भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ‘शिर्डी कृती आराखड्या’ची
प्रभावी अंमलबजावणी करा
-मुख्य सचिव राजेश अग्रवाल
सिंहस्थ कुंभमेळा नियोजन आढावा बैठकीत आराखड्याचे सादरीकरण
शिर्डी, दि. १६ : नाशिक येथे २०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तयार केलेला ‘शिर्डी कृती आराखडा’ सर्वसमावेशक आहे. भाविकांची सुरक्षा, आरोग्य व वाहतूक नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य देऊन या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज येथे दिले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी शिर्डी येथे आयोजित बैठकीत मुख्य सचिव श्री. अग्रवाल बोलत होते.
बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सादरीकरणाद्वारे तयारीची सविस्तर माहिती सादर केली. नाशिक कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या एकूण भाविकांपैकी सुमारे २० ते २५ टक्के भाविक शिर्डी व शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. यामध्ये वाहतूक, पार्किंग, आरोग्य व आपत्ती व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला आहे. कुंभमेळा कालावधीत शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 'एकात्मिक वाहतूक आराखडा' तयार करण्यात आला आहे. त्यानुसार शहराबाहेर व मंदिरालगत सुमारे ९४ हेक्टर क्षेत्रावर ८ नवीन पार्किंग स्थळे निश्चित करण्यात आली असून, तेथे स्मार्ट पार्किंग व शटल बस सेवेचा समावेश असेल.
No comments:
Post a Comment