झरे हे स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आहेत. त्यामुळे त्यांचे पुनरूज्जीवन आणि संवर्धन करणे गरजेचे असून शासन, प्रशासनाबरोबर जनतेचीही ती सामूहिक जबाबदारी असल्याचे मत वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी व्यक्त केले.
प्रशिक्षणार्थींना झऱ्याचा संपूर्ण प्रवास समजावा यासाठी सातारा जिल्हयातील जावळी तालुक्यातील रानगेघर या गावातील तामकडा या झऱ्याचा ट्रान्झिट वॉक करण्यात आला. यामध्ये झऱ्याच्या पाण्याच्या उगम बिंदूपासून ते खाली वाहणाऱ्या प्रवाहापर्यंतचा नैसर्गिक प्रवास, पाणी जमिनीत मुरण्याची ठिकाणं, पाण्याचा प्रवाह, मार्ग, झऱ्याची सध्यस्थिती, आजूबाजूची भूगर्भीय व भौगोलिक माहिती, पाण्याची गुणवत्ता, स्प्रिंग बॉक्स, पाणलोट विकासाची कामे, मानवी हस्तक्षेप या सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष भेट देऊन अभ्यास करण्यात आला. यामध्ये ग्रामस्थांसोबत ॲक्वाडॅमचे मुकेश पाटील, मृत्युंजय विचारे, ग्रामपरीचे दिपक जाधव, विकास जाधव यांनी तांत्रिक माहितीसह मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणाची सुरुवात वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, ग्रामपरीच्या संचालक जयश्री राव व अर्चना राव यांच्या हस्ते जलपूजन करून करण्यात आले. एक्वाडॅमच्या भूवैज्ञानिकांनी महाराष्ट्रातील नैसर्गिक झऱ्यांची ओळख, नोंदणी, संरक्षण, पुनर्जीवन, पाण्याची सातत्यपूर्ण उपलब्धता तसेच लोकसहभागातून शाश्वत व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
झऱ्यांचे व्यवस्थापन या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने 50 मास्टर ट्रेनर्स तयार करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये झऱ्यांचे धोरण राबविताना हे ट्रेनर्स दिशादर्शक म्हणून काम करतील.
No comments:
Post a Comment