सिकलसेल ॲनिमियाविरोधात ‘अरुणोदय’ जनजागृती मोहिमेनिमित्ताने
‘दिलखुलास’मध्ये डॉ. विजय कंदेवाड यांची मुलाखत
मुंबई, दि. 16: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष जनजागृती मोहीम' या विषयावर आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातील ही मुलाखत दि. 19 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत दररोज सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या राज्यातील सर्व केंद्रांवर प्रसारित होणार आहे. तसेच, ही मुलाखत ‘News on AIR’ या मोबाईल अॅपवरूनही ऐकता येणार आहे. निवेदिका उन्नती जगदाळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
आरोग्य विभागामार्फत 15 जानेवारी 2026 पासून सुरू झालेली ‘अरुणोदय’सिकलसेल ॲनिमिया विशेष जनजागृती मोहीम 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सिकलसेल ॲनिमियाचा प्रतिबंध, लवकर तपासणी आणि प्रभावी उपचार याबाबत समाजामध्ये व्यापक जनजागृती निर्माण करण्याचा शासनाचा संकल्प आहे. सिकलसेल ॲनिमिया हा एक अनुवंशिक रक्तविकार असून, त्याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आदिवासी व दुर्गम भागांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येतो. विवाहपूर्व सिकलसेल तपासणीचे महत्त्व, रुग्ण व वाहकांची ओळख, गर्भावस्थेतील तपासणी, तसेच शासनामार्फत उपलब्ध असलेल्या मोफत तपासणी व उपचार सुविधांविषयी सविस्तर माहिती दिली आहे. जनजागृतीच्या माध्यमातून सिकलसेल ॲनिमियाचा प्रसार रोखणे शक्य असून, या उद्दिष्टपूर्तीसाठी समाजातील प्रत्येक घटकाने ‘अरुणोदय’ मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून डॉ. कंदेवाड यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment