बारमाही पाणी व्यवस्थापनासाठी झऱ्यांचे पुनरुजीवन, संवर्धन आवश्यक
- मृद व जलसंधारण सचिव गणेश पाटील
मुंबई, दि. 23 : स्वच्छ व शाश्वत बारमाही पाणी व्यवस्थेसाठी झरे हे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आहेत. विविध नैसर्गिक आणि मानव निर्मित कारणांमुळे बरेच झरे आटत चालले आहेत. आपली पाण्याची गरज मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे बारमाही पाणी व्यवस्थेसाठी झऱ्यांचे पुनर्भरण व संवर्धन आवश्यक असून, त्यासाठी महाराष्ट्र शासनाचा मृद व जलसंधारण विभाग लवकरच धोरण निश्चित करणार आहे, अशी माहिती मृद व जलसंधारण सचिव गणेश पाटील यांनी व्यक्त दिली.
वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा व ग्रामपरी यांच्या संयुक्त विद्यमाने पाचगणी येथे आयोजित झऱ्यांचे व्यवस्थापन या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधूदुर्ग, रत्नागिरी, अहिल्यानगर, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
झऱ्यांचे पुनर्जीवन व संवर्धन यासाठी जाणीवपूर्वक काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे या नवीन विषयात झोकून देऊन काम करा, या विषयातील जाणकार बना आणि पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत जपण्यासाठी मोठया प्रमाणात जनजागृती करा, असे आवाहनही पाटील यांनी केले.
यावेळी ॲक्वाडॅमचे संचालक डॉ. हिमांशू कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातील झऱ्यांच्या पुनरूज्जीवनाचे धोरण याबाबत मार्गदर्शन केले. झरा हा भूजलाचा सर्वात पुरातन स्त्रोत असून, पाण्याचा हा स्त्रोत पर्यावरणपूरक असल्यामुळे त्याच्या संवर्धनाकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. त्यासाठी, शासन, या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ, नाबार्ड आणि ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment