Thursday, 10 March 2022

 मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे होळीपूर्वी भरावे

- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

            मुंबई, दि. 9 : होळीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे होळीपूर्वीच भरा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत.

            मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची सद्यस्थिती तसेच होळीनिमित्त वाढणारी रहदारी व त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांच्या संदर्भात विधान भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड.अनिल परब, रायगडच्या पालकमंत्री कु. अदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव नवघरे, मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग श्री.शेलार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोकण विभागाचे मुख्य अभियंता राजभोज आदी उपस्थित होते. महामार्ग सुरक्षा विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल, कोकणचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे, तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते.

            राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होळीनिमित्त मुंबई-गोवा महामार्गावर वाढणाऱ्या वाहतुकीच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित झाला होता. याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करण्याची घोषणा अशोक चव्हाण यांनी विधान परिषदेत केली होती. त्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीमध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. या महामार्गावरील खड्डे होळीपूर्वी भरण्याचे तसेच निर्माणाधीन पूल व रस्त्यांच्या बाजूला असलेले वळण रस्ते सुस्थितीत आणण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी यावेळी दिले. होळी दरम्यान या महामार्गावर पोलीस विभागाचे अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करून वाहतुकीचे योग्य नियोजन केले जाईल, अशी माहिती कोकणचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी बैठकीत दिली.


००००

 मालमत्तांची विल्हेवाट लावून गुंतवणूकदारांना रक्कम वितरीत करणार


मुंडगावकर ज्वेलर्स फसवणूकप्रकरणी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांची माहिती.

            मुंबई, दि. 9 : अकोला येथील मुंडगावकर ज्वेलर्स, न्यू मुंडगावकर ज्वेलर्स, श्री.मुंडगावकर ज्वेलर्सच्या प्रोप्रायटर यांच्याकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना संरक्षीत केलेल्या मुंडगावकर कुटुंबातील व्यक्तिच्या स्थावर मालमत्तांची विल्हेवाट लावून त्यातून आलेली रक्कम वितरित करण्यात येईल, असे माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विधान परिषदेत लक्ष्यवेधी सूचनेवर उत्तर देताना सांगितले.

            राज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, व्याजाचे आमीष दाखवून फसवणूक केल्याच्या ४२७ तक्रारी दाखल झाल्या असून १६ कोटी रूपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी २ आरोपींची निष्पन्न झालेली स्थावर मालमत्ता संरक्षीत करण्यात आली आहे. तर उर्वरित जणांची मालमत्ता निष्पन्न करून त्यास संरक्षीत करण्यात येईल. या मालमत्तेच्या नियंत्रणासाठी राज्य शासनाच्या वतीने सक्षम प्राधिकारी नियुक्ती करण्यात येईल. त्यामार्फत या मालमत्तांची विल्हेवाट लावून आलेली रक्कम गुंतवणूकदारांना वितरित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

            विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी या चर्चेत सहभाग घेतला.

000

 वृत्त क्र. 772

विधानपरिषद लक्षवेधी दि. 9-3-2022-

शाळांच्या अनुदानप्रश्नी सभापतींच्या दालनात बैठकीनंतर निर्णय

- शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

            मुंबई, दि. 9 : शाळांचे अनुदान, अघोषीत शाळांचा प्रश्न आणि शिक्षक-शिक्षकेतरांच्या प्रश्नासंदर्भात सभापतींच्या दालनात बैठक घेण्याची सूचना सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली. लक्षवेधी सूचनेवर सभापतींनी दिलेल्या निर्देशानुसार सदस्यांनी आपले म्हणणे मांडल्यानंतर त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना सांगितले.

            राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले, राज्यातील शाळांच्या अनुदानाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. शाळांना वेळेत अनुदान देण्याबाबत एकसुत्रीपणा आणण्यावर भर आहे. याबाबतीत झालेल्या वेगवेगळ्या निर्णयांचे एकत्रिकीकरण करून हे प्रश्न निश्चित कालावधीत सोडविले पाहिजेत, याकडे आपण लक्ष देऊ. सभापतींच्या सूचनेनुसार त्यांच्या दालनात बैठक घेऊन त्यात सदस्यांनी आपली मते मांडली तर त्यावर निर्णय घेण्यात सुलभता येईल, असेही ते म्हणाले.

            या चर्चेत विधान परिषद सदस्य जयंत आसगांवकर, ड़ॉ. सुधीर तांबे, अभिजित वंजारी, विक्रम काळे, जयंत पाटील आदींनी सहभाग घेतला होता.

 जलसंपदा विभागाच्या नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांसंदर्भात आढावा बैठक.

· कालबद्ध कार्यक्रम आखण्याच्या सूचना.

            मुंबई दि. 9 : जलसंपदा विभागाच्या नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या समस्या मार्गी लावून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या आहेत. जलसंपदा विभागाच्या नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आढावा बैठक झाली.

            या बैठकीत नांदेड जिल्ह्यातील रेणापूर प्रकल्प, पिंपळढव साठवण तलाव, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांच्या कालवा दुरुस्तीचे काम, पैनगंगा नदीवरील उच्च पातळी बंधाऱ्यांना प्रकल्पांचा भाग म्हणून मान्यता देणे, लेंडी प्रकल्पाच्या स्वेच्छा पुनर्वसनाचा शासन निर्णय निर्गमित करणे, बाभळी बंधारा गेटच्या संचलनाबाबत तेलंगणा राज्याशी चर्चा करणे व जलसंपदा विभागाच्या जागा शासकीय कामासाठी हस्तांतर करण्यासाठी मंजुरी देणे, अशा विविध कामांबाबत विस्तृत चर्चा झाली. विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणी संदर्भात कालबद्ध कार्यक्रम आखून सर्व प्रकल्प कालमर्यादेत सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी दिल्या.

            बैठकीस आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार माधवराव जवळगावकर, आमदार शामसुंदर शिंदे, जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत, विशेष कार्य अधिकारी विजयकुमार गौतम, सहसचिव अतुल कपोले, सहसचिव र. रा. शुक्ला, उपसचिव वैजनाथ चिल्ले, जया पोतदार, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक के. बी. कुलकर्णी, औरंगाबाद मुख्य अभियंता जयंत गवळी आदी उपस्थित होते.

***



 शेतपिकांच्या नुकसान भरपाई करिता 125 कोटी रूपये निधी वितरीत.

-मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार.

          मुंबई,दि. 9 :- जुलै, 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत 3 ऑगस्ट 2021 रोजी घेतलेल्या मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार 125 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

        जुलै ते ऑक्टोबर, 2021 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतीपिकांकरीता वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्य निधीमधून जुलै,2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधित नागरिकांना निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.जुलै,2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात उद्‌भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीकरिता बाधित नागरिकांना मदतीचे वाटप करण्याकरिता वाढीव दराने राज्य निधीमधून एकूण रु. 12507.01 लाख (अक्षरी रुपये एकशे पंचवीस कोटी सात लाख एक हजार फक्त) निधी विभागीय आयुक्त यांचेमार्फत जिल्ह्यांना वितरीत करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे.याबाबतचा शासन निर्णय 07 मार्च 2022 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

*****



 

Wednesday, 9 March 2022

 युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही

- वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख

· एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी नवे धोरण निश्चित करणार

            मुंबई दि 9 : युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या २५० विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रमासाठी उपाययोजना तसेच त्यांना भारतीय विद्यापीठांत सामावून घेण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्यात येणार आहे. कुलगुरुच्या अभ्यासगटांची व्याप्ती वाढवून सकारात्मक दृष्टीने सर्व बाबींची तपासणी करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले. कोणत्याही परिस्थितीत युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

            विधान भवन येथे युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आमदार डॉ. मनिषा कायंदे, आमदार धीरज देशमुख, विभागाचे सचिव सौरभ विजय, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ माधुरी कानिटकर, रूस एज्युकेशनचे उपाध्यक्ष लिंकन अमेरिकन विद्यापीठाचे कुलगुरू पवन कपूर, महाराष्ट्र वैद्यकिय परिषदेचे डॉ एस एस उत्तुरे आणि खाजगी विद्यापीठांचे प्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

            विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती पाहता त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.

            युक्रेनमध्ये ३३ विद्यापीठे वैद्यकिय शिक्षण देत आहेत, १८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, दोन हजार विद्यार्थी हे केवळ महाराष्ट्राचे आहेत. आपल्या देशात वैद्यकिय शिक्षण घेण्यासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परिक्षा घेण्यात येते. मात्र, रशिया आणि युक्रेनमध्ये ही परिक्षा न देता प्रवेश मिळतो. तसेच, शैक्षणिक शुल्कही भारतातील शुल्कापेक्षा कमी आकारले जाते. या विद्यार्थ्यांना भारतातील विद्यापीठात सामावून घेण्यासाठी पुन्हा परीक्षा देणे गरजेचे आहे. अथवा अन्य उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत कुलगुरू डॉ माधुरी कानिटकर यांनी सादरीकरणादरम्यान सांगितले.

            वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री देशमुख म्हणाले, रशिया आणि युक्रेन देशा शेजारील ७ ते ८ देशांतही अभ्यासक्रम सारखाच असल्याने इतर देशांसोबत सामंजस्याने या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल का याबाबत चर्चा करण्याचा प्रस्ताव केंद्राला सादर करण्यात येईल. भारतात पुन्हा येणा-या विद्यार्थ्यांना (नीट) सामायिक प्रवेश परीक्षा देण्यासही मानसिकरित्या तयार करावे लागेल. याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने युक्रेन शासन शिक्षण देईल का यासंदर्भातही विचार करावा लागेल.

            जे शिक्षण पूर्ण करून आंतरवासिता करीत आहेत त्यांना आधी काम द्यावे. जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना येथील विद्यापीठात वर्ग, प्रयोगशाळा, ग्रंथालय वापरासाठी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येईल त्यासाठी संबंधित देशाच्या विद्यापीठाशी चर्चा करण्यात येईल. कुलगुरूंचा जो अभ्यासगट नेमला आहे. त्यांनी या सूचनांचा अभ्यासासाठी अंतर्भाव करावा व अहवाल महिनाभरात सादर करावा. जेणेकरून शासनास धोरणनिश्च‍ितीसाठी त्याचा उपयोग होईल. असेही मंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितले.

०००


 तौक्ते’ चक्रीवादळामुळे पडझड झालेल्या प्राथमिक

शाळांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी ९३ लाख मंजूर

- विजय वडेट्टीवार.

             मुंबई, दि.०९ : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सागरी किनारपट्टी तसेच राज्यातील काही जिल्ह्यात पडझड झालेल्या प्राथमिक शाळांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी एकूण रु. 12 कोटी 93 (बारा कोटी त्र्यान्नव लक्ष फक्त) रुपये एवढा निधी वितरीत करण्यात आला आहे अशी माहिती, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

            दि. 16 व 17 मे, 2021 रोजी झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सागरी किनारपट्टी क्षेत्रात तसेच राज्याच्या काही भागात जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांच्या इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.शालेय शिक्षण विभागाकडून याबाबत सविस्तर प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्यानुसार जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांच्या इमारतींच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी 12 कोटी 93 लक्ष रुपये निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मार्गदर्शक तत्वानुसार विभागीय आयुक्तांमार्फत संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरीत करण्यात आला आहे. याबाबतचा शासननिर्णय दिनांक‍ ७ मार्च २०२२ रोजी महसूल व वन विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे.

            रायगड जिल्ह्यातील ४९२ शाळांसाठी ७ कोटी ३८ लाख, ठाणे जिल्हयातील ७० शाळांसाठी ७३ लाख, रत्नागिरी जिल्ह्यातील २६८ शाळांसाठी १ कोटी १६ लाख, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २०९ शाळांसाठी ५८ लाख, पालघर जिल्ह्यातील १६४ शाळांसाठी १ कोटी २० लाख,पुणे जिल्ह्यातील २२ शाळांसाठी २४ लाख,सातारा जिल्ह्यातील २६ शाळांसाठी २६ लाख, कोल्हापूर जिल्ह्यातील ३२ शाळांसाठी ६४ लाख,नंदूरबार जिल्ह्यातील १० शाळांसाठी ४ लाख,नाशिक जिल्ह्यातील ६१ शाळांसाठी ६४ लाख,धुळे जिल्ह्यातील २ शाळांसाठी २ लाख रुपये असे एकूण रु. 12 कोटी 93 लक्ष 24 हजार (अक्षरी बारा कोटी त्र्यान्नव लक्ष चोवीस हजार फक्त) रुपये निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मार्गदर्शक तत्वानुसार वितरीत करण्यात आला आहे.

*****

Featured post

Lakshvedhi