घेऊन हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊन सेवा क्षेत्रास भरीव योगदान दिले जाईल, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

            या सामंजस्य करारानुसार राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुकलाशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग तंत्रज्ञान, कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन शिक्षक यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाने नॅसकॉम च्या सहकार्याने नॅसकॉम यांनी फ्युचर स्किल्स प्राईम (Future Skills Prime) हे ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाणार आहे. फ्युचर स्किल्स प्राईम (Future Skills Prime) या ऑनलाईन व्यासपीठावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना आवश्यक असणारी प्रमाणित कौशल्ये विकसित करणारे ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ज्या उमेदवारांना नवीन कौशल्ये आत्मसात करायची आहेत अथवा प्रशिक्षित उमेदवारांना आणखी प्रगत कौशल्ये आत्मसात करायची आहेत अशा उमेदवारांना येथे नोंदणी करुन ऑनलाईन कौशल्य विषयक अभ्यासक्रम शिकता येतील. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना चाचणीनंतर प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

            अभ्यासक्रम केवळ गणित, विज्ञान-तंत्रज्ञान व अभियांत्रिकी शाखांच्या विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित नसून या शाखा व्यतिरिक्त इतर शाखा उदा. वाणिज्य, कला या शाखेतील विद्यार्थ्यांनादेखील आपली आवड आणि कल लक्षात घेऊन प्रशिक्षण घेता येईल. अंदाजे एक लाख उमेदवारांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट या सामंजस्य कराराद्वारे निर्धारित केले आहे. या ऑनलाईन व्यासपीठावर सद्य:स्थितीत एकूण 202 अभ्यासक्रम तयार असून त्यापैकी 43 अभ्यासक्रम नि:शुल्क आहेत. तर 159 अभ्यासक्रम सशुल्क आहेत. हे सर्व अभ्यासक्रम मूलतः Big Data Analytics, Cyber Security, Internet of Things (IoT), Augmented Reality/ Virtual Reality, Artificial Intelligence and Cloud Technologies या उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी संबंधित प्रमाणित अभ्यासक्रम आहेत. तथापि, औद्योगिक जगतास Design Thinking Project Management या सारख्या विषयातील प्रशिक्षित मनुष्यबळाची देखील मोठी गरज भासते ही बाब लक्षात घेऊन हे अभ्यासक्रम आखण्यात आला आहे.

            ऑनलाईन व्यासपीठावर उपलब्ध अभ्यासक्रम (1) Digital Awareness/Pathways (2), Foundation Courses (3.) National Occupational Standard Aligned content /Deep Skill Courses आणि (4) Bridge Courses त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे रोजगार विषयक ध्येय सध्या करताना एखाद्या विशिष्ट तंत्रज्ञानाचे नेमके कोण कोणते ऑनलाईन विषय शिकणे आवश्यक आहे ते कळू शकणार आहे.

            या व्यासपीठावर केवळ ऑनलाईन अभ्यासक्रमच नाही तर कल चाचणी (Aptitude) कल व क्षमता निदान ( Capability Diagnosis ) या सुविधा आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना करियर विषयक नियोजन करण्यास मदत होईल.

            या सामंजस्य करारांतर्गत राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकवर्ग यांचे प्रशिक्षणासाठी नोंदणी, प्रशिक्षण दरम्यान व प्रशिक्षण झाल्यानंतरचे मूल्यमापन प्रमाणीकरण आणि यासंबंधीची सर्व सांख्यिकी आणि विश्लेषण प्रशासनास उपलब्ध करून देणे, यासाठी राज्य स्तरावर एक राज्यस्तरीय नोडल टीम तयार करण्यात येणार आहे. या टीममध्ये तंत्र शिक्षण संचालनालय, उच्च शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास अकॅडेमी यांचे प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. ही नोडल टीम नॅसकॉमचे वतीने ITITES Sector Skills Council या नॅसकॉम च्या उपविभागासमवेत काम करेल व उपक्रमाचे मूल्यमापन सनियंत्रण केले जाईल.

००००


           


 

आपत्ती व्यवस्थापन

 मान्सूनपूर्व कामे गतीने करा

आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदतीसाठी तत्पर रहावे


- विजय वडेट्टीवार · कोकण व पुणे महसूली विभागाची मान्सूनपूर्व आढावा बैठक  · आपत्ती प्रतिसाद यंत्रणेबाबत देण्यात येणार सर्व जिल्ह्यांना प्रशिक्षण.

            मुंबई, दि.9 : सर्व प्रशासकीय यंत्रणांनी मान्सूनपूर्व कामे गतीने करावीत. त्याचबरोबर अचानक येणारी वादळे व पूर यामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी, या आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना तत्काळ मदत व पुनर्वसन करण्यासाठी राज्यात आपत्ती प्रतिसाद यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात येणार असून याचे सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांना प्रशिक्षण द्यावे, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

            आज कोकण व पुणे महसूली विभागातील जिल्ह्यांची मान्सूनपूर्व आढावा बैठक दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून झाली. यावेळी मंत्रालय दालनातून आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री श्री. वडेट्टीवार बोलत होते. या बैठकीला मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, आपत्ती व्यवस्थापन संचालक संजय धारूरकर यांच्यासह दूरदृश्यप्रणालीव्दारे कोकण विभागीय उपायुक्त मकरंद देशपांडे, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी पी.बी.पाटील, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, मुंबई महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. नारळीकर, पालघरचे जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, पालघरचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण महाजन, सांगलीच्या अप्पर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख, साताराचे निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) श्री.मुधोळकर तसेच दोन्ही विभागातील जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी उपस्थित होते.

         मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, आपत्ती कालावधीत शून्य मृत्यूदर हे शासनाचे ध्येय असून, आपत्ती प्रतिसाद यंत्रणा (Incidence Response System) राज्यात लागू करण्यात येत आहे. आपत्तीत प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणामध्ये योग्य तो समन्वय राहावा, यासाठी ही यंत्रणा काम करणार आहे. त्यामुळे या यंत्रणेसाठी लागणारे प्रशिक्षण व इतर माहिती जिल्हांना तत्काळ पुरवावी, अशा सूचना यावेळी श्री. वडेट्टीवार यांनी बैठकीत दिल्या.

             मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले की, गेल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणात पावसामुळे आपत्तीला तोंड देत आहोत. यंदाच्या वर्षीही सरासरीपेक्षा जास्त व वेळेपूर्वी पाऊस येणार असल्याचा अंदाज आहे. हा अंदाज पाहून त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात आपत्ती निवारणाची कामे करण्यात यावीत. अचानक येणारे पूर, दरडी कोसळणे आदी आपत्तीला तोंड देण्यासाठी स्थानिक ठिकाणची प्रशासकीय यंत्रणा गतीमान असली पाहिजे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पूर व अतिवृष्टीमुळे पाणी साठू नये यासाठी ज्या क्षेत्रात नागरीकरण मोठ्या प्रमाणात आहे, तेथे पावसाळ्यापूर्वीची नाले सफाईची, धोकादायक वृक्ष तोडणे अथवा फांद्या तोडणे, रस्ते दुरुस्ती, बांधकामाची कामे पूर्ण करावीत. यंदाही पाऊस लवकर सुरू होणार आहे, हे लक्षात घेता सर्व यंत्रणांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आपली आपत्ती यंत्रणा बळकट करावी. विशेषत: मुंबई प्रशासनाचा रेल्वे प्रशासनाशी समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे.

            मान्सूनपूर्व बैठका, नियंत्रण कक्ष कार्यान्वित करणे, तत्काळ प्रतिसाद यंत्रणेची अंमलबजावणी करून कोणत्याही प्रकारच्या आपत्ती कालावधीत जिवीत हानी होवू नये, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. शासनाने मंजूर केलेले कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पातंर्गतची कामे गतीने करावीत, अशा सूचना यावेळी मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी दिल्या.   

             मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले की, कोल्हापूर, सातारा व सांगली या भागात वाढता पुराचा धोका लक्षात घेता राज्य आपत्ती प्रतिसाद दल व राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची टीम कायमस्वरूपी या भागात राहण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. आपत्ती कालावधीत मदत करणाऱ्या साहसी टीमची नियुक्ती करून त्यांचे दूरध्वनी क्रमांक अद्यावत करावेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने स्थानिक मागणीनुसार अद्यावत वाहने अथवा साहित्य मागणीसाठी प्रस्ताव सादर करावेत.

            पावसाचे प्रमाण वाढल्यास दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. त्याची आतापासूनच तयारी करण्यात यावी. पूरप्रवण गावे, नदीकाठची गावे यांचा संपूर्ण अभ्यास करावा. यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयांनी काम करणे अत्यंत गरजेचे आहे, अशा सूचनाही मंत्री. श्री. वडेट्टीवार यांनी बैठकीत केल्या.पावसाचे प्रमाण वाढल्यास दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. त्याची आतापासूनच तयारी करण्यात यावी. पूरप्रवण गावे, नदीकाठची गावे यांचा संपूर्ण अभ्यास करावा. यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयांनी काम करणे अत्यंत गरजेचे आहे, अशा सूचनाही मंत्री. श्री. वडेट्टीवार यांनी बैठकीत केल्या.

            कोकण विभागात पावसाळ्यात अनेकदा आपत्ती ओढावते. अशा वेळी स्थानिक ग्रामस्थांची मदत घेऊन तत्काळ मदत पोचविण्यासाठी पथके तयार करण्यात यावीत. या पथकांना लागणारे आवश्यक ते साहित्य पुरविण्यात येईल. तसेच प्रत्येक जिल्हा पातळीवर तरुणांचे पथक तयार करून त्यांना आपत्ती काळातील मदतीसंदर्भातील प्रशिक्षण देण्यात यावे. रायगड येथे राज्य आपत्ती निवारण पथकाचे दल तैनात ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथकही येथे तैनात करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            प्रत्येक गावाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा करण्याच्या व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत आवश्यक साहित्यांची मागणी करण्याच्या सूचना विभागाचे प्रधान सचिव श्री. गुप्ता यांनी दिल्या.

            यावेळी दोन्ही विभागातील जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्य आपत्ती निवारणासाठी तसेच पावसाळ्यात करावयाच्या उपाययोजनासंदर्भात माहिती दिली.

 अन्न कचऱ्यापासून निर्मित विजेवरइलेक्ट्रिक व्हेईकल चार्ज करण्याचा देशातील पहिला मान मुंबईला!

राज्यभरात इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारणार

- आदित्य ठाकरे

         · केशवराव खाड्ये मार्गावरील प्रकल्पाचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले लोकार्पण 

         · महानगरपालिकेचा ‘डी’ विभाग व एरोकेअर क्लीन एनर्जी यांच्या संयुक्त प्रयत्नाने प्रकल्प उभारणी.

               मुंबई, दि. 9 :- मुंबई महानगराच्या पर्यावरण संवर्धनासाठी आणि ‘स्वच्छ - सुंदर मुंबई’साठी एका पाठोपाठ उपक्रम सुरु करताना बृहन्मुंबई महानगरपालिकेने आज आणखी एका अभिनव उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. ‘डी’ विभागातील केशवराव खाड्ये मार्गावर अन्न कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाला इलेक्ट्रिक व्हेईकल फास्ट चार्जिंग स्टेशनची जोड देण्यात आली आहे. अशा स्वरुपाचे भारतातील हे पहिलेच चार्जिंग स्टेशन असून त्याचे लोकार्पण राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज (दिनांक ९ मे २०२२) करण्यात आले.

            मंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, फूड वेस्टमधून निर्मित वीजेचा उपयोग करुन इलेक्ट्रिक व्हेईकल चार्ज करणारे भारतातील हे पहिलेच केंद्र आहे. अशा स्वरुपाचे केंद्र मुंबईतच नव्हे तर राज्यातील शक्य त्या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विशेषतः महामार्गांवर त्याचा प्राधान्याने विचार केला जाईल. त्यातून विद्युत वाहनांच्या वापराला चालना तर मिळेलच, सोबत सेंद्रिय, जैविक स्वरुपाच्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन देखील होईल, असे त्यांनी नमूद केले.   

            महानगरपालिकेचा ‘डी’ विभाग आणि एरोकेअर क्लीन एनर्जी यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प साकारला आहे. हाजी अली परिसरात केशवराव खाड्ये मार्गावर माँसाहेब स्व. सौ. मीनाताई ठाकरे उद्यानाजवळ महानगरपालिकेने टाकावू अन्नापासून (फूड वेस्ट) वीजनिर्मिती प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सप्टेंबर २०२१ मध्ये करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे दीड लाख किलोपेक्षा अधिक टाकावू अन्नपदार्थांवर प्रक्रिया करुन वीजनिर्मिती करण्यात आली आहे.

            या प्रकल्पातून तयार होणारी वीज आता विद्युतभारित वाहनांसाठी अर्थात इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी उपयोगात येणार आहे. या वीजनिर्मिती प्रकल्पाला जोडून इलेक्ट्रिक व्हेईकल फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण देखील पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे यांनी केले. या ठिकाणी चार्जिंगसाठी दोन पॉईंट आहेत, म्हणजेच एकावेळी दोन वाहने आणि तेही जलद गतीने चार्ज होवू शकतात. माफक दरात ही चार्जिंग सुविधा उपलब्ध असेल.

            या लोकार्पण प्रसंगी उप आयुक्त (पर्यावरण) सुनील गोडसे, ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड, एरोकेअर क्लीन एनर्जीचे संस्थापक अंकीत झवेरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.    

0000




 महाराणा प्रतापसिंह यांची जयंती २५ मे ऐवजी २ जून रोजी साजरी होणार.

            मुंबई, दि. ९ : सन २०२२ मध्ये राष्ट्र पुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्यासंदर्भात दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी परिपत्रक काढण्यात आले होते. त्यानुसार महाराणा प्रतापसिंह यांची जयंती तिथीनुसार बुधवार दिनांक २५ मे २०२२ रोजी साजरी करण्यात येणार होती. ती आता २५ मे ऐवजी २ जून २०२२ रोजी साजरी होणार आहे.

            शासनाने दिनांक ५ मे २०२२ रोजी शुध्दीपत्रक काढले असून त्यानुसार महाराणा प्रतापसिंह यांची जयंती तिथीनुसार २ जून २०२२ रोजी साजरी करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील, जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांची ( तिथीनुसार ) जयंती आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करून त्याच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे सामान्य प्रशासन विभागाने शुद्धीपत्रक जारी केले आहे.

 नवीन मुक्ताबाई मंदीर ते मुक्ताईनगरपर्यंत रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

तातडीने अंमलबजावणीचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश

            मुंबई, दि. 9 :- श्री संत मुक्ताबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता नवीन मुक्ताबाई मंदीर ते मुक्ताईनगर शहरापर्यंतच्या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज दिले.

            मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन मुक्ताईनगर येथील रस्त्याची सुधारणा करण्याची मागणी केली होती. या मागणीची सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी तातडीने दखल घेऊन आज या संदर्भात दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. बैठकीला ॲड. पाटील यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाशिक विभागाचे मुख्य अभियंता श्री. भोसले, जळगावच्या अधीक्षक अभियंता श्रीमती गिरासे आदी अधिकारी उपस्थित होते.

            मुक्ताईनगर येथे दर तीन महिन्यांनी होणारे कार्यक्रम आणि त्यासाठी वारकऱ्यांसह लाखो भाविक दर्शनासाठी येथे येत असतात, त्याशिवाय 25 मे रोजी श्री संत मुक्ताई पुण्यतिथी असून यावेळी साधू-महंत, वारकरी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. ती लक्षात घेऊन भाविकांच्या सोयीसाठी नवीन मुक्ताबाई मंदीर ते मुक्ताईनगर शहरापर्यंतच्या रस्त्याची रुंदी वाढविण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. या रस्त्याच्या कामाचा राज्य रस्ते प्रकल्पांमध्ये समावेश करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मुक्ताईनगर शहर ते संत मुक्ताबाई यांचे जुने मंदिर या रस्त्यावरील खड्डे बुजवून या रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचनाही मंत्री. श्री. चव्हाण यांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

००००



Featured post

Lakshvedhi