सांस्कृतिक समृद्धी म्हणूनच महाराष्ट्र समृद्ध...!
मराठी भाषा अभिजात होती. पण तिला राज्यमान्यता मिळणे आवश्यक होते. ही राज्यमान्यता मिळवून देण्यासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष पुढाकार घेतल्याचे उल्लेख करून, मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आपण विदेशातील मराठी बांधव मराठी भाषेच्या संवर्धनाकरिता, मराठी भाषेच्या संपन्न-समृद्धीकरिता प्रय़त्न करत आहात, हे कौतुकास्पद आहे. भारताबाहेर आपण युरोपमध्ये मराठी शाळा चालवता. मुलांना मराठी भाषा शिकवता. भाषा या माध्यमामुळे आपण आपली संस्कृती, संस्कार, उत्सव, आपले साहित्य, कला यांच्याशी जोडलो जातो. भारतात महाराष्ट्र भौतिकदृष्ट्या समृद्ध, संपन्न तसेच सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध समजले जाते. महाराष्ट्राने केवळ भौतिक समृद्धी मिळविलेली नाही, तर तर सांस्कृतिक समृद्धी देखील मिळवलेली आहे. आपण सांस्कृतिक समृद्धी टिकवली म्हणूनच भौतिक दृष्ट्या समृद्ध ठरलो आहोत. यातूनच महाराष्ट्र हे येत्या तीन वर्षात भारतातील ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था असणारे पहिले राज्य ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विदेशी थेट गुंतवणूक, स्टार्ट अपमध्ये, निर्यात, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात प्रथम क्रमांकांचे राज्य आहे. देशातील साठ टक्के डाटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत. एआय आणि संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांतही महाराष्ट्र सर्वात पुढे असल्याचा उल्लेख केला.
No comments:
Post a Comment