*मेरे कणकण में कोकण समाया मितवा*
माझं जन्म गाव, शिक्षण सगळं सांगली जिल्ह्यातील आहे. पण माझी कर्मभूमी रत्नागिरी कोकण आहे.. जन्मभूमी म्हणून ओढ आहे, पण मी कोकण शिवाय जगू शकत नाही... मी रत्नागिरी शिवाय राहू शकत नाही... कारण, कारणं तर खूप आहेत..
कोकणात सगळ्या चालीरीती आहेत ना त्या सगळ्या मानवाला खुश ठेवणाऱ्या आहेत, जगण्याचा सोहळा करणाऱ्या आहेत...
इथला बाप कधी हुंडा देत नाही, अन हुंडा घेत नाही... त्यामुळे मुलीला जन्म देण्यापूर्वी तपासणी करत नाही.. जन्माला येईल ते अपत्य तेवढ्याच प्रेमाने वाढवतो...
इथं मुलींना सासुरवास नसतो, सून नोकरी करणारी असेल तर, सासू तिच्या हातात डबा तयार करून देते, किंवा सासरे डबा पोचवायला ऑफिस मध्ये येतात हे मी स्वतः पाहिले आहे...
इथली लोकं खूप कष्टाळू आहेत, एक ग्लास तांदुळाच्या पिठीची 20 भर आंबोळ्या टाकून घर जेवू घालते इथली बाई..
फणसाच्या अठीळा शिजवून प्रोटीन देते सगळ्या घराला..
इथला शेतकरी, रस्त्यावर दूध ओतणार नाही, निषेध म्हणून ते दूध गावभर फुकट पोहचवून येईल!
आंब्याचं नुकसान झालं तर रस्त्यावर आंबे नाही फेकणार.. त्याला अन्न म्हणजे पूर्णब्रह्म आहे हे माहीत आहे!
पुरात, वादळात नष्ट झालीत झाडं.. वीजेच्या तारा तुटल्याने महिना महिनाभर वीज नव्हती... पण, आरडाओरडा न करता, एकमेकांना श्रमदानातून नवीन झाडांची लागवड केली...
एकदा पीक गेलं की शेतकऱ्यांचं एक वर्षाचं नुकसान होतं.. पण, इथं वादळात, 60-70 वर्षांची झाडं उन्मळून पडली, तरीही चिकाटीने नवीन बाग रोवली...
मागच्या वादळातली बाब.. कोरोनामुळे वाहतुकीवर निर्बंध होते, वादळामुळे सगळं ठप्प... मनात विचार केला, की याच जनतेने दिलेल्या महसूल करामधून दरमहा पगार मिळतो, त्यातला थोडा भाग त्यांच्यासाठी देऊ! मग आम्ही ZP तल्या कर्मचाऱ्यांनी/अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एका रात्रीत 2.50 लाख रुपये वर्गणी जमा केली, अन त्या लोकांपर्यंत पोचलो अन त्यावेळी त्यांच्या मनातलं जाणलं, हृदय जाणलं!
त्यांचं म्हणणं एकच,"माझ्या पणजोबाची बाग, त्यांनी लावली म्हणून मी खाल्ली, आता मी लावली तर माझे वारस खातील..."
इथं मुलगा मुलगी भेदच नाही, पोरापोरींना समान न्याय आहे... मुलीने प्रेम प्रकरण केले तर खानदान की इज्जत जाते वगैरे असे प्रकार इथे फारसे दिसत नाहीत! पोराने परजातीतील मुलीशी लग्न केलं म्हणून त्याचं तोंड आयुष्यभर बघणार नाही, असली फालतू कट्टरता इथं नाही...
आपलीच पोरं म्हणून आईवडील पोसतात...
बारीकसारीक भांडणावरून कोर्टात जातील पण, खून पडणार नाहीत...
कायद्यावर, प्रशासनावर खूप विश्वास आहे इथल्या लोकांचा... नियमात वागतील अन नियमात काम करून घेतील...
जीव लावणे, घासातला घास देणे कोकणात शिकावे..
इथं मी कामानिमित्त रात्री 3 वाजता सुध्दा एकटी फिरले आहे, अजिबात भीती वाटत नाही..
इथं स्त्रीचा खूप सन्मान राखला जातो..
मी स्वतः पाहिलंय, एका माणसाचे दुकानातून घेतलेले गहू, रस्त्यावर सांडले.. तर लोकांनी त्यावर गाड्या न घालता, 3-4 जण गाडी थांबवून उतरून गहू जमा करून भरून दिले!
आम्ही सरकारी कर्मचारी सुध्दा, आपण या जनते साठी आहोत याची जाण ठेवून लोकाभिमुख काम करतो!
सरकारी कर्मचाऱ्यांना किलोभर तांदूळ, 4 आंबे, 2 नारळ, कुळीथ.. ही प्रेमाने दिलेली भेट इथं मिळते... त्यात गरिबांचे प्रेम असते..
भाऊंनो, बाईंनो अशी प्रेमाने हाक असते..
मी 18 वर्षे कोकणात एकटी, माझं लहान मूल घेऊन राहिले, मूलगा आता 21 वर्षाचा आहे... पण, मला कधी इथं असुरक्षित वाटलं नाही...
माझे शेजारी अन माझे कार्यालयातले सहकारी यांनी माझी कधीही अडचण निर्माण होऊ दिली नाही...
मी आजारी असताना औषधे आणून देणे, मी बाहेर असेल तर माझ्या घरात दूध भाजी पोचवणे, गाडी बंद पडली तरी ती त्या स्पॉट वरून नेऊन परत घरापर्यंत आणून देणे... सगळं घरपोच सेवा देणे हे सगळं आपुलकीने करतात...
इथल्या माणसांच्यात निसर्गतःच प्रेम आहे..
खळाळत्या झऱ्यासारखं जगणं..
धो धो पावसासारखे प्रेम बरसणार..
हिरव्यागार डोंगर दऱ्या प्रमाणे काळीज हिरवंगार...
अथांग समुद्राप्रमाणे विशाल काळजाची माणसं...
फणसाचे गोड गरे, तशी गोड माणसं..
रातांबे जसे लाल, तशी रंगीत माणसं..
करवंद, जांभळे, तुरट गोड...
गणेशोत्सव, शिमग्याची गोष्टच न्यारी... माणसाला वर्षातून बेधुंद होऊन नाचणं हवं, त्यासाठी हे उत्सव..
एकमेकांना मदत करून जीवन जगतात इथली माणसं...
अन मग... मी पण इथलीच झाले आहे... गावाहून येताना, साखरप्याच्या हद्दीत गाडी आली की माझा श्वास मोकळा होतो..
हातखंबाच्या तिठ्यावरून रत्नागिरीत शिरलं की माझ्या कानात आपुलकीचं वारं भरतं
या मातीत मिसळून जायची तयारी आहे...
मी रिटायर्ड झाले तरी, जग फिरत राहीन पण जग फिरून पुन्हा कोकणातच येईन...
माझं घर आहे इथं...
प्रोमोशन झाले तरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मध्ये घेईन... पण कोकण नाही सोडणार.
(तळटीप: चांगलं वाईट सगळीकडे असतं, अपवादात्मक बाबी सगळीकडे असतात, पण कोकणात मी खूप सुखी आहे)
*©️प्रतिभा देशमुख, रत्नागिरी*
14/7/2021🌹🌹🌹
No comments:
Post a Comment