महाराष्ट्राचा अत्यंत अभ्यासू आणि कर्तबगार नेता हरपला
- मंत्री जयकुमार रावल
मुंबई दि.28:- महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, या सह सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले दुर्दैवी निधन अत्यंत धक्कादायक, वेदनादायी आणि मन सुन्न करणारे आहे. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राने एक अत्यंत अभ्यासू, अनुभवी, कर्तबगार, अजातशत्रू आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे.अशा शब्दात अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या.
मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, अजित पवार यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेती, जलसंपदा, पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच संवेदनशील राहिले. कठोर निर्णयक्षमता, प्रशासनावर मजबूत पकड, आणि स्पष्टवक्ता म्हणून त्यांच्या नेतृत्वाची ओळख होती.
तसेच माझ्या शालेय जीवनापासून त्यांच्याशी सबंध आणि संवाद होता. पुण्याचे सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये मी शिकत असताना त्यांनी मला बोलवून माझी मुलाखत घेतली होती. नंतरच्या काळात राजकारणात आमदार झाल्यानंतर जिल्ह्यातील विकासाच्या अनेक योजनांना सहकार्य केले. साक्री तालुक्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प मागणी केल्यानंतर त्यांनी मंजूर केला. काल झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये राज्यातील सोयाबीन, तूर खरेदी आणि एकूणच पणन संदर्भात अनेक विषयात चर्चा करून मार्गदर्शन केले.
त्यांच्या निधनाने केवळ एका राजकीय नेत्याचा नव्हे, तर राज्याच्या विकासप्रक्रियेला दिशा देणाऱ्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा अंत झाला आहे. ही हानी भरून न निघणारी असून महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवेल.असे मंत्री रावल म्हणाले.
या दुःखद प्रसंगी, त्यांच्या कुटुंबीयांप्रती, आप्तस्वकीयांप्रती मी शोकसंवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व कुटुंबीयांना हे असह्य दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.
0000
बी.सी.झंवर/विसंअ
No comments:
Post a Comment