प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथील कर्तव्यपथावरील संचलनात महाराष्ट्राचा डंका
· 'गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' चित्ररथाला प्रथम पारितोषिक
· महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने पाठवलेल्या सांस्कृतिक पथकाला आंतरराज्य समूह नृत्य स्पर्धेत तिसरा क्रमांक
मुंबई, दि. ३० : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथील 'कर्तव्यपथावर' पार पडलेल्या दिमाखदार संचलनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाने प्रथम क्रमांकाचा सर्वोच्च बहुमान पटकावला. आज दिल्लीत राष्ट्रीय रंगशाळा केंट येथे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ व सहसचिव अमिताभ श्रीवास्तव यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
'गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' या विषयावर आधारित या चित्ररथाने महाराष्ट्राची सांस्कृतिक समृद्धी आणि आर्थिक स्वावलंबनाचे दर्शन संपूर्ण जगाला घडवले. यंदाच्या चित्ररथातून महाराष्ट्राची अष्टविनायक परंपरा, गणेशोत्सवातील सार्वजनिक सहभाग आणि या उत्सवामुळे मिळणारा लाखो हातांना रोजगार (मूर्तीकाम, सजावट, वाद्ये) यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले होते. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचा गणेशोत्सव कसा पूरक ठरतो, हे या चित्ररथातून प्रकर्षाने मांडण्यात आले.
चित्ररथासोबत पारंपारिक वेशभूषेत लेझीम, नृत्य सादर करणाऱ्या कलाकारांनी कर्तव्यपथावर चैतन्य निर्माण केले. त्यांच्या ऊर्जेमुळेच महाराष्ट्राच्या चित्ररथाला विशेष पसंती मिळाली. शिवाय महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सादरीकरण करण्यासाठी पाठवलेल्या पथकाला देखील तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे .
No comments:
Post a Comment