Sunday, 11 January 2026

महाराष्ट्र सदनात 'लाईव्ह पेंटिंग' आणि 'कलात्मक पतंग'चा अनोखा उत्सव मकर संक्रांतीला कलेची उंची

 महाराष्ट्र सदनात 'लाईव्ह पेंटिंगआणि 'कलात्मक पतंग'चा अनोखा उत्सव 

मकर संक्रांतीला कलेची उंची


 

नवी दिल्ली दि.11 :- राजधानी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदन येथे १० जानेवारी रोजी आयोजित 'हुरडा पार्टी व मकर संक्रांत महोत्सवातकलेचा अभूतपूर्व जागर पाहायला मिळाला. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या सोहळ्याचे मुख्य आकर्षण 'लाईव्ह पेंटिंगआणि 'कलात्मक पतंग निर्मितीहा उपक्रम ठरला. यामध्ये १०० हून अधिक नवोदित कलाकार आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या प्रतिभेने दिल्लीकरांना मंत्रमुग्ध केले.

 

'फाईन लाईन आर्ट अकॅडमी'चे प्रमुख आशिष देशमुख आणि स्नेहल देशमुख यांच्या संकल्पनेतून हा विशेष उपक्रम साकारण्यात आला होता. या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मकर संक्रांतीचे औचित्य साधून राबवण्यात आलेली अभिनव ॲक्टिव्हिटी. यामध्ये सहभागी कलाकारांनी A3 आकाराच्या कोऱ्या कागदापासून सुबक पतंग तयार केले. या पतंगांवर कोणत्याही विषयाचे बंधन न ठेवता 'फ्री-हँडपद्धतीने मनसोक्त रंगरंगोटी करण्यात आली. विशेष म्हणजेनिव्वळ रंगकाम न करता प्रत्येक कलाकाराने आपल्या कलाकृतीतून एक सामाजिक संदेश देवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

 

या उपक्रमात सहभागी कलाकारांना अकॅडमीतर्फे कॅनव्हासरंग आणि ब्रशेस यांसारखे संपूर्ण साहित्य विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले होते. एका बाजूला शेकोटीवर भाजल्या जाणाऱ्या खमंग हुरड्याचा सुगंध आणि दुसरीकडे कॅनव्हासवर उमटणारे महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे रंगअशा वातावरणाने महाराष्ट्र सदनाचा परिसर न्हाऊन निघाला होता. कलाकारांनी आपल्या कुंचल्यातून शेतशिवारातील दृश्ये आणि पतंगोत्सवाचे विविध पैलू हुबेहूब जिवंत केले. या उपक्रमात लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवला.

 

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी आशिष देशमुखस्नेहल देशमुख आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी 'फाईन लाईन आर्ट अकॅडमी'च्या वतीने निवासी आयुक्तांना गणेशाचे सुंदर चित्र असलेली फ्रेम भेट दिली. या कल्पक महोत्सवामुळे दिल्लीच्या हृदयस्थानी महाराष्ट्राच्या मातीचा आणि कलेचा सुगंध दरवळला असूनसर्व स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi