Wednesday, 1 December 2021

 महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान

कोविड नियमांचे काटेकोर पालन व्हावे

- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे         

            मुंबई, दि. १ : एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशनद्वारे येत्या २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. या स्पर्धेच्या तयारीचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. या स्पर्धेत आशिया खंडातील १२ देशांचे संघ सहभागी होत असून स्पर्धा कालावधीत कोविड नियमांचे काटेकोर पालन व्हावे, असे निर्देश त्यांनी दिले.

            मुंबई फुटबॉल अरेना, नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियम आणि पुणे येथील शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे होणाऱ्या या स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत, त्यामुळे स्पर्धेचे आयोजन दर्जेदार व्हावे, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, सर्व संबंधितांची नियमित तपासणी करावी, असे निर्देश श्री. ठाकरे यांनी यावेळी दिले. स्पर्धा कालावधीत संबंधितांची राहण्याची सोय उत्तम असावी, त्यांचा प्रवास कमीत कमी व्हावा, सरावाची सुविधा, प्रसिद्धी आदी बाबींचाही आढावा घेऊन क्रीडांगण परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

            या बैठकीस मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया (ऑनलाईन), मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) सत्य नारायण, स्पर्धेचे प्रकल्प संचालक अंकुश अरोरा, नंदिनी अरोरा, क्रीडा विभागाच्या उपसचिव स्वाती नानल आदी उपस्थित होते.


00000



 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi