क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक
विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा, दि. ३: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नायगाव येथे उभे राहणारे स्मारक त्यांच्या कार्याची आठवण देईल, त्यामुळे लढण्याची प्रेरणा तर मिळेलच परंतु समाजातील विषमतेच्या विरोधात क्रांतीची बिजे तयार होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महिलांना अधिकार देण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी येथे उभ्या राहणाऱ्या महिला प्रशिक्षण केंद्रात आवश्यक सर्व प्रकारच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
नायगाव (ता. खंडाळा) येथे आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या १४३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे तसेच महिला प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नायगावच्या सरपंच स्वाती जमदाडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात आणि देशात स्त्री शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या, स्त्रीयांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक प्रेरणादायी ठरेल, अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अनिष्ट रुढीवादाच्या विरोधात क्रांतीचे रणशिंग फुंकले आणि समाजामध्ये समता प्रस्थापित करण्याकरिता व्यवस्था उभी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, रूढीवाद, विषमता, जातिवाद यामुळे सामाजिक, आर्थिक गुलामगिरी ओढवते. महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, विधवांना संपत्तीचा अधिकार नव्हता. अशा स्थितीत त्यांनी समाजातील रुढींच्या विरोधात बंड पुकारले आणि महिलांना शिक्षणाचा अधिकार देण्यासाठी पहिली मुलींची शाळा सुरू केली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या मार्गावर शासन चालत आहे. शासनाने लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनविण्याच्या घेतलेल्या निर्णयानुसार आतापर्यंत ५० लाख लखपती दीदी झाल्या असून यावर्षी १ कोटीपर्यंत पोहोचू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सातारा जिल्ह्यात दीड लाख लखपती दीदी झाल्या आहेत याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. संत सावता माळी यांचे अरण येथील स्मारकही भव्य-दिव्य असेल. त्यासाठी आवश्यक त्या व्यवस्था उभ्या करण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
नायगावचे नाव सावित्रीबाई फुले यांच्या नावाने करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ग्रामसभेने तसा निर्णय घेऊन तो ग्राम विकास विभागामार्फत पाठविल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment