मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले, मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे निधीबाबत शासनाकडील अवलंबित्व कमी करण्यासाठी उत्पन्न वाढीसाठी निवडेलल्या पर्यायांवर काम करावे. याबाबत कालमर्यादा पाळत कार्यवाही पूर्ण करावी. उत्पन्न वाढीबरोबरच विभागाच्या माध्यमातून राज्याच्या विकासात भरीव योगदान द्यावे. उत्पन्नाचे स्वत:चे स्त्रोत निर्माण झाल्यास विभागाद्वारे अधिक परिणामकारक आणि पुढाकाराने विकासाची कामे करता येतील. महाराष्ट्र किनारपट्टीसाठी जाहिरात धोरण, किनारपट्टीवरील लहान बंदराच्या हद्दीत भाडेपट्टयाने द्यावयाच्या स्टॉलबाबत अधिसूचना प्रसिद्धीची कार्यवाही पूर्ण करावी.
समुद्र किनाऱ्यालगतचे जमीन व्यवस्थापन व जलकिनाऱ्याचा उपयोग करण्याबाबत सर्वंकष, गुंतवणूकदारांना आकर्षक असणाऱ्या धोरणाची निर्मिती करावी. यासाठी जीआयएसवर आधारित पोर्टलची निर्मिती करण्यात यावी. समुद्रकिनारे लाभलेल्या अन्य राज्यांच्या धोरण, नियमांचा अभ्यास करून गुंतवणूकीस सुलभ धोरण असावे. या माध्यमातून रोजगारनिर्मिती होईल. प्रथम धोरण बनवून त्यानंतर पायाभूत प्रकल्पांसाठी धोरण आणावे, असे निर्देशही मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment