Tuesday, 30 November 2021

 स्पेनच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट;

शैक्षणिक, सांस्कृतिक सहकार्य, पर्यटन वाढविण्याबाबत चर्चा

            मुंबई, दि. 29 : स्पेनचे भारतातील नवनियुक्त राजदूत जोस मारिया रिदाओ डॉमिन्गेझ यांनी सोमवारी (दि. २९) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली.

            स्पेन आणि भारतामध्ये व्यापारासह शैक्षणिक, सांस्कृतिक व पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढविण्याबद्दल आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

            जगभरात स्पॅनिश भाषा बोलणाऱ्यांची संख्या ५०० दशलक्ष इतकी असून भारतात देखील स्पॅनिश भाषा शिकण्याकडे युवकांचा कल वाढत असल्याचे जोस मारिया यांनी सांगितले. 

            स्पेनमध्ये मोठा भारतीय समुदाय असून भारतातून स्पेनमध्ये अधिक पर्यटक यावे तसेच स्पेनमधून देखील भारतात अधिक पर्यटक यावे यासाठी आपण प्रयत्न करू असे राजदूतांनी सांगितले.

            महाराष्ट्रात अजिंठा वेरूळ लेणी यांसह अनेक जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे असून स्पॅनिश पर्यटकांना महाराष्ट्रात येऊन खचितच आनंद होईल असे राज्यपालांनी सांगितले. मात्र त्या दृष्टीने मुंबई - माद्रिद थेट विमानसेवा सुरु झाल्यास पर्यटनाला अधिक चालना मिळेल असे त्यांनी सांगितले.

            यावेळी स्पेनचे मुंबईतील वाणिज्यदूत फर्नांडो हेरेडिया उपस्थित होते.


**

Spanish Ambassador to India calls on Governor Koshyari; calls for enhancing educational, cultural and tourism cooperation

       The newly appointed Ambassador of Spain to India Jose Maria Ridao Dominguez called on Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai on Monday (29th Nov).

      The Ambassador told the Governor that Spain is keen to enhance business and economic cooperation with India while promoting more cultural, educational and tourism exchanges. The Ambassador said there are 500 Spanish speakers worldwide and that a large number of Indian youths are learning Spanish.

      The Governor told the Ambassador that Maharashtra has many sites of world heritage such as Ajanta and Ellora Caves that might interest Spanish travelers. He called for starting direct air connectivity between Mumbai and Madrid to facilitate tourism and people to people exchanges.


      The Consul General of Spain in Mumbai Fernando Heredia was also present.


0000




 जलसंवर्धन योजनेतून 7 हजारांहून अधिक प्रकल्पांची दुरुस्ती

•      1 हजार 341 कोटी रुपयांचा आराखडा तयार

 

       मुंबईदि. 29 : मृद व जलसंधारण विभागामार्फत मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 7 हजार 916 जलसंधारण प्रकल्पांची दुरुस्ती करण्यात येणार असून यासाठी 1 हजार 341 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

            मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना अंतर्गत मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील 0 ते 100 हेक्टर101 ते 250 हेक्टर आणि 251 ते 600 हेक्टर या सिंचन क्षमतेच्या एकूण 90 हजार योजनांपैकी अतिधोकादायकधोकादायक व दुरुस्तीयोग्य असलेल्या सुमारे 16 हजार जलसंधारण प्रकल्पांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे प्रकल्पांची दुरुस्ती करून मूळ पाणी साठवण क्षमता व सिंचन क्षमता पुनर्स्थापित करणे असे आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेतील 7 हजार 916 प्रकल्पांच्या दुरुस्तीकरिता 1 हजार 341 कोटी रुपयांचा आराखडा करण्यात आला आहे. यानुसार सर्व प्रकल्पांच्या दुरुस्तीची विशेष मोहीम सन 2020-212021-22 आणि 2022-23 अशा तीन वर्षात करण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामाला गती देऊन आतापर्यंत या विभागाने गेल्या दोन वर्षात 306 कोटी रुपयांच्या 1 हजार 405 योजनांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.

            जलसंधारण विभागजलसंपदापाणीपुरवठा व स्वच्छता विभाग कृषी विभाग आणि सर्व जिल्हा परिषद यांच्याकडील 16 हजार नादुरुस्त प्रकल्पांची दुरुस्ती करण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाकडून विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे. आजपर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून राज्यांत ० ते ६०० हेक्टर सिंचन क्षमतेचे अनेक प्रकल्प निर्माण केले गेले परंतु किरकोळ देखभाल दुरुस्तीअभावी यांची दुरावस्था झालेली आहे. या सर्व प्रकल्पांच्या दुरुस्तीमुळे 8 लाखांहून अधिक टी.सी.एम पाणीसाठा पुनर्स्थापित होणार आहे.

0000




 

Kokan aplech aasa

 *मेरे कणकण में कोकण समाया मितवा*


माझं जन्म गाव, शिक्षण सगळं सांगली जिल्ह्यातील आहे. पण माझी कर्मभूमी रत्नागिरी कोकण आहे.. जन्मभूमी म्हणून ओढ आहे, पण मी कोकण शिवाय जगू शकत नाही... मी रत्नागिरी शिवाय राहू शकत नाही... कारण, कारणं तर खूप आहेत..


कोकणात सगळ्या चालीरीती आहेत ना त्या सगळ्या मानवाला खुश ठेवणाऱ्या आहेत, जगण्याचा सोहळा करणाऱ्या आहेत...

इथला बाप कधी हुंडा देत नाही, अन हुंडा घेत नाही... त्यामुळे मुलीला जन्म देण्यापूर्वी तपासणी करत नाही.. जन्माला येईल ते अपत्य तेवढ्याच प्रेमाने वाढवतो...


इथं मुलींना सासुरवास नसतो, सून नोकरी करणारी असेल तर, सासू तिच्या हातात डबा तयार करून देते, किंवा सासरे डबा पोचवायला ऑफिस मध्ये येतात हे मी स्वतः पाहिले आहे...


इथली लोकं खूप कष्टाळू आहेत, एक ग्लास तांदुळाच्या पिठीची 20 भर आंबोळ्या टाकून घर जेवू घालते इथली बाई..


फणसाच्या अठीळा शिजवून प्रोटीन देते सगळ्या घराला..

इथला शेतकरी, रस्त्यावर दूध ओतणार नाही, निषेध म्हणून ते दूध गावभर फुकट पोहचवून येईल!

आंब्याचं नुकसान झालं तर रस्त्यावर आंबे नाही फेकणार.. त्याला अन्न म्हणजे पूर्णब्रह्म आहे हे माहीत आहे!


पुरात, वादळात नष्ट झालीत झाडं.. वीजेच्या तारा तुटल्याने महिना महिनाभर वीज नव्हती... पण, आरडाओरडा न करता, एकमेकांना श्रमदानातून नवीन झाडांची लागवड केली...


एकदा पीक गेलं की शेतकऱ्यांचं एक वर्षाचं नुकसान होतं.. पण, इथं वादळात, 60-70 वर्षांची झाडं उन्मळून पडली, तरीही चिकाटीने नवीन बाग रोवली... 


मागच्या वादळातली बाब.. कोरोनामुळे वाहतुकीवर निर्बंध होते, वादळामुळे सगळं ठप्प... मनात विचार केला, की याच जनतेने दिलेल्या महसूल करामधून दरमहा पगार मिळतो, त्यातला थोडा भाग त्यांच्यासाठी देऊ! मग आम्ही ZP तल्या कर्मचाऱ्यांनी/अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एका रात्रीत 2.50 लाख रुपये वर्गणी जमा केली, अन त्या लोकांपर्यंत पोचलो अन त्यावेळी त्यांच्या मनातलं जाणलं, हृदय जाणलं!

त्यांचं म्हणणं एकच,"माझ्या पणजोबाची बाग, त्यांनी लावली म्हणून मी खाल्ली, आता मी लावली तर माझे वारस खातील..."


इथं मुलगा मुलगी भेदच नाही, पोरापोरींना समान न्याय आहे... मुलीने प्रेम प्रकरण केले तर खानदान की इज्जत जाते वगैरे असे प्रकार इथे फारसे दिसत नाहीत! पोराने परजातीतील मुलीशी लग्न केलं म्हणून त्याचं तोंड आयुष्यभर बघणार नाही, असली फालतू कट्टरता इथं नाही...


आपलीच पोरं म्हणून आईवडील पोसतात...

बारीकसारीक भांडणावरून कोर्टात जातील पण, खून पडणार नाहीत...


कायद्यावर, प्रशासनावर खूप विश्वास आहे इथल्या लोकांचा... नियमात वागतील अन नियमात काम करून घेतील...


जीव लावणे, घासातला घास देणे कोकणात शिकावे..

इथं मी कामानिमित्त रात्री 3 वाजता सुध्दा एकटी फिरले आहे, अजिबात भीती वाटत नाही.. 


इथं स्त्रीचा खूप सन्मान राखला जातो.. 

मी स्वतः पाहिलंय, एका माणसाचे दुकानातून घेतलेले गहू, रस्त्यावर सांडले.. तर लोकांनी त्यावर गाड्या न घालता, 3-4 जण गाडी थांबवून उतरून गहू जमा करून भरून दिले!

आम्ही सरकारी कर्मचारी सुध्दा, आपण या जनते साठी आहोत याची जाण ठेवून लोकाभिमुख काम करतो!

सरकारी कर्मचाऱ्यांना किलोभर तांदूळ, 4 आंबे, 2 नारळ, कुळीथ.. ही प्रेमाने दिलेली भेट इथं मिळते... त्यात गरिबांचे प्रेम असते..

भाऊंनो, बाईंनो अशी प्रेमाने हाक असते..


मी 18 वर्षे कोकणात एकटी, माझं लहान मूल घेऊन राहिले, मूलगा आता 21 वर्षाचा आहे... पण, मला कधी इथं असुरक्षित वाटलं नाही...


माझे शेजारी अन माझे कार्यालयातले सहकारी यांनी माझी कधीही अडचण निर्माण होऊ दिली नाही...

मी आजारी असताना औषधे आणून देणे, मी बाहेर असेल तर माझ्या घरात दूध भाजी पोचवणे, गाडी बंद पडली तरी ती त्या स्पॉट वरून नेऊन परत घरापर्यंत आणून देणे... सगळं घरपोच सेवा देणे हे सगळं आपुलकीने करतात...

इथल्या माणसांच्यात निसर्गतःच प्रेम आहे..

खळाळत्या झऱ्यासारखं जगणं..

धो धो पावसासारखे प्रेम बरसणार..

हिरव्यागार डोंगर दऱ्या प्रमाणे काळीज हिरवंगार...

अथांग समुद्राप्रमाणे विशाल काळजाची माणसं...

फणसाचे गोड गरे, तशी गोड माणसं..

रातांबे जसे लाल, तशी रंगीत माणसं..

करवंद, जांभळे, तुरट गोड...

गणेशोत्सव, शिमग्याची गोष्टच न्यारी... माणसाला वर्षातून बेधुंद होऊन नाचणं हवं, त्यासाठी हे उत्सव..

एकमेकांना मदत करून जीवन जगतात इथली माणसं...


अन मग... मी पण इथलीच झाले आहे... गावाहून येताना, साखरप्याच्या हद्दीत गाडी आली की माझा श्वास मोकळा होतो..

हातखंबाच्या तिठ्यावरून रत्नागिरीत शिरलं की माझ्या कानात आपुलकीचं वारं भरतं

या मातीत मिसळून जायची तयारी आहे...


मी रिटायर्ड झाले तरी, जग फिरत राहीन पण जग फिरून पुन्हा कोकणातच येईन...

माझं घर आहे इथं...

प्रोमोशन झाले तरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मध्ये घेईन... पण कोकण नाही सोडणार.


(तळटीप: चांगलं वाईट सगळीकडे असतं, अपवादात्मक बाबी सगळीकडे असतात, पण कोकणात मी खूप सुखी आहे)


*©️प्रतिभा देशमुख, रत्नागिरी*

14/7/2021🌹🌹🌹

 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 100 टक्के लसीकरण आवश्यक--

पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी 

            मुंबई, दि. 29 : येत्या 1 डिसेंबर पासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. यासंदर्भातील शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

            शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण (दोन लसी) झालेल्यांनाच शाळा/ कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात यावा. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड-19 साठीची 48 तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी करावी. विद्यार्थ्यांचे नाक व तोंड मास्कने पूर्णत: झाकलेले असले पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना सातत्याने सांगावे. शाळेतील परिपाठ, स्नेह संमेलन व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अथवा स्पर्श होईल अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल. शिक्षक-पालक बैठका देखील शक्यतो ऑनलाईन घ्याव्यात. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक असणार आहे.

            शाळा सुरू झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजनांबाबत देखील विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार शाळेत व परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती राखावी. सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. यासाठी इच्छुक डॉक्टर पालकांची मदत घेण्यात यावी. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रांमध्ये भरविण्यात याव्यात. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांची दररोज थर्मल स्क्रिनिंग चाचणी घेण्यात यावी. सद्यस्थितीत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी वाहनचालक व मदतनीस यांचे 100 टक्के लसीकरण झालेले असावे. 

            उपरोक्त सूचनांव्यतिरिक्त स्थानिक परिस्थितीनुसार शाळांनी आवश्यक मार्गदर्शक तत्वे, सूचना निश्चित करावीत व प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच शासनाने कोविड-19 संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे देखील पालन करण्यात यावे, असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण : 2021/प्र.क्र.178/एसडी-6, दि. 29 नोव्हेंबर 2021 पहावे, असे आवाहन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

Featured post

Lakshvedhi