देशातील पहिल्या रजोनिवृत्ती क्लिनिक्सची महाराष्ट्रात सुरुवात
- आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
महिलांच्या आरोग्य सेवेत राष्ट्रीय आदर्श
मुंबई, दि. २७ : महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देणाऱ्या दूरदर्शी उपक्रमांतर्गत महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राज्यात शासकीय रुग्णालये व शहरी आरोग्य केंद्रांमध्ये विशेष रजोनिवृत्ती क्लिनिक्स सुरू करण्यात आली आहेत. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला राज्यभरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
रजोनिवृत्ती हा स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक व संवेदनशील टप्पा असून, या काळात शारीरिक, भावनिक व हार्मोनल बदल मोठ्या प्रमाणावर जाणवतात. हार्मोनल असंतुलन, हाडांचे विकार, झोपेच्या तक्रारी, हृदयविकाराचा धोका तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या यांसारख्या बाबींकडे सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेत विशेष लक्ष देवून शासनाने रजोनिवृत्ती-केंद्रित आरोग्य सेवांना संस्थात्मक स्वरूप देत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
या रजोनिवृत्ती क्लिनिक्समध्ये महिलांसाठी एकाच छताखाली सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात येत असून, त्यामध्ये तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला, मानसिक आरोग्य समुपदेशन, हार्मोनल, हाडे व हृदयाच्या आरोग्याची तपासणी, आवश्यक उपचार, औषधे तसेच जीवनशैलीविषयक मार्गदर्शन यांचा समावेश आहे.
या सेवांचा लाभ घेतलेल्या महिलांनी समाधान व कृतज्ञता व्यक्त केली असून, हा उपक्रम आवश्यक, सन्मानजनक आणि महिलांना सक्षम करणारा असल्याची भावना व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment