सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 10 November 2021
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहणार नाही याची दक्षता घ्या
- शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड
मुंबई, दि. 10 : केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत देशभरात शुक्रवार दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (National Achievement Survey) केले जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी निवडण्यात आलेल्या सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील तसेच सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले.
विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमधील संपादणूकीचे तसेच देशाच्या शिक्षण प्रक्रियेच्या आरोग्याचे मूल्यांकन करणे यासाठी होणाऱ्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाच्या अनुषंगाने प्रा.वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातील शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्राचार्य आणि संबंधितांची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रा.गायकवाड यांनी संबंधित शिक्षणाधिकारी, प्राचार्य यांच्याशी सर्वेक्षणाच्या तयारीबाबत संवाद साधला आणि आढावा घेऊन मार्गदर्शन केले.
या बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, राज्य प्रकल्प संचालक राहूल द्विवेदी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम.डी.सिंह, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महेश पालकर आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अपर मुख्य सचिव श्रीमती कृष्णा यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना सर्वेक्षणाबाबत मार्गदर्शन केले.
प्रारंभी श्री.सिंह यांनी राज्यात होणारे सर्वेक्षण आणि त्याअनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. राज्य शासनामार्फत शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशभरात एकाच वेळी होणार असल्याने ग्रामीण व शहरी भागात प्रस्तुत सर्वेक्षणासाठी निवडलेल्या सर्व व्यवस्थापन, माध्यमाच्या शाळांतील तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीचे वर्ग दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी सुरू राहतील. सदर सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळांतील संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच क्षेत्रीय अन्वेषक यांना या सर्वेक्षणाच्या प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या सर्वेक्षणासाठी राज्यातील इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या एकूण 7330 शाळांमधील 2 लाख 34 हजार 55 विद्यार्थ्यांची निवड केंद्र शासनामार्फत करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
०००००
डिजिटल काळातील शिक्षणाचे स्वरूप’ या विषयावर राजभवन येथे परिसंवाद संपन्न
आगामी काळात शिक्षणामध्ये ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतींचा मिलाफ असावा'
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई, दि. 10 : कोरोना काळात सर्वच नकारात्मक गोष्टी घडल्या असे नसून मुलांच्या शिक्षणात पालक अधिक लक्ष द्यायला लागले ही निश्चितच जमेची गोष्ट या काळात झाली आहे असे आपण मानतो. कोरोना नंतरच्या आगामी काळातील शिक्षणात ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाचा मिलाफ असावा. उभय पद्धतींचे मिश्र शिक्षण हाच शिक्षणाचा भावी मार्ग राहील, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
नवभारत टाइम्स वृत्तपत्रातर्फे राजभवन येथे 'डिजिटल काळातील शिक्षणाचे स्वरूप' या विषयावर मंगळवारी (दि. 9) एक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी राज्यपाल बोलत होते. परिसंवादाला विविध शिक्षण संस्थांचे मुख्याध्यापक, प्रशासक व विश्वस्त उपस्थित होते.
गरज हीच शोधाची जननी असते. ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यासाठी अनेक वर्षे समाजात अनुत्साह होता. मात्र कोरोना काळात सर्वांनी ऑनलाईन शिक्षणाचा अंगीकार केला. अर्थात, इंटरनेट सुविधा व स्मार्ट फोन सर्वांना उपलब्ध नसल्यामुळे काही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले. त्यामुळे वर्गखोलीत दिल्या जाणाऱ्या शिक्षणाला सध्या तरी पर्याय नाही असे मत राज्यपालांनी यावेळी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांचा एकाग्रता अवधी अतिशय कमी झालाय : तज्ज्ञांचे मत
ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे लाभ सर्वांनी पाहिले आहेत त्यामुळे ही पद्धती कायम राहणार आहे. मात्र विद्यार्थ्यांचा सामाजिक व भावनिक विकास, कला व क्रीडा अभ्यास तसेच प्रात्यक्षिक कार्यासाठी प्रत्यक्ष शाळेतील शिक्षण आवश्यक असल्याचे मत सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केले.
कोरोना काळात विद्यार्थ्यांचा एकाग्रता अवधी अतिशय कमी झाला असून विद्यार्थ्यांचे लक्ष गुंतवण्यासाठी शैक्षणिक सामग्री विद्यार्थ्यांच्या गरजेप्रमाणे विकसित करावी लागेल असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. सायबर सुरक्षा या विषयाकडे विशेष लक्ष द्यावे लागणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी विविध शिक्षण संस्थांना ‘शिक्षण योद्धा' पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाला नवभारत टाइम्सचे संपादक सुंदर चंद ठाकूर, लतिका शर्मा, धर्मेंद्र त्यागी, राहुल देशपांडे, सुमित मेहता प्रामुख्याने उपस्थित होते.
महानगरपालिका पोटनिवडणुकांसाठी
12 नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या
मुंबई, दि. 9 (रानिआ): विविध सहा महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
श्री. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 1 नोव्हेंबर 2021 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या पोटनिवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 17 नोव्हेंबर 2021 रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 22 नोव्हेंबर 2021 रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर 23 नोव्हेंबर 2021 रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती श्री. मदान यांनी दिली.
विविध महानगरपालिकानिहाय रिक्त पदे अशी: धुळे- 5ब, अहमदनगर- 9क, नांदेड-वाघाळा- 13अ, मीरा-भाईंदर- 10ड आणि 22अ, सांगली-मिरज-कुपवाड- 16अ आणि पनवेल- 15ड.
‘दिलखुलास' कार्यक्रमात मुंबई उपनगरच्या
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुलाखत
मुंबई, दि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास या कार्यक्रमात मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एअर' या ॲपवर बुधवार दि. १० आणि गुरुवार दि. ११ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.
मतदारांचे प्रकार, मतदार होण्यासाठी आवश्यक पात्रता, मतदार यादीत नाव नोंदवणे, वगळणे व दुरुस्ती, फॉर्म नंबर ६ सोबत आवश्यक असणारी कागदपत्रे, दावा अर्ज आणि आक्षेपांची पडताळणी, मतदारयादीमध्ये नोंदवलेल्या नावामध्ये मुद्रणदोष असल्यास तो दुरुस्त करण्यासाठीची पद्धती आदी विषयांची माहिती श्रीमती चौधरी यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे.
00000
पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या
श्रीधर चामरे यांच्या कुटुंबियांस राज्य सरकारकडून 5 लाखांचे सहाय्य
- मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती
मुंबई, दि. 9 : भारत-पाकिस्तान हद्दीजवळ मच्छिमार नौकेतून मासेमारी करीत असताना पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीकडून झालेल्या गोळीबारात मृत पावलेल्या श्रीधर चामरे (रा. वडराई जि. पालघर) यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.
गुजरात राज्यातील ओखा (जि. वेरावळ) येथील ‘जलपरी-४’ ही मच्छिमार नौका ७ खलाशांसह २५ ऑक्टोबर रोजी ओखा येथे मासेमारीसाठी गेली होती. भारत-पाकिस्तान हद्दीनजिक मासेमारी करीत असताना दि. ६ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीकडून झालेल्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील वडराई येथील श्रीधर रमेश चामरे हे मृत पावले तर अन्य एक खलाशी जखमी झाला. या घटनेत मृत पावलेल्या श्रीधर चामरे यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करुन त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. दरम्यान, ठाणे- पालघरच्या सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी श्रीधर चामरे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे.
००००
जवाहर बालभवनच्या नूतनीकरणाच्या कामास
तातडीने तांत्रिक मान्यता द्यावी
- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश
मुंबई, दि. 9 : मुंबईतील जवाहर बाल भवन इमारत जीर्ण झाली असून त्याचे नूतनीकरण आणि मजबुतीकरण करणे गरजेचे आहे. यासंबंधी कामाच्या अंदाजपत्रकास तातडीने तांत्रिक मान्यता देऊन पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मागील काही वर्षांपासून बाल भवनची इमारत जीर्ण झाली असून त्याचे तातडीने मजबुतीकरण आणि नूतनीकरण करणे गरजेचे असल्याने शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवघरे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते बाल भवन इमारतीचे उद्घाटन झाले होते. गेली 50 वर्षे विद्यार्थी आणि लहान मुलांसाठी शैक्षणिक साहित्य, करमणूक साधने, ग्रंथालय आदी माध्यमातून ही इमारत उपयोगी सिद्ध झाली आहे. येथे चित्रकलेसह विविध स्पर्धाही आयोजित केल्या जातात. या ऐतिहासिक इमारतीचा वारसा जतन करण्याच्या उद्देशाने या इमारतीच्या मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
००००
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...