गोरेगाव येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील अनियमिततेची गतीने चौकशी
- मंत्री उदय सामंत
नागपूर, दि. १२ : मुंबईतील गोरेगाव येथील देवी कन्याकुमारी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकास प्रकरणातील गैरव्यवहाराच्या तक्रारींची चौकशी गतीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांना न्याय मिळावा, यासाठी उच्चस्तरीय बैठक आयोजित केली जाईल, अशी माहिती नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.
सदस्य नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना डॉ.सामंत म्हणाले की, संबंधित प्रकरणातील अनियमितता निदर्शनास आल्यानंतर महापालिकेकडून विकासकाला स्टॉप-वर्क नोटीस देण्यात आली. मात्र या नोटिसीविरोधात विकासकाने एजीआरसीकडे (अॅडिशनल ग्रिव्हन्स रिड्रेसल कमिटी) अपील केले असून, एजीआरसीने विकासकाला अंतरिम दिलासा देत वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्रि-सदस्य चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत.
या समितीला तीन महिन्यांत चौकशी अहवाल सादर करणे बंधनकारक आहे, असे सांगून मंत्री डॉ.सामंत म्हणाले, “एजीआरसीला अर्ध-न्यायिक अधिकार असल्याने अहवाल येईपर्यंत पुढील कारवाई थांबवावी लागते. परंतु समितीने मुदत वाढ न मागता प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून वेळेत अहवाल द्यावा, यासाठी सूचना दिल्या जातील.”
मंत्री डॉ.सामंत म्हणाले की, संबंधित अधिकारी, गृहनिर्माण विभाग आणि सदस्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक अधिवेशनानंतर घेऊन स्थानिक रहिवाशांना न्याय देण्यासाठी आवश्यक दिशानिर्देश निश्चित केले जातील.
No comments:
Post a Comment