केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान
यांचा तीन दिवसांचा महाराष्ट्र दौरा
अहिल्यानगर आणि नाशिक येथे विविध कार्यक्रमांना उपस्थिती
मुंबई, दि. ३१ : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे ३१ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या कालावधीत अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येत आहेत. हा दौरा शेतकरी, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी नव्या संधी यांना समर्पित असून, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या शेतकरी व ग्रामीण विकासाच्या धोरणांची माहिती ते देणार आहेत.
३१ डिसेंबर रोजी श्री. चौहान अहिल्यानगर येथे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान ते बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रास भेट देऊन शेतकरी गटांशी संवाद साधणार आहेत. तसेच शेतकरी व ग्रामीण विकासाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करून आढावा घेणार आहेत. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधताना ते पीक पद्धती, सिंचन, जलसंधारण, पीक विमा, बाजारपेठेपर्यंत पोहोच वाढविण्यासाठी तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत विचारमंथन करणार आहेत. अहिल्यानगर दौऱ्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, नैसर्गिक शेती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पीक विविधीकरण, मूल्यवर्धन तसेच शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) यांच्या माध्यमातून संघटित शेतीला चालना देण्याबाबत आपली भूमिका यावेळी मांडतील.
No comments:
Post a Comment