दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी; ३७ लाख कोटींचे सामंजस्य करार,
४३ लाख रोजगारनिर्मिती
– उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत
मुंबई, दि. २३ : दावोस (स्वित्झर्लंड) येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आतापर्यंत एकूण ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून, त्यातून राज्यात ४३ लाख युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी ठरलेला आहे, अशी माहिती उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांनी मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
उद्योगमंत्री डॉ.सामंत म्हणाले की, दावोसमध्ये एकूण ८१ करार झाले असून, त्यापैकी १६.६९ लाख कोटी रुपयांचे ५१ करार उद्योग क्षेत्रातील आहेत. ‘एमएमआरडीए’ अंतर्गत २४ करार असून त्यांची किंमत १९.४३ लाख कोटी रुपये आहे, तर सिडको अंतर्गत ६ करार १.१५ लाख कोटी रुपयांचे आहेत. एकूण गुंतवणुकीपैकी सरासरी ८० टक्के थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मागील वर्षी दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये १५ लाख कोटींच्या सामंजस्य कराराची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी सुरू आहे. गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, रायगड आदी जिल्ह्यांत प्रत्यक्ष उद्योग उभे राहत असल्याचे उद्योग मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment