Tuesday, 3 May 2022

 राज्यसेवा पूर्व परीक्षा :

 सामान्य अध्ययन पेपर क्र. २ अर्हताकारी करण्याचा निर्णय

आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी घेतला निर्णय

            मुंबई, दि. २ - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील सामान्य अध्ययन पेपर क्रमांक २ (CSAT) हा अर्हताकारी (Qualifying) करण्याचा निर्णय आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी घेतला आहे.

            राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील सामान्य अध्ययन पेपर क्रमांक २ (सी- सॅट) हा अर्हताकारी होण्यासाठी किमान ३३ टक्के गुणांची अट अर्हता प्राप्त करण्यासाठी विहित करण्यात आली आहे. या पेपरमध्ये किमान ३३ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक १ मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.

००००

 




माईंच्या ९ लेकींना मिळाले आयुष्याचे जोडीदार (फोटो आहेत)

कुंभारवळण येथील ममता बाल सदनमध्ये सिंधुताईंच्या ९ लेकींचा थाटात साखरपुडा

अनाथांची माय पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांचे स्वप्न पूर्ण होणार.

संपूर्ण जगभर अनाथांची माय अशी ओळख असलेल्या पद्मश्री डॉ. स्व. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या ९ लेकींना आयुष्याचे जोडीदार मिळाले आहेत. पुणे जिल्ह्यातील कुंभारवळण येथील ममता बाल सदनमध्ये माईंच्या या लाडक्या ९ लेकींचा आज रविवार दिनांक १ मे २०२२ रोजी थाटात साखरपुडा पार पडला. हयातीत असतानां त्यांनी आपल्या सोन्यासारख्या मानस कन्यांचे थाटात लग्न पार पडावे असं स्वप्न बघितलं होत आज त्या नाहीयेत मात्र ममता बाल सदनने त्यांचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे.

 मुलगी उपवर झाली की आईच्या मनाला तिच्या लग्नाचे वेध लागतात. पुढच्या आयुष्याची वाटचाल करण्यासाठी तिला अनुरूप साथीदाराची गरज आहे हे जाणवतं. तरी त्याचबरोबर एकीकडे मन खूप हळवं बनते. असच काही माईंचं झालं होत. लहानाचं मोठं सांभाळलेल्या आपल्या लेकींना विवाहाच्या बंधनात अडकतांनाचे स्वप्न साकार होत आहे. हे नियतीला मान्य नसले तरी आज त्यांच्या पश्चात ९ लेकींना आयुष्याचे जोडीदार मिळाले आहेत. आज रविवारी कुंभारवळण येथील ममता बाल सदनमध्ये ९ लेकींचा एकसाथ थाटात साखरपुडा पार पडला. परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला होता. संस्थेच्या वतीने विधिवत पूजापाठसह साखरपुडाचे नियोजन करून उपवर मुलाला अंगठी, संपूर्ण पोशाख, श्रीफळ देऊन सोपस्कार पार पाडले. माईंच्या ९ मानस कन्यांच्या मामांनी उपवर मुलांच्या मामांचे संस्कुतीप्रमाणे कुमकुम तिलक लावून श्रीफळ देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी आ. संजय जगताप यांच्या सौभाग्यवती राजवर्धिनी जगताप, माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांची कन्या ममता शिवतारे, पंचायत समिती सदस्य सुनीताताई कोलते, चिंतामणी हॉस्पिटल सासवड येथील डॉ. वांढेकर, डॉ. वाघोलीकर, डॉ. रावळ, कुंभारवळणचे सरपंच अश्विनी खळदकर, माजी सरपंच अमोल कामठे, देविदास कामठे यांच्यासह पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून मुलींना आशीर्वाद दिले. लेकींच्या साखरपुडा कार्यक्रमाच्या निमित्ताने ममता बाल सदनमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. पत्रिकांच्या जुळणाऱ्या गुणांपेक्षा दोन मनांचं, दोन विचारांचं जुळणं महत्त्वाचं असतं. नात्यांत असणारं प्रेम महत्त्वाचं आहे आणि जिथे प्रेम, सामंजस्य, आपुलकी असते तीच नाती जास्त टिकतात. या सर्व गोष्टी ममता बाल सदनने लक्षात घेऊन आपल्या मुलींना साजेसा होईल अश्याच योग्य उपवर मुलाचा शोध घेतला. सर्व पाहणी झाल्यानंतर सबंधित उपवराच्या परिवाराला आदराने संस्थेत बोलावून पाहणीचा कार्यक्रम घेतला. बैठकीमध्ये उपवर मुलगा आणि उपवर मुलगी या दोघांना समोरासमोर बसवून प्रश्न विचारण्यात आले. दोघांना हि आपल्या आवडी-निवडी काय आहे याबाबत विचारणा केली. त्यानंतर दोघांची पसंती आहे कि नाही हे लक्षात घेऊन टीळ्याचा कार्यक्रम सुद्धा पार पाडला. सोहळ्याच्या आयोजनाकरिता माई सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र दिपक गायकवाड, कन्या ममता सिंधुताई सपकाळ, विनय सपकाळ, अधीक्षिका स्मिता पानसरे, मनीष जैन, पूजा जैन तसेच ममता बाल सदनचा स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

माईंच्या लेकींना आशीर्वाद असावेत - दिपक गायकवाड

 पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ अनाथांच्या माई यांनी सांभाळलेल्या ९ अनाथ लेकींचा विवाह सोहळा दि. १५ मे २०२२ रोजी लक्ष्मी लॉन्स मगरपट्टा सिटी पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. माईंनी सांभाळलेल्या ९ अनाथ लेकीचा विवाह सोहळा यशस्वीपणे पार पडावा असा मानस ममता बाल सदन कुंभारवळण यांचा आहे. आज समाजाला माईंच्या सामाजिक कार्याची जाणीव आहे. "माझ्या लेकींचा विवाह सोहळा थाटात पार पडला पाहिजे असं स्वप्न सिंधुताईंनी बघितलं होत ते आज सत्यात उतरत आहे. 

 सिनेमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जगासमोर आणावी




                                                            -राज्यपाल 

        मुंबई, दि. 3 :- युद्ध व शस्त्रास्त्रे ही देशाची सच्ची शक्ती नसून संस्कृती हीच भारताची सौम्य संपदा आहे. संस्कृतीला आधारभूत मानून सर्जनशीलतेला चालना दिल्यास आपण अजरामर कृती तयार करू शकू असे सांगताना सिनेमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जगासमोर आणावी प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. 'भारतीय सिनेमा व सौम्य संपदा' या विषयावरील दोन दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल कोश्यारी यांनी राजभवन येथे केले, त्यावेळी ते बोलत होते.  

            भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद व फ्लेम युनिव्हर्सिटी यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या या चर्चासत्राला ज्येष्ठ चित्रपट निर्माते तसेच फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शेखर कपूर, माजी खासदार रूपा गांगुली, आयसीसीआरचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, फ्लेम युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. दिशान कामदार, प्रसिद्ध निवेदक हरीश भिमानी व संयोजक विनोद पवार प्रामुख्याने उपस्थित होते.   

            भारतीय सिनेमाच्या सौम्य संपदेमुळेच अनेक देशातील लोकांना भारतीय भाषा समजत असल्याचे सांगताना भारतीय संस्कृतीच्या अधिष्ठानामुळेच रामायण व महाभारत यांवर आधारित धारावाहिक सर्वाधिक चालल्या, असे राज्यपालांनी सांगितले. स्वामी विवेकानंद यांचे शिकागो येथील भाषण तसेच आज जगभर मान्यता पावलेला भारतीय योग देशाच्या सांस्कतिक संपदेचे द्योतक असल्याचे राज्यपालांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंह यांचे जीवनकार्य प्रेरणादायी असून ते चित्रपटांच्या माध्यमातून जगापुढे यावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

            भारतीय कथानक जगभर पोहोचविण्यासाठी युवकांना तंत्र सक्षम करावे : शेखर कपूर

        आज अमेरिकेतील 90 टक्के युवक सिनेमा किंवा इतर आभासी व्यासपीठांवरील निर्मिती पाहत नसून ते गेमिंग तसेच युट्युबवर निर्मित खासगी कथानक पाहत असल्याचे नमूद करून जगातील मोठा युवा देश असलेल्या भारताकरीता सध्याचा काळ ही आपले कथानक जगभर पोहोचविण्याची सुवर्ण संधी आहे, असे शेखर कपूर यांनी यावेळी सांगितले. युवकांमधील सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी त्यांना तंत्रज्ञान सक्षम करणे आवश्यक असल्याचे शेखर कपूर यांनी यावेळी सांगितले. भारताकडे जगाला सांगण्यासाठी फार मोठे कथानक असून त्याच्या प्रचार प्रसारासाठी आपण मार्ग शोधले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 

            डॉ. विनय सहस्रबुद्धे तसेच डॉ. दिशान कामदार यांनी चर्चासत्राच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.

     चर्चासत्रामध्ये सिनेमातील वसाहतवाद : पाश्चात्यांच्या नजरेतून जागतिक व भारतीय सिनेमा, भारताचा मूलभूत विचार आणि चित्रपटाचे माध्यम, भारतीय सिने संगीतावर जागतिक परिणाम व लता मंगेशकर यांची गाणी या विषयांवर सत्र होणार आहेत. चर्चासत्राचा समारोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत बुधवारी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.        


 

‘टॉनिक’ नावाच्या औषधाची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी ०२)

१८ व्या शतकाच्या अखेरपर्यंत ब्रिटिशांनी जवळजवळ संपूर्ण भारतावर सत्ता प्रस्थापित केली होती. शेवटची काही राज्ये उरली होती. त्यात मराठ्यांचे राज्य होते, शिवाय दक्षिणेत श्रीरंगपट्टनचा टिपू सुलतान ब्रिटिशांशी संघर्ष करत होता. मात्र, १७९९ साली ब्रिटिशांनी त्याचा पराभव केला आणि म्हैसूर राज्य ताब्यात घेतले. ब्रिटिश सैन्य या विजयाचा आनंद साजरा करत होते, पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण काही आठवड्यांमध्येच अनेक ब्रिटिश सैनिक, अधिकारी मलेरियामुळे आजारी पडू लागले.

तिथून एका औषधाची गोष्ट सुरू झाली. ते ‘कोरोना’वरील मात्रा म्हणून पुन्हा चर्चेत आले. ते भारतात कसे पोहोचले? त्याचीच ही रंजक कथा...

संपूर्ण कथा वाचण्यासाठी लिंक-

https://www.bhavatal.com/blog-det/11


भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून हर्षदा गरुड हिचे अभिनंदन वेटलिफ्टिंगमध्ये पटकावले सुवर्णपदक.

        मुंबई, दि.3 :- जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या पुण्याच्या हर्षदा गरुड हिचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. 

            मावळमधील (जि. पुणे) हर्षदाने ग्रीस- हेराकिलॉन येथील स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला आहे. या स्पर्धेत भारताने यापूर्वी असे सुवर्णपदक जिंकले नव्हते. त्यामुळे हर्षदाने भारताच्या आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरेल, अशी कामगिरी केली आहे. "महाराष्ट्र कन्ये"चा हा पराक्रम आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी हर्षदाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 


 

 आमदार अतुल भातखळकर यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने निधन...


उद्या बुधवारी कांदिवली येथे श्रद्धांजली सभा...

          आ. अतुल भातखळकर यांच्या मातोश्री श्रीमती शैलजा भातखळकर यांचे सोमवार, दिनांक 2 मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. उद्या बुधवारी सायं 5 ते 7 दरम्यान कनकश्री सभागृहामध्ये श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्थळ : कनकश्री हॉल, चक्रवर्ती अशोक रोड, अशोक नगर, कांदिवली पूर्व, मुंबई.

वेळ : बुधवार, दिनांक 4 मे 2022 रोजी सायंकाळी 5.00 ते 7.00


 







 

Featured post

Lakshvedhi