Thursday, 2 December 2021

 




 कोव्हिड-19 आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास

सानुग्रह सहाय्यसंदर्भात अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ विकसित

            मुंबई, दि. 1 : कोव्हिड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. 50,000/- इतके सानुग्रह सहाय्य देण्यात बाबत सर्वोच्च न्यायालयाने दि. 04.10.2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय (क्र.सीएलएस/2021/प्र.क्र.254/म-3, दि. 26.11.2021) प्रसारीत केला आहे.

            या शासन निर्णयाच्या अनुषंगाने Online web portal विकसित करण्यात आले असून, याद्वारे कोव्हिड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in यावर लॉगिन करणे आवश्यक राहील. तसेच यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर देखील लिंक देण्यात आली आहे.

            अर्जदारास, त्याच्या आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल. केंद्र शासनाकडे ज्यांच्या कोव्हिड-19 मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. इतर प्रकरणी, कोव्हिड-19 मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोव्हिड-19 मुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ठ्यर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील.

            जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास शासन निर्णय क्र. सार्वजनिक आरोग्य विभाग, न्यायिक-2021/प्र.क्र.488/आरोग्य-05, दिनांक 13 ऑक्टोबर, 2021 अन्वये जिल्हास्तर/महानगरपालिका स्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय देण्याचे अधिकार असतील.

            अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील.

            सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज 7 दिवसांकरिता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील, जेणेकरुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे याकरिता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल.

            जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेटरित्या जमा करण्यात येणार आहे.

 ‘माविम’ संचलित बचतगटांचे महासंघ देशपातळीवर अव्वल

· ठाणे जिल्ह्यातील आनगाव येथील क्रांतीज्योती सीएमआरसीला देशपातळीवरील प्रथम पुरस्कार

· विभाग पातळीवर उत्कर्ष सीएमआरसी गोंदिया आणि तेजस्विनी सीएमआरसी भंडारा अनुक्रमे द्वितीय आणि तृतीya

            मुंबई, दि. 1 : नाबार्ड आणि महिला अभिवृध्दी सोसायटी, आंध्रप्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील बचत गटांच्या महासंघांसाठी झालेल्या सर्वंकष मूल्यमापनात महाराष्ट्रातील महिला विकासाची शिखरसंस्था असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळ, (माविम) संचालित बचतगटांच्या महासंघाने अव्वल स्थान पटकावले आहे.

            नाबार्डचे अध्यक्ष श्री.जी आर चिन्ताला आणि मुख्य महाव्यवस्थापक श्रीमती विजयालक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत हैद्राबाद येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यशाळेत ‘माविम’च्या ठाणे जिल्ह्यातील क्रांतीज्योती सीएमआरसी आनगावला एक लाख रू.रकमेच्या रोख पारितोषिकासह देशभरातून प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आले. तर विभाग पातळीवर ‘माविम’च्या उत्कर्ष सीएमआरसी गोंदिया आणि तेजस्विनी सीएमआरसी भंडारा यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावत ‘माविम’च्या सातत्यपूर्ण यशात उल्लेखनिय भर टाकली. या पुरस्‍काराची रक्‍कम प्रत्येकी रु. २०,०००/- आहे. भारतातील पात्र 120 हून अधिक SHG महासंघांपैकी 13 महासंघांची निवड करण्यात आली.

            यावेळी ''व्हीजन 2030'' अंतर्गत भारतातील बचत गट व बचतगटांच्या महासंघांचे पुनरूज्जीवन या विषयावर झालेल्या परिसंवादात ‘माविम’च्या महाव्यवस्थापक श्रीमती कुसूम बाळसराफ यांनी माविमसह महासंघांची भविष्यकालीन उपयुक्तता यावरही प्रकाश टाकला.

            या कार्यक्रमासाठी व पुरस्कार स्विकारण्यासाठी क्रांतीज्‍योती लोकसंचलित साधनकेंद्र, आनगावचे अध्‍यक्ष सौ शुभांगी शशिकांत जाधव, सौ अंजली कमलाकर ठाकरे – खजिनदार, श्रीमती - अरुणा विजय गायकवाड – व्यवस्थापक, गोंदिया जिल्‍ह्यातील उत्‍कर्ष लोकसंचलित साधन केंद्राचे श्रीमती मोनीता राणे, व्यवस्थापक व श्रीमती तुलसी चौधरी अध्यक्षा व भंडारा जिल्‍ह्यातील तेजस्विनी लोकसं‍चलित साधनकेंद्राचे श्रीमती भारती झंझाड – अध्यक्षा, श्रीमती वनमाला बावनकुळे – व्यवस्थापक हे प्रतिनिधी उपस्थित होते.

            श्रीमती कुसुम बाळसराफ, महाव्‍यवस्‍थापक (प्रकल्‍प), माविम यांनी पॅनलिस्ट म्हणून सहभाग घेतला. श्रीमती शितल लाड, विकास अधिकारी व श्रीमती अस्मिता मोहिते, जिल्‍हा समन्‍वय अधिकारी, ठाणे ह्या या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

            देशपातळीवरील ‘माविम’च्या या अभूतपूर्व यशाबद्दल ‘माविम’ अध्यक्ष श्रीमती ज्योती ठाकरे यांच्यासह माविम टीमवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


००००




 

Wednesday, 1 December 2021

 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२०

राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर

          मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ४ सप्टेंबर, २०२१ रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२० घेण्यात आली होती. प्रस्तुत परीक्षेमधून राज्य कर निरीक्षक संवर्गासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल दिनांक १ डिसेंबर, २०२१ रोजी जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत संवर्गाकरीता पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

            परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.

          आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. मुख्य परीक्षेचा संयुक्त पेपर क्रमांक १ दिनांक २२ जानेवारी, २०२२ व पेपर क्र. २ दिनांक १२ फेब्रुवारी, २०२२ रोजी घेण्यात येईल.

           परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या/समांतर आरक्षणाच्या मुद्यांसंदर्भात विविध न्यायालयात/ न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

           पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (SMS) कळविण्यात येईल.

          मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरीता स्वीकारार्ह ठरतील.

0000000

 महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२०

सहायक कक्ष अधिकारी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर

          मुंबई दि. 1 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ४ सप्टेंबर, २०२१ रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० घेण्यात आली होती. प्रस्तुत परीक्षेमधून सहायक कक्ष अधिकारी पदासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून सहायक कक्ष अधिकारी (मुख्य)परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत पदाकरीता पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

          पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.

          आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. मुख्य परीक्षेचा संयुक्त पेपर क्रमांक १ दिनांक २२ जानेवारी, २०२२ व पेपर क्र. २ दिनांक ५ फेब्रुवारी, २०२२ रोजी घेण्यात येईल.

          परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या/समांतर आरक्षणाच्या मुद्यांसंदर्भात विविध न्यायालयात / न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

           पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (SMS) कळविण्यात येईल.

           मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरीता स्वीकारार्ह ठरतील.

0000


 


 

 महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान

कोविड नियमांचे काटेकोर पालन व्हावे

- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे         

            मुंबई, दि. १ : एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशनद्वारे येत्या २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. या स्पर्धेच्या तयारीचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. या स्पर्धेत आशिया खंडातील १२ देशांचे संघ सहभागी होत असून स्पर्धा कालावधीत कोविड नियमांचे काटेकोर पालन व्हावे, असे निर्देश त्यांनी दिले.

            मुंबई फुटबॉल अरेना, नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियम आणि पुणे येथील शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे होणाऱ्या या स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत, त्यामुळे स्पर्धेचे आयोजन दर्जेदार व्हावे, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, सर्व संबंधितांची नियमित तपासणी करावी, असे निर्देश श्री. ठाकरे यांनी यावेळी दिले. स्पर्धा कालावधीत संबंधितांची राहण्याची सोय उत्तम असावी, त्यांचा प्रवास कमीत कमी व्हावा, सरावाची सुविधा, प्रसिद्धी आदी बाबींचाही आढावा घेऊन क्रीडांगण परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

            या बैठकीस मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया (ऑनलाईन), मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) सत्य नारायण, स्पर्धेचे प्रकल्प संचालक अंकुश अरोरा, नंदिनी अरोरा, क्रीडा विभागाच्या उपसचिव स्वाती नानल आदी उपस्थित होते.


00000



 

Featured post

Lakshvedhi