भारत-रशिया व्यापार सहकार्याला चालना देणारी उद्योजकांची राऊंडटेबल चर्चा संपन्न
मुंबई, दि.१७ :- वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज (एआयएआय) यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे रशियातील व्यावसायिक प्रतिनिधी मंडळासोबत संवादात्मक बैठक (इंटरॲक्टिव्ह राऊंडटेबल मीटिंग) आयोजित करण्यात आली. या परिषदेमुळे भारतीय उद्योगांना रशियन कंपन्यांशी थेट संवाद साधण्याची, सहकार्याच्या संधी शोधण्याची आणि दीर्घकालीन व्यापार भागीदारी निर्माण करण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळाली.
या परिषदेस वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे अध्यक्ष तथा ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. विजय कलंत्री, रशियातील दक्षिण निर्यात सहाय्यता केंद्राच्या प्रतिनिधी इरिना मलाहोवा, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्रेड प्रमोशन आणि डेव्हलपमेंट संचालक प्रिया पानसरे तसेच उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. विजय कलंत्री म्हणाले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्यानंतर उभय देशांतील व्यापार संबंधांना नवे बळ मिळाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेला रशियन व्यापार प्रतिनिधींकडून सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. भारतात विशेषतः महाराष्ट्रात व्यापाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. भारतीय भांडवली बाजारातील रशियन गुंतवणूक, अणू व संरक्षण क्षेत्रातील अत्यावश्यक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि संयुक्त उपक्रम यांमुळे २०२७ पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment