दावोसमध्ये महाराष्ट्राचे 30 लाख कोटींचे सामंजस्य करार
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणखी 10 लाख कोटींच्या कराराची प्राथमिक बोलणी पूर्ण
· 83 टक्के करारांमध्ये थेट परकीय गुंतवणूक
· एकूण 18 देशांमधून महाराष्ट्रात गुंतवणूक
· 40 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट
· देशातील पहिली इनोव्हेशन सिटी मुंबईनजीक
· मुंबईत सर्क्युलर इकॉनॉमी विकसित करणार
दावोस, दि. 22 जानेवारी :दावोसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून, आणखी 10 लाख कोटींच्या गुंतवणूक करारांची प्राथमिक बोलणी पूर्ण झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिली. यातून 40 लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील पत्रकारांशी त्यांनी व्हीसीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. या करारांपैकी 83 टक्के करारांमध्ये थेट परकीय गुंतवणूक असून, एकूण 18 देशांमधून महाराष्ट्रात ही गुंतवणूक येते आहे. 16 टक्के गुंतवणूक ही परकीय तंत्रज्ञान भागिदारीत आहे. या 18 देशांमध्ये अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, जपान, स्वित्झर्लंड, स्वीडन, नेदरलँड, नॉर्वे, इटली, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, युएई, स्पेन, कॅनडा, बेल्जियम इत्यादींचा समावेश आहे. औद्योगिक, सेवा, कृषी, तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रात ही गुंतवणूक येते आहे. सामंजस्य करार प्रत्यक्षात परावर्तित होण्याचा दर हा 75 टक्के आहे. गेल्या वर्षीचे करार हे 75 टक्के प्रत्यक्षात आलेले आहेत, अशीही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ही गुंतवणूक 3 ते 7 वर्षांत परावर्तित होत असते, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एसबीजी, ब्रुकफिल्ड, आर्सेलर मित्तल, फिनमन ग्लोबल, इस्सार, स्कोडा ऑटो, फॉक्सवेगन, एसटीटी टेलिमीडिया, टाटा, अदानी, रिलायन्स, जेबीएल, कोकाकोला, बॉश, कॅपिटल लँड, आयर्न माऊंटेन अशा अनेक कंपन्यांशी हे करार झालेले आहेत. काही समूह हे भारतीय असले तरी त्यांची सुमारे 165 देशांमध्ये गुंतवणूक आहे. क्वांटम काम्प्युटिंग, एआय, जीसीसी, डेटा सेंटर्स, आरोग्य, अन्न प्रक्रिया, ग्रीन स्टील, नगरविकास, जहाजनिर्माण, फिनटेक, लॉजिस्टीक, डिजिटल इन्फ्रा अशा सर्वच क्षेत्रात ही गुंतवणूक आली आहे.
No comments:
Post a Comment